विजेची ‘स्वस्ताई’ Pudhari File Photo
संपादकीय

विजेची ‘स्वस्ताई’

महाराष्ट्र राज्यात वीज दर 20 टक्केने स्वस्त होणार

पुढारी वृत्तसेवा

बरेच दिवसांत काही स्वस्त झाल्याचे ऐकले नव्हते. सोने 72 हजारवरून थेट 92 हजार रुपयेपर्यंत जाऊन पोहोचले आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी ते खरेदी करण्याचा विचार सोडून दिला. घरभाडे वाढते, किराणा मालाचे भाव नेहमी वाढत असतात. ज्या ज्या कोणत्या दैनंदिन वापराच्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाचा भाव वाढत असतो. अगदी साध्या दैनंदिन भाज्याही महागच होत असतात. एकंदरीत महागाई हा सामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. श्रीमंत लोकांना स्वस्ताई किंवा महागाईने फरक पडणार नाही, इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांच्याकडे पैसे असतात. सामान्य लोकांचे महिन्याचे उत्पन्न निश्चित असते आणि त्यामध्ये त्यांना उदरनिर्वाह करायचा असतो. अशी सगळी परिस्थिती असताना महाराष्ट्र राज्यात वीज दर 20 टक्केने स्वस्त होणार या बातमीने शॉक बसण्याची वेळ आली आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या कधीकाळी मानवाच्या मूलभूत गरजा होत्या. यामध्ये आता वायफाय आणि वीज यांचा समावेश केला पाहिजे. राज्यात कोणताही उद्योग येणार असेल तर तो पहिल्यांदा जमीन शोधतो आणि त्यासोबत त्याला पाणी आणि वीज या गोष्टी लागत असतात. अशी ही जीवाभावाची वीज आपले जगणे बरेचदा कठीण करत असते. ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग नावाचा एक प्रकार असतो. दिवसातले सहा, आठ किंवा अगदी 12 तासही लाईट जाते आणि शेताला पाणी देणे यासारखी कामे ठप्प पडतात. शहरांची गोष्ट वेगळी असते. तिथे वीज फारशी जात नाही आणि गेली तर लगेच येते. त्यामुळे त्या विजेचा खर्च बर्‍यापैकी खुशीने केला जातो.

विजेचे बिल हा एक धडकी भरवणारा उपक्रम आहे. नेमके या महिन्याचे बिल किती येईल हा सस्पेन्स बिल आल्यानंतरच उघड होतो. लहरी विजेसारखे विजेचे बिलही तसेच असते आणि ते कधी 1500, कधी 2000, तर कधी 5000 येते. दिल्ली येथील सरकारने प्रत्येक कुटुंबाला काही एक युनिट वीज मोफत देण्याचा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून वीज बिल कसे कमी करता येईल याविषयी प्रत्येक राज्य प्रयत्न करू लागले. आपल्या राज्याला वीज वीस टक्के स्वस्त करण्यामध्ये यश आले याबद्दल खरे तर शासनाचे अभिनंदनच केले पाहिजे. वीज स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुखावले आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या कितीतरी वर्षांत कोणतीच गोष्ट स्वस्त झाली नव्हती. त्यात विजेसारखी गोष्ट स्वस्त होणे ही आनंददायक बाब आहे, यात काही शंका नाही. वीज स्वस्त करण्यासोबतच ती नियमित आणि पूर्णवेळ कशी मिळेल यासाठी संबंधित मंडळांनी प्रयत्न केले पाहिजेत. रात्री-बेरात्री लाईट येते म्हणून शेतकरी मंडळींना त्यावेळेला शेतात जावे लागते आणि भर अंधारात आपल्या पिकांना पाणी द्यावे लागते. हे सर्वात प्रथम टाळले पाहिजे. याचे कारण म्हणजे यात त्या शेतकर्‍याच्या जीवालाच धोका होऊ शकतो. महाराष्ट्राच्या नागरी भागामध्ये सर्वत्र बिबट्यांचा मुक्त संचार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT