संपादकीय

Lok Sabha Elections : मशागतीचा काळ..!

दिनेश चोरगे

संंपूर्ण वर्षाचे नियोजन न चुकता कुणाला करावे लागत असेल, तर ते शेतकरी बांधवांना. याचे कारण म्हणजे त्याचे संपूर्ण आयुष्य त्या शेतीवर अवलंबून असते. कोणती पिके घ्यायची, त्याची पेरणी कधी करायची, त्याच्या आधी जमिनीची मशागत कशी करायची या सगळ्या गोष्टींचे नियोजन केल्याशिवाय शेतकर्‍याच्या आयुष्यामध्ये पीक घेणे शक्य होत नाही. अस्मानी आणि सुलतानी या दोन्ही प्रकारच्या संकटांचा सामना त्याला करावा लागतो. सध्या मतपेरणीचा काळ आहे. येणार्‍या काळामध्ये असंख्य निवडणूका येऊ घातल्या आहेत. (Lok Sabha Elections)

लोकसभा निवडणुकांसाठी जी मतपेरणी केली जाते ती सर्वोच्च पातळीवरून म्हणजे ड्रोनच्या साह्याने बियाणे जमिनीवर भिरकावणे या पद्धतीने केली जाते. ही राष्ट्रीय पातळीवरील पेरणी असते. ड्रोन चालवणारा जेव्हढा पावरफुल्ल असेल तेवढे पीक भरभरून येते. सध्य परिस्थितीला या राष्ट्रीय पातळीवरील मतपेरणीसाठी पंतप्रधान श्रीमान मोदी यांचे ड्रोन देशभर फिरत आहेत. या हवाई पेरणीला किती जोमाने पीक येते, हे लवकरच पाहायला मिळेल.

विधानसभा निवडणुकांची पेरणी ही धूळपेरणी असते. म्हणजे यासाठी विशेष जमीन तयार करण्याची गरज नाही. नांगरट करणे, तण काढणे ही कामे केली; पण जुजबी पद्धतीने केली जातात. यात शेतकरी टोपल्यात बियाणे घेऊन हाताने ते बियाणे सर्वत्र फेकत असतो, म्हणून याला धूळपेरणी असे म्हणतात. आजच्या परिस्थितीला घड्याळ, कमळ, धनुष्यबाण, तुतारी, मशाल, पंजा इत्यादी चिन्हे हातात घेऊन आपापल्या पक्षाची पेरणी करण्यासाठी राजकीय नेते मोठ्या उमेदीने बाहेर पडले आहेत.

यापेक्षा अवघड पेरणी असते ती म्हणजे महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांची आणि त्याहीपेक्षा अवघड पेरणी असते ती मनपा, नपा आणि ग्रामपंचायत यांची. निवडणूक लढवायची असेल, तर फार नियोजन करावे लागते. आधी उन्हाळ्यामध्ये जमीन भरपूर तापवून घ्यावी लागते. दिवस-रात्र कष्ट करून ढेकळे फोडून माती खाली- वर करावी लागते. म्हणजे या निवडणुकीमध्ये स्थानिक संपर्क किती आहे, याला फार महत्त्व आहे. शिवाय तुमचे पीक जोमाने येऊ नये म्हणून असंख्य विरोधी उमेदवार तयार असतात. त्यांचा डोळा चुकवून आपले पीक कापून घरी आणून ठेवावे लागते. म्हणजेच ईव्हीएम मशिनमध्ये मतदान करून घ्यावे लागते. त्यामुळे ही पेरणी सर्वात कठीण समजली जाते. या विविध प्रकारच्या पेरण्यांमध्ये दुबार पेरणी करण्याचीही सोय उपलब्ध असते; पण त्यासाठी सुमारे पाच वर्षे थांबावे लागते. म्हणजे या वेळेला पीक आले नाही, तर लगेच दुबार पेरणी करून पीक घेण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु निवडणुका मात्र दर पाच वर्षांनी येत असल्यामुळे तत्काळ दुबार पेरणीची सोय राजकीय प्रक्रियेमध्ये नाही. त्यासाठी संयम ठेवून पाच वर्षे पुन्हा तयारी करणे आणि मतपेरणी करून भरघोस पीक घेणे एवढेच राजकीय शेतकर्‍यांच्या हातात असते. सध्या महाराष्ट्रात मतपेरणीचे दिवस आहेत. मतपेरणी करणारा शेतकर्‍याचा हात यावेळी मोकळा असतो. त्यामुळे जनतेने त्याच्या मोकळ्या आणि ओल्या हातातून जे काय मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतपेरणीने कोणत्याही पक्षाचे स्थान बळकट होते आणि त्याचा फायदा निवडणुकीत होतो, असा आतापर्यंत अनुभव आहे. त्यामुळे सत्ताधारी सरकार बजेटमध्ये अनेक योजनांची पेरणी करून मतदानापूर्वीची मशागत करत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT