सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित ही भगवान महावीरांच्या रत्नकरंडकातील त्रिरत्ने आहेत. ज्ञान व्यवहार आणि चारित्र्य यातील संतुलनाचा मूलभूत विचार भगवान महावीर मांडतात. महात्मा गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मकथेमध्येही महावीरांच्या विचारांचा प्रभाव दिसतो. आज भगवान महावीर यांचा निर्वाण दिन. यानिमित्त...
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
मानवता हे भगवान महावीरांच्या जीवनकार्याचे सार होते. सम्यकता हा त्यांच्या चिंतनाचा प्राण होता. लोकल्याणकारी जीवनाची समग्रता त्यांनी जागतिक पातळीवर नेऊन पोहोचविली. महावीरांच्या समाजचिंतनामध्ये गगनाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य होते. त्यांच्या प्रवचनातील नैतिक मूल्यसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि जीव-अजीवातील समानतेचा विचार हा वर्तमानासंदर्भातही तेवढाच सुसंवादी असल्याचे दिसून येते.मध्यममार्ग हा श्रेष्ठ आणि श्रेयस्कर तसेच उच्च कोटीचा मार्ग होय, असे भगवान महावीर यांंच्या जीवनाचे सूत्र होते. महावीरांनी सम्यकतेचे त्रिविध पैलू रत्नकरंडकात अधिष्ठित केले. त्यातील प्रखर तेज:पुंज असा द्रष्टा विचार अंधारातून प्रकाशाकडे पोहोचण्यासाठी आजही प्रेरक आहे. महावीरांचा विचार हा संघर्षातून समन्वयाकडे जातो व त्यातून नवजीवनाची मांडणी करतो.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी जर्मन विचारवंत हर्मन जॅकोबी यांनी भगवान महावीरांचे विचारचरित्र लिहिले व त्यांचा विचार जगभर पोहोचला. महावीरांनी त्याकाळी अनेकांतवाद जीव-अजीवांची समानता, चरित्राचे संवर्धन, अहिंसा ही मूल्ये उच्चरवाने मांडली. त्यामुळे त्यांच्या प्रागतिक विचारांचे संदेश हे जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचले. विल ड्युरांट यांनी अवर ओरिएंटल हेरिटेज या खंडात त्यामुळे जगभरातील इसवीसन पूर्व 17 व्या शतकात बंडखोरी आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या निषेधाचे शतक म्हटले आहे. कर्मकांड, यज्ञयाग आणि पशुबळी यासारख्या अमानवी प्रथांना तिलांजली देऊन मानवमुक्तीचा नवा जाहीरनामा या दोन महान भारतीय दार्शनिकांनी दिला. प्रगत विचारांची मुहूर्तमेढ रोवण्यात ते जगात पहिले होते.
अहिंसा परमोधर्म
अहिंसा हे भगवान महावीरांनी दिलेले योगदान केवळ भारतालाच नव्हे, तर सबंध जगाला दिशादर्शक ठरले आहे. महावीरांच्या अहिंसा तत्त्वात भ्याडपणा नाही, तर त्यात प्रत्युत्तराचे प्रबळ सामर्थ्यही आहे. आपण अहिंसक आहात याचा अर्थ दुबळे आहोत असा नव्हे, तर त्यामध्ये परचक्राशी सामना करण्याचे सामर्थ्यही आहे. महावीरांच्या या प्रभावी तत्त्वज्ञानामुळे कलिंगसम्राट खारवेलसारखे अनेक वीर या धर्माचे अनुयायी बनले. महावीरांच्या क्रांतदर्शी विचारांचे सार हे त्यांच्या सकारात्मक विचारधारेत आहे. महावीरांच्या अहिंसा तत्त्वामुळे भारतासारख्या एकसंध व अखंड राष्ट्राला प्राचीन काळात अन्य प्रदेशांवर आक्रमण करण्याची गरज पडली नाही. महावीरांच्या विचारांमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील स्वावलंबन, सहजीवन व सहअस्तित्व या कल्पना विकसित झाल्या. महात्मा गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेमध्येही महावीरांच्या विचारांचा प्रभाव दिसतो.
चारित्र्यसंवर्धन प्राणतत्त्व
सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित ही भगवान महावीरांच्या रत्नकरंडकातील त्रिरत्ने आहेत. ज्ञान व्यवहार आणि चारित्र्य यातील संतुलनाचा मूलभूत विचार भगवान महावीर मांडतात. आचार आणि विचार यामधील संतुलनावर त्यांनी भर दिला आहे. आचार्य समंतभद्र यांनी भगवान महावीरांच्या विचारांचे हे सूत्र अत्यंत प्रभावीपणे विकसित केले आहे व त्याआधारे स्वतंत्र स्वयंभू ग्रंथराज रचिला आहे. जैन धर्माचे समाजशास्त्र असे या ग्रंथाचे वर्णन करावे लागते ते खरोखर अर्थपूर्ण आहे.
तत्त्वसार अमृतवाणी
महावीरांच्या जीवनाचे तत्त्वसार हे त्यांच्या अमृतवाणीतून प्रकटले आहे. त्यांच्या प्रवचनात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व एकवटले आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही त्यांच्या तत्त्वज्ञानातील अमर बीजे आहेत. अपरिग्रह व अस्तेय ही तत्त्वे सत्यकथनाचा विस्तार आहेत. आपल्या प्रभावी अमृतवाणीतून महावीरांनी सारा भारतवर्ष मंतरून टाकला होता. कुंडलग्राम केवळज्ञान प्राप्त झाल्यापासून पावापुरी येथे महानिर्वाण होईपर्यंत महावीरांनी अखंड आणि अहर्निश संचार करून आपल्या नैतिक तत्त्वांचा प्रसार केला. जैन धर्मातील भगवान महावीरांच्या योगदानचे खरे तेजाची रूप हे त्यांच्या दूरदर्शी मानवतावादात आहे. त्यांच्या विचार व कार्याने पावन झालेले भारतामधील अनेक पवित्र स्थानाचे वैभव पूर्वीप्रमाणे आजही तेवढेच तेजस्वी राहिले आहे. हिमालयाच्या कैलास शिखरापासून ते दक्षिणमधील तामिळनाडूतील सतन्नवसलपर्यंत ही स्थाने पसरली आहेत. त्यामध्ये महावीरांच्या पवित्र कार्याचे तेजस्वी दर्शन घडते. महावीरांच्या विचाराचे विलक्षण तेज सतत प्रकाशमान होत राहील व नित्य नवा संदेश देत राहील, यात शंका नाही.