रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक
कोट्यवधी भारतीय स्वच्छ पाण्यासाठी झगडत असताना, महानगरांत प्रीमियम आणि आयात केलेल्या बाटलीबंद पाण्याचा ‘लक्झरी’ बाजार वेगाने वाढतो आहे. पाण्याची चव, मिनरल्स आणि ब्रँड यावर चर्चा होत असताना सामाजिक असमानतेचे वास्तव अधिक ठळक होत आहे.
देशातील मोठ्या महानगरांत इटली, फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशांकडून आयात केलेल्या महागड्या पाण्याची मागणी वेगाने वाढत असून, देशात एक नवीन प्रीमियम वॉटर कल्चर विकसित होत आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर, गुरुग्राम यासारख्या निवडक शहरांत आलिशान फूड स्टोअर आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये विशेष चवीचे पाणी प्राशन करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यात सहभागी मंडळी जगभरातील नामांकित ब्रँडचे पाणी वाईन, कॉफीप्रमाणे तपासत आहेत. पाण्यातील मिनरल कंटेंट, कार्बोनेशन, खारटपणा आणि चवीबद्धल यात गांभीर्याने चर्चा होते. सध्या ही बाब भारतातील उच्चभ्रूवर्गापुरतीच मर्यादित आहे. परंतु, आगामी काळात त्याची व्याप्ती वाढू शकते.
पाण्याची चव घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार्यांपैकी एक अवंती मेहता यांनी स्वत:ला भारताची सर्वात तरुण ‘वॉटर सोमेलिएर’ असल्याचे म्हटले आहे. ‘सोमेलिएर’ म्हणजे पेयतज्ज्ञ. हा शब्द वाईनतज्ज्ञांसाठी वापरला जातो आणि आता पाणी क्षेत्रातही उपयोगात आणला जात आहे. अवंती यांच्या मते, वेगवेगळ्या भौगोलिक स्थितीतून उपसलेल्या पाण्याची चव आणि पोषणमूल्य वेगळे असते. ‘रॉयटर्स’च्या अहवालानुसार, या आयोजनात फ्रान्सच्या पर्वतरांगांतील पाणी सादर करणारे ‘एबिया’, दक्षिण फ्रान्सची ‘पेरिये’, इटलीची ‘सॅन पेलग्रिनो’, भारतातील अरावली पर्वताचे पाणी आणणारे ‘आवा’ मिनरल वॉटर यासारख्या ब्रँडचा समावेश होतो. अवंती यांच्या मते, प्रत्येक ठिकाणच्या पाण्याची चव वेगळी असते, हे लोकांना कळून चुकले आहे. काही ठिकाणी कॅल्शियम अधिक असते, तर काहीत मॅग्नेशियम, तर काही ठिकाणी नैसर्गिक कार्बोनेशन. योग्य प्रकारचे पाणी निवडणे हे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. अवंती यांचे कुटुंबीय आवा मिनरल नावाची कंपनी चालवते आणि ते भारतातील प्रीमियम वॉटर ब्रँडस्मध्ये स्वत:चे स्थान निर्माण करत आहे.
पाणी आता विशेषाधिकार
1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात स्वच्छ पाणी हा कळीचा मुद्दा ठरत आहे. संशोधकांच्या मते, देशातील सुमारे 70 टक्के भूजल कोणत्या ना कोणत्या रूपाने दूषित झाले आहे. अनेक शहर आणि वाड्यांवर नळातून येणारे पाणी पिण्याजोगे राहिलेले नाही. डिसेंबर महिन्यात इंदूरमध्ये गलिच्छ पाणी पिल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. अशावेळी बाटलीबंद पाणी भारतातील काही लोकांसाठी अत्यावश्यक बाब बनली आहे. किराणा दुकानात एक लिटरची पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते. हे पाणी पेप्सी, कोका कोला, बिसलरी तयार करतात. पिण्याच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल तब्बल पाच अब्ज डॉलर्स इतकी आहे. यात दरवर्षी 24 टक्क्यांनी वाढ होत असून, भारत या क्षेत्रात वेगाने विकसित होणारी बाजारपेठ आहे.
