बाराव्या शतकात आपल्या अलौकिक प्रज्ञेचा वापर करून क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी परिवर्तनाचा अंगारमळा आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून फुलविला होता. समाज जीवनाच्या धार्मिक, सामाजिक, साहित्यिक अशा विविधांगांवर त्यांनी व त्यांचे शरण, शरणम्मा यांनी आपापल्या अनुभवाच्या कनाती ताणून अनुभव मंटप साकारला होता.
धर्मांध धर्मव्यवस्थेने नकारघंटा वाजवून निष्प्राण करून टाकलेल्या समाजामध्ये महात्मा बसवेश्वर व त्यांचे शरण, शरणम्मांनी वचनसाहित्याचे माध्यमातून अभिमान, स्वाभिमानाचे प्राण फुंकले. देवदर्शनासाठी आसुसलेल्या स्पृश्य व अस्पृश्यांना वीरशैव-लिंगायत धर्माची दिक्षा दिली. प्रत्यक्ष शिवालाच शरीरावर धारण केल्यामुळे देव दर्शनासाठी आसुसलेला समाजाचा मोठा वर्ग सुखावला. ‘तीर्थक्षेत्रे ही कुरुक्षेत्रे आहेत. देहालाच देवालय करा’ अशी शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली. महात्मा बसवेश्वरांनी त्यांच्या तर्कशुद्ध विचारांमुळे धर्मांध धर्म व्यवस्थेला खिळखिळे करून परिवर्तनाची अद्भुत किमया साधली होती.
वीरशैव-लिंगायत धर्माचे महान प्रचारक आणि प्रसारक क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांचा जन्म इ.स. 1131ला अक्षय तृतीयेला विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी जे आज बसवनबागेवाडी म्हणून ओळखले जाते येथे मादिराज व मादलांबिका या वीरशैव-लिंगायत दाम्पत्याच्या पोटी झाला. महात्मा बसवेश्वर हे जन्माने जंगम व कर्माने वीरशैव-लिंगायत होते. इ.स. 1131 ते 1167 हा महात्मा बसवेश्वरांचा जीवनकाळ. अवघ्या छत्तीस वर्षांच्या अल्पजीवन कालखंडात धार्मिक, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या कार्यामुळे मध्ययुगीन भारतवर्षाच्या इतिहासावर त्यांनी आपली अमिट छाप उमटविली आहे.
मानवी हक्क व न्यायाचा झंझावात म्हणजे महात्मा बसवेश्वर. शुद्र-अस्पृश्यांचा हुंकार म्हणजे महात्मा बसवेश्वर. आद्य अस्पृश्यउद्धारक म्हणजे महात्मा बसवेश्वर. स्त्रीमुक्तीचे उदगाते म्हणजे महात्मा बसवेश्वर. गुलामी व विषमतेचा अंधकार दूर करणारा प्रज्ञासूर्य म्हणजे महात्मा बसवेश्वर. ‘कायक वे कैलासद्वारे सेवा हाच शिवा आहे’, असे प्रतिपादन करून श्रमशक्तीचे पावित्र्य व महत्त्व सांगणारा आणि भिक्षावृत्तीला विरोध करणारा महामानव म्हणजे महात्मा बसवेश्वर.
बसवकल्याण येथे महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेला मूळ अनुभव मंटप व परुस कट्टा आज निजाम वंशजांच्या ताब्यात आहे. तो मुक्त करण्यासाठी आणि देशभर केंद्र शासनाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची शासकीय जयंती साजरी करणे या दोन मागण्यांसाठी शिवा संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.
संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत रविदास, संत तुकारामांपासून महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छ. शाहू, रामास्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी महामानवांनी तथागत बुद्ध व महात्मा बसवेश्वरांचा समता विचार पुढे नेल्याचे दिसून येते. आज वीरशैव वेगळे व लिंगायत वेगळे ही भूमिका महात्मा बसवेश्वरांच्या समता विचार, त्याग व बलिदानाला नाकारणारी आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीला त्यांचा उल्लेख ‘बसवा’ असा एकेरी करून वीरशैव वेगळे, लिंगायत वेगळे असे समाजफोडीचे विष वीरशैव-लिंगायत समाजात पेरून वीरशैव-लिंगायत एकीला नासविण्याचे काम काही समाजद्रोही करतील. महान महात्मा बसवेश्वरांना लहान करण्याचे काम हे करतील. धर्मफोड्यांच्या बसवाधर्म संस्थापक व वीरशैव वेगळे, लिंगायत वेगळे या धर्मफोडी भूमिकेचा विरोध वीरशैव-लिंगायत समाजातील जागृत, डोळस बंधू-भगिनी व युवक-युवतींनी करणे हेच वीरशैव-लिंगायत धर्माचे महान प्रचारक व प्रसारक क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांना त्यांच्या 894व्या जयंतीदिनाचे अभिवादन ठरेल.