प्रा. डॉ. विजय ककडे
भगवान महावीर यांच्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत विचारांची व्यावहारिक अंमलबजावणीच मानवतेला विनाशापासून वाचवू शकते. आज भगवान महावीर जयंती. त्यानिमित्त...
अहिंसेचे दीपस्तंभ भगवान महावीर आज युद्धाच्या पार्श्वभूमीवर केवळ धार्मिक किंवा तात्त्विक अर्थापेक्षाही व्यावहारिक अर्थाने महत्त्वाचे ठरतात. सध्या महावीरांच्या विचाराने पुढे जाणे किंवा संपूर्ण महाविनाश पत्करणे असे दोनच पर्याय दिसतात. सत्ता केंद्रे आणि युद्धतंत्रे माथेफिरूंच्या हाती गेल्यानंतर काय होतं व त्याची किंमत सर्व जगाला कशी द्यावी लागते हे आपण दररोज अनुभवत आहोत. मनुष्य जीवन देवत्वाकडे किंवा पशुत्वाकडे जाण्याच्या दोन्ही संभाव्यता असतात. यातील पहिली संभाव्यता भगवान महावीरांच्या विचारातून त्याचा व्यवहारात वापर करण्यात होणार आहे. अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत या तत्त्व त्रयीच्या आधारे स्वीकारलेली जीवन पद्धती अंतिमतः सर्व मानवी समाज कल्याण साध्य करू शकेल.
अहिंसेचा विचार केवळ जीव हिंसा किंवा दुसर्याचे प्राण घेणे एवढ्यापुरता मर्यादित नाही. अहिंसा ही जीव हिंसा अतिरिक्त वस्तुसंग्रहाची हिंसाआणि विचारांची हिंसा अशा तीन स्तरावर लक्षात घेणे आवश्यक आहे. माझ्याइतकाच दुसर्याचादेखील जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे हिंसा योग्य ठरत नाही. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सर्व जीवांचा आत्मा सारखाच असल्याने मी माझीच हत्या करत असतो, ही भावना तयार झाल्यास विचार व कृती अहिंसक होतात. माझ्या जवळ सर्व सत्ता संपत्ती अधिकार असलेच पाहिजेत, या आग्रही भूमिकेतून हिंसेचा जन्म होतो.
अनाग्रह हाच आहिंसेचा पाया आहे. वस्तूंच्या संग्रहातून निर्माण होणारा परिग्रह हा मर्यादित करणे हे पहिले सूत्र अहिंसेच्या वाटेवरील आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्टींचा साठा करणे, त्याची उपयुक्तता - आवश्यकता न पाहता केवळ हव्यासातून त्या घेतल्याने ज्यांना अशा वस्तू आवश्यक आहे त्यांना त्यापासून आपण वंचित करतो. म्हणून गरजेइतकेच परिग्रह करणे याला परिमाण परिग्रह असे म्हटले जाते. यातील टोकाचा अपरिग्रह हा दिगंबर जैन मुनींच्या आचरणात दिसतो. तथापि सर्वसामान्य गृहस्थाच्या द़ृष्टीने वस्तूंच्या मर्यादित वापराला संग्रहाला मान्यता आहे. खरे तर आपल्याकडील सर्वोत्कृष्ट वस्तू देणे यातूनच खरा अपरिग्रह व्यक्त होतो. पाश्चात्त्य देशांमध्ये मिनीमिलिझम किंवा किमानवाद या स्वरूपात तो विकसित होत आहे. या बाजार गुलामगिरीतून सुटका करण्यास अपरिग्रह हे महत्त्वाचे साधन ठरते.
अहिंसेचा सर्वात सूक्ष्म परंतु प्रभावी असणारा घटक म्हणजे विचार हिंसा होय. दुसर्याच्या अहिंसेच्या विचारांशी सहमत न होता केवळ आपलाच विचार योग्य आहे, बरोबर आहे, सत्याचा आहे, असा भ—म करून सध्याचे युद्ध सुरू आहे. खरे तर वैयक्तिक पातळीवर देखील आपण असे युद्ध करत असतो. दुसर्याच्या विचारावर आक्रमण करून आपण आपले विचार बळजबरीने लादत असतो. यातून कलह, संघर्ष आणि हिंसा जन्म घेते. यावर अनेकांत तत्त्व हा अत्यंत महत्त्वाचा उपाय ठरतो. अनेकांत तत्त्व हा सम्यक विचाराचा पाया आहे. प्रत्येक घटनेकडे पाहात असताना त्याची दुसरी बाजूदेखील विचारात घेणे महत्त्वाचे ठरते. यातूनच स्यादवाद म्हणजे तसेही असू शकेल, असा विचार पुढे आला. त्याचेही मत बरोबर असू शकेल, ही भूमिका घेतल्यानंतर संघर्ष संपतो.
हा स्यादवाद महत्त्वपूर्ण घटक असून एखादी घटना सात विभागातून किंवा द़ृष्टिकोनातून व्यक्त होते. उदा. मातीचे मडके. हे मातीचे मडके आहे हा आस्तीवाद ठरतो तर हे धातूचे भांडे नाही हा नास्तीवाद झाला. तर आस्ती-नास्ती, नास्ती-नास्ती असा सप्तदृष्टीने ‘नयवाद’ व्यक्त होतो. सध्याची तंत्रप्रगती, विचारविविधता ही वैविध्यपूर्णता वाढवणार असून सप्तभंगी नय या विचार प्रगल्भतेचा दर्शक ठरतो. महावीरांच्या अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत या तत्त्व त्रयीचा उपयोग करणे अपरिहार्य ठरते. महावीरांच्या जन्मकल्याणक पुण्यपर्वानिमित्त आपण वैयक्तिक स्तरावर महावीरांच्या या महावाणीचा स्वीकार करून आपले जीवन समृद्ध करूया आणि धोरण ठरवणारेदेखील याच मार्गाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा ठेवूया.