दोनच विषय, ‘काय राजेभाऊ काय म्हणता? राज्याचे हालहवाल कसे आहेत? नाही म्हणजे तुम्ही नेहमीच दिवसभर टी.व्ही.समोर पडेल राहता आणि बातम्या पाहता. सध्या काय विशेष चाललंय सांगा की?’
‘विशेष काही नाही. राज्यात सध्या दोनच विषय चर्चेत आहेत. पहिला म्हणजे हा की हत्तीण परत येणार का आणि दुसरा म्हणजे कबुतराला दाणे मिळणार का?’ ‘म्हणजे मी नाही समजलो. मी तर किती दिवस झाले हत्ती पाहिलेला नाही. हत्ती आम्हाला दिसतो केवळ चित्रात. हा, कबुतर मात्र नेहमीच दिसतात. काय विषय आहेत हे दोन्ही.’
‘कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीण अंबानींच्या ‘वनतारा’मध्ये गुजरातला गेली असताना तिला परत आणण्यासाठी लय प्रयत्न केले जात आहेत राव! काय सांगायचे तुम्हाला. झालं असं की, इकडे हत्तीण होती ती गेली, तर तिकडच्या लोकांना करमेनासे झाले. जाता-येता हत्तीण सगळ्या लोकांना दर्शन देत होती. आता हत्तीण नाही म्हणल्यावर लोक चिडल्यासारखे करू लागले. आधी हत्तिणीला परत आणा म्हणून सह्यांची मोहीम निघाली, मोर्चे निघाले. आता शेवटी कोर्टात केस गेली. कोर्ट काय म्हणेल ते खरे.’ ‘बरं, कबुतराचा काय विषय आहे?’ ‘मुंबईच्या कबुतरखान्यामध्ये शेकडो कबुतर दाणे खायला यायचे. लोक पोते भरभरून दाणे त्यांना टाकायचे. कबुतर लय अवलिया पक्षी आहे. त्याच्यापासून माणसाला काही रोग होतात म्हणे. हा प्रश्न पण कोर्टात गेला. कोर्टानं सांगितलं, कबुतरखाना हटवा म्हणून. तसे आदेश आले. कबुतरखाण्याची जागा मोठी ताडपत्री त्या जागेवर टाकून झाकून टाकण्यात आली. हे पक्षी वेगळे राहतात. त्या जागेवरती झुंडीच्या झुंडीने यायला लागले. लोकांना कबुतराला खाद्य टाकायची सवय होती. त्यांना करमत नव्हते ते लोक येऊन चकरा मारू लागले. खाद्याच्या गोण्या घेऊन येऊ लागले. खाद्य कुठे टाकावे हा प्रश्न त्यांना पडला. काही लोकांनी तिथेच आजूबाजूला कार लावल्या आणि त्याच्या भोवताल दाणे टाकायला सुरुवात केली. कबुतरांनी तिकडे गर्दी केली.’
‘बरं, म्हणजे सध्या राज्यामध्ये पेरण्या, सोयाबीन, कपाशीचे विषय तर आहेतच की, पण काही जिव्हाळ्याचे प्रश्न असतात की!’
‘हो तर. सध्या या दोन पशू-पक्ष्याची चर्चा सर्वत्र आहे.’ ‘मग रंगणार की राव, हे पशू-पक्षी तर माणसाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. एकदा का त्यांना लळा लागला की, त्यांना सोडविणासे होते! मग त्यांना सोडणे तर फार जिकिरीचे होते; मग त्यासाठी परत आणण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी लोक मोर्चे आणि रॅली काढतात. राज्यात सध्या नांदणीच्या हत्तिणीची आणि मुंबईतील कबुतरांची चर्चा खूप रंगली आहे. माणसांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असला तरी न्यायालयाचेही म्हणणेही तितकेच महत्त्वाचे नाही काय राव! आता न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरेल; मग काही निर्णय येईल तो येईल, त्याचा आदर सर्वांनी राखायला हवा.’