जागतिक पातळीवर बाटलीबंद पाण्याची उलाढाल 30 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. चीन आणि अमेरिकेसारख्या देशांत होणारी मागणी ही प्रामुख्याने जीवनशैली अणि सुविधेच्या रूपातून होताना दिसते. तेथे दरवर्षी चार ते पाच टक्के वाढ नोंदली जात आहे. बाजारातील रिसर्च कंपनी ‘यूरोमॉनिटर’च्या आकडेवारीनुसार, भारतात प्रीमियम वॉटरची मागणी 2021 मध्ये केवळ एक टक्के असताना 2025 पर्यंत ती वाढत 8 टक्क्यांवर पोहोचली आहे. ‘युरोमॉनिटर’चे अधिकारी अमूल्य पंडित यांच्या मते, महापालिकेकडून पुरविण्यात येणार्या पाण्यावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. केवळ बाटलीबंद पाणीच आरोग्यासाठी उपयोगी असल्याची भावना निर्माण झाली आहे. जी मंडळी नियमित बाटलीबंद पाणी खरेदी करू शकत नाहीत, ते वॉटर प्युरिफायरची मदत घेतात. मात्र, प्युरिफायरमध्ये पाणी स्वच्छ होताना त्यातील नैसर्गिक तत्त्व निघून जाते, असे निरीक्षण आहे.
स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणी
भारतात स्पार्कलिंग आणि स्प्रिंग वॉटरची मागणीदेखील वाढत आहे. टाटा समूहाने अलीकडेच स्पार्कलिंग वॉटरचा प्लांट सुरू केला आणि कंपनी भविष्यात स्प्रिंग वॉटरच्या उत्पादनातदेखील येण्याची तयारी करत आहे. टाटा अधिकार्यांच्या मते, त्यांच्या पाण्याच्या उद्योगाची उलाढाल दरवर्षी सुमारे 30 टक्के वाढ नोंदवू शकते. भारतात प्रीमियम वॉटर ब्रँड ‘आवा’ याची विक्री ही मागील वर्षी विक्रमी पातळीवर नऊ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. कंपनीच्या मते, शहरातील मध्यमवर्ग आणि श्रीमंत गटातील ग्राहकांत आरोग्य आणि चवीवरून वाढलेली जागरूकता पाहता प्रीमियम वॉटरची मागणी वाढत आहे. त्याचवेळी परकी ब्रँडस्देखील भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत.
अर्थात, या संपूर्ण ट्रेंडमागे एक कटुसत्यही दडलेले आहे. त्यात देशात कोट्यवधी नागरिक आजही सुरक्षित पाण्यापासून वंचित आहेत. हे चित्र सामाजिक असमानता दाखविणारे आहे. तज्ज्ञांच्या मते, पाण्यासारख्या मूलभूत गरजा केवळ बाजाराच्या भरवशावर सोडणे कितपत योग्य आहे? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा प्रणाली सक्षम करण्यावर भर देण्याचा मुद्दा मांडला आहे. पाण्याची गळती थांबवून स्वच्छ आणि आरोग्यपूरक पाणी देणे आवश्यक असताना, लोकांना महागड्या पर्यायाची निवड करण्यास भाग पाडू नये, असेही मत नोंदविले.
पाण्याची चव चाखण्यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभागींनी काही अनुभव शेअर केले. त्यांच्या मते, पाण्याची चव वेगळी असली तरी त्याची किंमत आटोक्याबाहेरची आहे. याउलट श्रीमंतवर्गात त्याचे प्रस्थ वाढत येत. एकुणात, भारतात बाटलीबंद पाण्याची कहाणी आता केवळ तहान भागविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. या पाण्यावर आरोग्य, चव, सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक असमानतेचे थर जमा झालेे आहेत.
बाटलीबंद पाण्याचा बाजार
भारतात चांगल्या गुणवत्तेच्या पाण्याचा बाजार सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. भारताची लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण पाहता हा बाजार आगामी काळात आणखी वाढू शकतो. उच्च उत्पन्न गटातील लोक पाणी हे आरोग्याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठेेला जोडत आहेत. भारतात सर्वात महाग आणि विशेष मिनरल असलेल्या बाटलीबंद पाण्याची किंमत एका लिटरसाठी 80 ते 100 रुपये आहे. त्याचवेळी परदेशातून आयात बाटलीची किंमत 250 ते 300 रुपयांपर्यंत आहे. या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतानाही त्याची मागणी वाढत आहे. पंचतारांकित हॉटेल्समध्ये भोजनाबरोबरच पाण्याचीदेखील विचारणा केली जात आहे, हे विशेष.