Ajit Pawar | अजितदादा गेले, पुढे काय? 
संपादकीय

Ajit Pawar | अजितदादा गेले, पुढे काय?

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आणि बदलती सत्ता समीकरणे तसेच सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि पवार कुटुंबातील इतर नेत्यांच्या पुढील भूमिकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा काय ठरेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट अजित पवार यांच्या निधनानंतर कसा असेल याची चुणूक आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाणवते आहे. दादांच्या पत्नी सुनेत्राताई अत्यंत धीरोदात्तपणे दुर्घटनेला सामोरे गेल्या, जबाबदारी पेलण्यास उभ्या राहिल्या आहेत. महायुतीत असतानाही त्या शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा चालवणार आहेत. दुसरीकडे, कर्जत-जामखेडचे आमदार दादांचे पुतणे; पण पवारसाहेबांच्या पक्षात असलेल्या रोहित पवार यांनी या अपघाताबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली पाहिजेतच. चौकशीतून ती उत्तरे मिळतील.

अचानक एखादा महत्त्वाचा नेता अपघाती मृत्यू पावणे हे धक्कादायक, हृदयद्रावक. मग, अशा परिस्थितीत त्या नेत्याच्या कर्तृत्वाची, नेतृत्वाची तसेच त्याच्या योगदानाची स्मरणचिन्हे चर्चेत येतात. कार्यकर्ते भावनावश होतात आणि विरोधकही त्यांचा वेळप्रसंगी त्या नेत्याशी झालेला सामना विसरून गेलेल्या आत्म्याला मनापासून चिरशांती मिळावी, अशी प्रार्थना करतात. आज महाराष्ट्र विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांत अजितदादांच्या स्मृती जागवणारी भाषणे झाली. खरे तर अशी भाषणे करावी लागतील याची सूतराम कल्पना कोणालाही नव्हती. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील, गोपीनाथ मुंडे हे नेतेही अकाली गेले. विलासराव आणि आर.आर. आबा यांच्या तब्येतीची नाजूक अवस्था माहीत होती. गोपीनाथ मुंडे यांचे निधनही असेच चटका लावणारे होते. त्यांचे मेहुणे प्रमोद महाजन यांचाही असाच अकाली मृत्यू महाराष्ट्राने अनुभवला होता. दादांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती अशीच हेलावून टाकणारी आहे. दादा त्यांच्या काकांच्या शरद पवारांच्या छत्रछायेत वाढले. शरद पवारांच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाचे योगदान 95 सालानंतर सातत्याने दिले. काकांनी निर्णय घ्यायचा आणि पुतण्याने तो राबवायचा, अशी काहीशी राष्ट्रवादी काँग्रेसची रचना होती. यात खंड पडला तो दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी होत भाजपसमवेत पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर. त्यानंतर दादा पक्षाबाहेर फेकले गेले असते. मात्र, तसे न होता ते पक्षात महत्त्वाची भूमिका बजावत राहिले.

दादा मनातून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न बघत होते खरे; परंतु त्यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काम करताना कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या विरोधात मोहीम चालवली नाही की, कुभांड रचले नाही. दादांसारखा प्रशासनावर पकड असलेला माणूस त्यामुळेच प्रत्येक मुख्यमंत्र्याला हवासा वाटत असावा. भ—ष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना भाजपसमोर झुकावे लागले, असे मानले जाते. दादा हा आरोप फेटाळून लावत. विकासासाठी तिकडे गेलो सांगत. दादांच्या प्रशासकीय कौशल्याची महाराष्ट्र कायम स्तुती करतो. दादांची पोकळी नक्कीच जाणवेल. आता प्रश्न असेल तो पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आलेल्या आणि तेथील राजकारणावर प्रचंड पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीचे काय हा?

शरद पवारसाहेब महाविकास आघाडीत आणि अजितदादा महायुतीत, अशी विभागणी काही वर्षांपूर्वी झाली होती. आता दादांच्या नेतृत्वात पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसही विलीनीकरणास उत्सुक असल्याचे बोलले जाते. दादा असताना असे व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे म्हणतात. अनेक प्रत्यक्षदर्शी त्याची कबुली देतात. एकनाथ शिंदे यांना प्रचंड समर्थन आहे. लोकसभेत त्यांचे खासदार आहेत. त्यामुळे प्रादेशिक नेता म्हणून आपण त्यांच्या बरोबरीत यावे, असे अजित पवार यांना वाटत असेल. कदाचित, त्यामुळेच विलीनीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला असेल. आता ते नसताना पुढे काय? हा मुद्दा आहे आणि त्यांच्या निधनानंतर निर्माण होणारी राजकीय पोकळी कोण भरून काढेल? हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे.

सध्या सुनेत्रा पवार यांनी धीरोदात्तपणे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळत आपण ही जबाबदारी घेण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. अजितदादांचा वारसा पुढे चालवणार, असे जाहीर संकेतही त्यांनी दिलेत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे काय? हा मुद्दा राहतोच. राजकारणात पवार कुटुंबीयांनी मिळवलेले स्थान भविष्यात आपल्याकडे यावे, यासाठी त्याच कुटुंबातील काही तरुण पुढे येतात का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. पार्थ पवार यांनी राजकारणात येण्याचा एक असफल प्रयत्न यापूर्वी केला. लोकसभेत ते हरले. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे मात्र कर्जत-जामखेड येथून निवडून येत राजकारणात स्वतःची जागा निर्माण करू बघत आहेत. दादांच्या मृत्यूमागे घातपात असल्याची भूमिका घेत त्यांनी दादांचा वारसा महत्त्वाचा असल्याचे संकेत दिले आहेत.

या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. मात्र, महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे, सातारा, सांगली, थोड्याफार प्रमाणात कोल्हापूर आणि काही प्रमाणात मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जी रचना आहे ती भविष्यात कोणाला आपला नेता मानून वाढत राहील, हा खरा मुद्दा आहे. दादांना मानणारा आमदारवर्ग मोठा आहे. ते कार्यकर्त्यांची काळजी घेत असत. हा संपूर्ण वर्ग आपल्याकडे यावा, यासाठी रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. दादांच्या अपघातासंबंधित त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांतून जनतेच्या मनात काही प्रमाणात संशय निर्माण झाला आहे. भविष्यात आपणच त्यांचे वारस आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित करतील काय, हा मुद्दा आहे. पुढे सुनेत्रा पवार आणि त्यांची मुले जय, पार्थ आणि रोहित पवार यांच्यात दादांचा वारस कोण? याबद्दल वाद होऊ शकतो.

सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या लोकसभेत खासदार आहेत. दिल्लीत त्यांचे चांगले नेटवर्क आहे. त्या भाजपच्या नेतृत्वात ‘एनडीए’त आल्या तर सत्ताधार्‍यांना त्यांच्या ओळखीचा, नेटवर्कचा फायदा होईल का? हाही एक मुद्दा आहे. अर्थात, दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती भविष्यातही कायम राहील का, हा मुद्दा आहेच. त्यामुळे सध्या तरी दादांच्या निधनानंतर पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतातच. नेहरू यांच्यानंतर कोण? असाही प्रश्न विचारला गेला आणि काळाने तो सोडवला. आज सभागृहात दादांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रत्येकाच्या मनात त्यांनी निर्माण केलेली राजकीय जागा कोण व्यापणार, हा मुद्दा आहे आणि याची उत्तरे काळाच्या उदरातच दडलेली असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT