दिलासा आणि इशारा pudhari photo
संपादकीय

दिलासा आणि इशारा

पुढारी वृत्तसेवा

कडाडून भूक लागलेली असताना समोर पंचपक्वान्नांचे ताट यावे, तशी स्थिती सध्या महाराष्ट्राची झाली आहे. जून महिन्यात राज्यामध्ये तब्बल ५२ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. पुण्यात मान्सून नेहमीच्या तारखेपेक्षा तब्बल १२ दिवस उशिराने, म्हणजेच २२ जून रोजी पोहोचला आणि २६ जून रोजी त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीला धरणांमधील पाणी वाढणे अपेक्षित असते. परंतु जूनमधील पावसाच्या खंडामुळे जलसाठे कोरडे पडू लागले होते. महानगरातील पाणी कपात आणखी वाढवावी लागणार का, यंदा पेरण्या कधी करायच्या, दाट लोकवस्तीची उपनगरे यांना वर्षभर पाणी कुठून द्यायचे या प्रश्नांचे ढग राज्याच्या आकाशात साचले होते. अशा तृषार्त स्थितीत ‘घन ओथंबून येती‌’ म्हणत वरुणराजाच्या सरी बरसल्या आणि पाणीटंचाईच्या चिंतांची तीव्रता कमी झाली. एल निनो, सुपर एल निनो, महादुष्काळ, भीषण पाणीटंचाई यासंदर्भातील चर्चांनी भीतीचे ढग लोकमानसावर जमले होते. ते मागे सारून सृष्टी ओली चिंब करणारे मेघदूत गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वदूर बरसत आहेत. जूनअखेर महाराष्ट्रात पावसाची ५२ टक्के तूट होती. काही जिल्ह्यात ही तूट ७० ते ९० टक्के होती.

देशपातळीवर विचार करता जून २०२६ हा १९०१ नंतरचा पाचवा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारत, दक्षिण पूर्व किनारपट्टी आणि महाराष्ट्रासह प्रमुख शेती पट्ट्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पुढील दोन आठवड्यांत मोठ्या प्रमाणावर पूर्ण होतील, असा अंदाज आहे. राज्यातील खरीप हंगामातील गत पाच वर्षांतील सरासरी पेरणी क्षेत्र १ कोटी ५७ लाख ४७ हजार ८६२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सुमारे १० ते १३ लाख हेक्टर ऊस लागवडीचा समावेश असतो. चार जुलैअखेर ४४.३९ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, गतवर्षी याच काळात १.०५ कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यातील खरीप हंगामातील ऊस वगळून एकूण पेरणी क्षेत्र सरासरी १.४४ कोटी हेक्टर आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जुलैमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे नवीन कमी दाबाचे पट्टे आणि मान्सून ट्रफ दक्षिणेकडे सरकल्यामुळे मध्य, पश्चिम आणि उत्तर भारतात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शतकातील सर्वात कोरड्या जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघण्यास मदत होऊ शकते. आताच्या दमदार पावसामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जलाशयांच्या आणि विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होऊन भूजल पातळी वाढण्यासही मदत होईल. पिकांच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असणारा पाण्याचा उपसा करणेही यामुळे शेतकऱ्यांना शक्य होईल. पाणीपुरवठा आणि शेतीसाठी पावसाची दमदार हजेरी वरदान ठरणारी असली तरी दुसऱ्या बाजूला नेहमीप्रमाणे काही दुर्घटना आणि समस्याही उद्‌भवल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान होणे नैसर्गिक आहे; पण कोट्यवधी रुपये खर्च करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभे केलेले पायाभूत सुविधांचे मानवनिर्मित प्रकल्प पावसाने, वादळाने बाधित होत असतील तर त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि प्रवासाचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी खोपोली ते कुसगाव असा १३.३ किमी लांबीचा मिसिंग लिंक बांधण्यात आला आहे. या पुलासाठीचा ७१२० कोटी रुपये खर्च भरून काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर वसुलीच्या कालावधीत १५ वर्षांची वाढ केली आहे. पण कालच्या पावसात दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर पडला. मावळ तालुक्यातील पाटण गावातही दरड कोसळली आहे. पुण्यामध्ये भक्तीशक्ती चौकात पूल कोसळून भिंत तुटली आहे.

अलीकडील काळात महाराष्ट्रात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण विकासाच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा ऱ्हास. वृक्षांची मुळे जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचे काम करत असतात. डोंगरउतारावर वृक्षांचे आच्छादन असते, त्यावेळी पाणी वेगाने खाली वाहून जात नाही. पण वृक्षांविना बोडके बनलेल्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात सलग पाऊस पडल्यास तेथील माती सैल होऊन ती खाली जाते. वृक्षांचे आच्छादन नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पडणाऱ्या पावसाने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील खडकांची झीज झाली आहे, ते सैल झाले आहेत. परिणामी सह्याद्रीच्या परिक्षेत्रात मुसळधार पावसाच्या काळात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडताहेत. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नागरी भागामध्ये जुन्या इमारती कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे या गोष्टी आता पावसाळ्यात नित्याच्या बनल्या आहेत. याबाबत प्रशासनाने पुढाकार घेऊन स्ट्रक्चरल ऑडिटद्वारे या दुर्घटना टाळण्यासाठी काटेकोर भूमिका घ्यायला हवी. किमान अशा घटनांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रसंगी कठोर पावले उचलायला हवीत.

पावसाळी पर्यटकांचा उतावळेपणा आणि प्रशासनाच्या आदेशांकडे केले जाणारे दुर्लक्ष यामुळेही जीवितहानीच्या घटना घडताहेत. समुद्रकिनारे, धबधबे पाहायला जाताना पर्यटकांनी सुजाणपणा आणि संयम दाखवून प्रशासनाला सहकार्य केल्यास या घटना टळू शकतात. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये मान्सूनची कृपादृष्टी अशीच राहणे गरजेचे आहे. आताच्या पावसाने पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण ३२ टक्क्यांच्या आसपास भरले आहे. पुढील २४ तासांत ते ८० टक्के भरण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पंचगंगा, भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहिल्यास पाणीपुरवठ्याची चिंता मिटू शकेल. हवामान बदलांच्या काळात नियोजनकर्त्यांची कसोटी लागते. काल-परवापर्यंत दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठीचे नियोजन सुरू असतानाच एकाएकी जोरदार पावसाचे आगमन झाले आणि नव्या समस्या उभ्या राहिल्या. मुंबईतील पाऊस हा तर दरवर्षीचा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा ठरला आहे. २००५ मध्ये मुंबईत २४ तासांत ९०० मिलिमीटर पाऊस पडला होता. त्यानंतर राजधानी जलमय होणार नाही यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. पण दरवर्षी पावसाळ्यात या जागतिक महानगराची दैना उडते. आता मुंबईचे मानकरी बदलले आहेत. या सत्ताबदलाचा सकारात्मक परिणाम नागरिकांना अनुभवास येणे गरजेचे आहे. पावसाचे धूमशान सुरू झाले की, पाणी काटकसरीने वापराच्या सवयींना पूर्णविराम दिला जातो. पण एल निनो स्थिती सक्रिय असण्याच्या काळात पावसामध्ये मोठे खंड पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आता पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन दूरगामी विचार करूनच केले गेले पाहिजे. कारण आज केलेली थोडीशी काटकसर उद्याचा ताण कमी करणारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT