प्रा. सतीश कुमार,
आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचे टीकाकार असलेले लुईझ इनासिओ लूला दा सिल्वा यांनी ब्राझीलमध्ये अध्यक्षीय निवडणुकीत विजयाचा ’चौकार’ लगावला. बाह्य शक्तींनी लादलेली आर्थिक प्रारूपे स्थानिक दारिद्र्य आणि शोषणावर मात करू शकत नाहीत, हाच धडा या जनादेशातून अधोरेखित होतो.
ब्राझीलमधील ट्रम्प यांच्या धोरणांचे टीकाकार असलेले लुईझ इनासिओ लूला दा सिल्वा यांनी अध्यक्षीय निवडणुकीत पुन्हा विजय मिळवला. उजव्या विचारसरणीचे उमेदवार फ्लाविओ बोल्सोनारो यांचा पराभव करून त्यांनी सत्तेवरील पकड कायम राखत जगालाही संदेश दिला आहे. लूला यांना ५१.८ टक्के, तर बोल्सोनारो यांना ४८.२ टक्के मते मिळाली. पहिल्या फेरीत लूला पिछाडीवर होते. बोल्सोनारो यांना ४७.०३ टक्के आणि लूला यांना ४५.१६ टक्के मते मिळाली होती. सुमारे २२ लाख मतांनी मागे असलेल्या लूला यांनी दुसऱ्या फेरीत बाजी पलटवली. त्यामुळे या विजयाला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आले आहे.
ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश. तेथील सत्ताबदलाचा परिणाम शेजारी देशांबरोबरचा व्यापार, प्रादेशिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर होतो. विशेषतः अमेरिकेबरोबरच्या संबंधांच्या दृष्टीने ब्राझीलचे स्थान महत्त्वाचे आहे. ट्रम्प प्रशासनाच्या व्यापारविषयक धोरणांवर आणि आर्थिक दबावाच्या भूमिकेवर लूला यांनी यापूर्वी अनेकदा टीका केली आहे. दुसरीकडे फ्लाविओ बोल्सोनारो यांची राजकीय भूमिका ट्रम्प यांच्या विचारसरणीशी जवळची मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीत दोन उमेदवारांबरोबरच दोन वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनांमध्येही संघर्ष पाहायला मिळाला.
लूला यांच्या विजयामुळे ब्राझीलच्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अमेरिकेशी व्यापारी आणि राजनैतिक संबंध कायम ठेवतानाच राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर स्वतंत्र भूमिका घेण्याचा आग्रह लूला यांनी धरला. व्यापारावरील शुल्क, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांबाबत ब्राझीलला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे, अशी त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाकडे अमेरिकेच्या वाढत्या प्रभावाला मर्यादा घालण्याच्या व्यापक राजकीय चर्चेच्या संदर्भात पाहिले जात आहे.
डाव्या आणि उजव्या विचारसरणीतील संघर्ष
गेल्या काही वर्षांत लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचा प्रभाव वाढला आहे. आर्थिक अस्थिरता, महागाई, गुन्हेगारी आणि स्थलांतर यांसारख्या प्रश्नांमुळे मतदारांच्या राजकीय अपेक्षांमध्ये बदल होत आहेत. अशा स्थितीत ब्राझीलमध्ये डाव्या विचारसरणीच्या लूला यांना पुन्हा लोकसमर्थन मिळाले आहे. त्यामुळे या प्रदेशातील राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
लॅटिन अमेरिकेतील डाव्या विचारसरणीच्या वाटचालीत लूला यांचा हा विजय प्रादेशिक ऐक्याच्या दृष्टीने निर्णायक मानला जात आहे. मेक्सिकोनंतर आता ब्राझीलमध्ये डाव्या पक्षाच्या विजयाने या खंडातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था एकाच वैचारिक धाग्याने बांधल्या गेल्या आहेत. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम आणि क्युबाच्या नेतृत्वाने व्यक्त केलेला आनंद हा या खंडातील राजकीय स्वायत्ततेच्या आकांक्षेचे प्रकटीकरण आहे. त्याच वेळी चिली, इक्वेडोरसारख्या उजव्या किंवा मध्यममार्गी नेतृत्वानेही या निकालांचे स्वागत करताना आर्थिक एकत्रीकरण, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीविरुद्धच्या सहकार्याचा उल्लेख केला. यावरून हे स्पष्ट होते की, राजकीय विचारधारा भिन्न असल्या, तरी लॅटिन अमेरिकेला स्वतःच्या अंतर्गत समस्या सोडवण्यासाठी बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपापेक्षा प्रादेशिक संवाद आणि सहकार्याची अधिक निकड भासत आहे.
निवडणुकीत महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती, गुन्हेगारी आणि सार्वजनिक सुरक्षा हे प्रमुख मुद्दे होते. फ्लाविओ बोल्सोनारो यांनी गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईचे आणि अन्नधान्याच्या किमती कमी करण्याचे आश्वासन दिले. लूला यांनी सामाजिक कल्याणकारी योजना, आर्थिक मदत आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर भर दिला. पहिल्या फेरीतील पिछाडीनंतर लूला यांनी प्रचाराची दिशा बदलली. युवा मतदार आणि कोणत्याही एका उमेदवाराच्या बाजूने ठाम भूमिका न घेतलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सामाजिक योजनांचा लाभ घेणाऱ्या घटकांबरोबरच आर्थिक असुरक्षिततेचा सामना करणाऱ्या मतदारांनाही त्यांनी आपली भूमिका पटवून देण्यावर भर दिला. दुसऱ्या फेरीतील निकालाने त्यांच्या प्रचाराला मिळालेला प्रतिसाद स्पष्ट झाला.
कामगार नेत्यापासून अध्यक्षपदापर्यंत
लूला यांचा राजकीय प्रवास संघर्षपूर्ण राहिला आहे. १९७० च्या दशकात कामगार संघटनेचे नेते म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. कामगारांचे हक्क, वेतन आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर आंदोलन करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. पुढे वर्कर्स पार्टीच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २००२ मध्ये लूला पहिल्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. २००६ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांच्या कारकिर्दीत गरिबी कमी करणे, सामाजिक सुरक्षा आणि कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांना मोठा पाठिंबा निर्माण झाला. पुढील काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले गेले आणि ५८० दिवस तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील दोषसिद्धी रद्द केली. त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. २०२२ मध्ये त्यांनी तत्कालीन अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचा अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत पराभव केला आणि २०२३ मध्ये पुन्हा अध्यक्षपद स्वीकारले. आताच्या विजयामुळे त्यांचा चौथा अध्यक्षीय कार्यकाळ निश्चित झाला आहे.
लॅटिन अमेरिकेला काय संदेश?
ब्राझीलच्या निवडणूक निकालांनी लॅटिन अमेरिकेतील बदलत्या राजकीय प्रवाहांकडे पुन्हा लक्ष वेधले आहे. या प्रदेशातील मतदारांच्या अपेक्षा देशागणिक बदलत असल्याचे दिसून येते. आर्थिक परिस्थिती, सामाजिक सुरक्षा, गुन्हेगारी आणि राष्ट्रीय सार्वभौमत्व यांसारख्या मुद्द्यांना प्रत्येक देशात वेगवेगळे महत्त्व मिळत आहे. लूला यांच्या पुढील कार्यकाळात अमेरिकेबरोबरचे संबंध हा महत्त्वाचा विषय राहणार आहे. व्यापार, आयात शुल्क आणि गुंतवणुकीच्या प्रश्नांवर ब्राझीलला आपल्या आर्थिक हितसंबंधांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतील. लॅटिन अमेरिकेतील इतर देशांबरोबर सहकार्य वाढवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. देशांतर्गत पातळीवर महागाई, सार्वजनिक सुरक्षा, सरकारी कर्ज आणि राजकीय मतभेद हे प्रश्न कायम आहेत. ब्राझीलच्या संसदेत उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे अस्तित्व असल्यामुळे विविध धोरणांच्या अंमलबजावणीसाठी लूला यांना समन्वय साधावा लागणार आहे. आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवरील कामगिरीवरच त्यांच्या सरकारचे पुढील राजकीय स्थान अवलंबून राहील.
थोडक्यात, ब्राझीलचा हा निकाल म्हणजे नवसाम्राज्यवादी दबावाला दिलेला एक स्पष्ट नकार आणि देशांतर्गत विषमतेविरुद्ध लोकशाही मार्गाने दिलेला लढा आहे. बाह्य शक्तींनी लादलेली आर्थिक प्रारूपे स्थानिक दारिद्र्य आणि शोषणावर मात करू शकत नाहीत, हाच धडा या जनादेशातून अधोरेखित होतो. लूला यांच्या रूपाने लॅटिन अमेरिकेने आपल्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.