राजेंद्र जोशी
कोरोनानंतरच्या काळात जगातील युद्धांचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. आता केवळ रणांगणावरची लढाई नव्हे, तर पुरवठा साखळीवरील नियंत्रण निर्णायक ठरत आहे. तेल, अन्न, औषधे आणि कच्चा माल यांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होताच जागतिक अर्थव्यवस्था हादरते. यामुळे आधुनिक युद्धात लॉजिस्टिक ही अद़ृश्य पण अत्यंत प्रभावी शक्ती म्हणून समोर आली आहे.
कोरोना समाप्त होताच जगावर युद्धाचे ढग अधिक गडद झाले. रशिया-युक्रेन यांच्या दरम्यान युद्धाची पडलेली ठिणगी अग्निलोळामध्ये रूपांतरित झाली आहे. इस्रायल-हमास युद्धाने गाझा पट्टी बेचिराख केली आणि पाठोपाठ सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाने जागतिक अर्थव्यवस्थेची कोंडी केली. या युद्धामध्ये अमेरिका व रशिया या जगातील दोन अण्वस्त्रधारी बलाढ्य महासत्ता आणि इस्रायल हा अत्याधुनिक संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रातील सुसज्ज देश एका बाजूला आणि दुसर्या बाजूला ड्रोनच्या सहाय्याने लढणारा युक्रेन आणि अण्वस्त्र कार्यक्रमापासून ज्याला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा इराण दुसर्या बाजूला अशी स्थिती आहे; परंतु युक्रेन काय अथवा इराण काय, या दोन तुलनेने संरक्षणद़ृष्ट्या अत्यंत कमकुवत असलेल्या देशांना नमविणे महासत्तांना सहज शक्य झाले नाही.
उलट जगातील सर्वांत मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेला शस्त्रसंधीसाठी इराणसमोर गुडघे टेकण्याची वेळ आली. याला युद्धाचे नवे तंत्र जबाबदार आहे. यामध्ये पुरवठा साखळीवरील नियंत्रण सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते आहे. होमुर्झ समुद्रधुनीवरील इराणच्या ताब्याने हे सिद्ध केले आहे. होमुर्झचे नियंत्रण इराणकडे असल्यामुळे सार्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. यामुळे आजचे युद्ध हे भूभाग जिंकण्यापुरते मर्यादित राहिले नसून, ज्याचे नियंत्रण पुरवठा साखळीवर तोच युद्धाच्या सारीपाटावर प्रभावी ठरतो, हा नवा सिद्धांत तयार झाला आहे.
पारंपरिक युद्धात युद्ध म्हटले की, सर्वसाधारणपणे रणांगण, सीमा, शस्त्रास्त्रे आणि राजकीय डावपेच हे डोळ्यासमोर येतात; मात्र आधुनिक युद्धाचे खरे परिणाम बंदरामध्ये, समुद्रामार्गामध्ये आणि जागतिक पुरवठा साखळीत दिसून येतात. तेल, धान्य, औषधे आणि औद्योगिक कच्चा माल यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला की, त्याचे पडसाद थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटतात. अशा स्थितीत ही वाहतूक किती सुलभ राहते आणि ती सुलभ करण्यामध्ये योगदान कोणाचे, याला सर्वाधिक महत्त्व असते.
सध्याच्या रशिया-युक्रेन वा अमेरिका-इस्रायल आणि इराण या दोन्ही युद्धांमध्ये ही पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यामध्ये जगातील आंतरराष्ट्रीय शिपिंग व लॉजिस्टिक कंपन्यांनी मोठी जबाबदारी बजाविली. यामध्ये जर्मनीस्थित ‘हॅपॅग लॉईड’ या जगातील अग्रगण्य कंटेनर शिपिंग कंपनीने बजाविलेली भूमिका प्रशंसनीय मानली जाते आहे. ‘हॅपॅग लॉईड’ ही जगातील 130 देशांहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली कंपनी आहे. तिच्याकडे 250 पेक्षा अधिक कंटेनर जहाजांचा ताफा आहे आणि जगातील 600 हून अधिक बंदरांशी या कंपनीची थेट कनेक्टिव्हिटी आहे. कंटेनर, बल्क आणि विशेष माल वाहतूक यांसह ऊर्जा, धान्य, औद्योगिक कच्चा माल आणि एफएमसीजी उत्पादनांच्या पुरवठ्यात ही कंपनी सक्रिय आहे.
युद्धाच्या काळात अशा कंपन्यांना पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी मोठी जोखीम स्वीकारावी लागते. यासाठी धोकादायक समुद्री क्षेत्र टाळून पर्यायी मार्ग निश्चित करावा लागतो. युद्ध क्षेत्राजवळील बंदराऐवजी अन्य सुरक्षित बंदरांचा वापर करावा लागतो. जहाजांच्या सुरक्षाविषयक प्रोटोकॉलमध्ये वाढ करणे, विमा खर्च व जोखीम व्यवस्थापनाचे पुनर्मूल्यांकन करणे, कंटेनरचे पुनर्वितरण करणे, आवश्यक वस्तूंची प्राधान्य देऊन पुरवठा साखळी कायम ठेवणे आणि ग्राहकांना रियल टाईम माहिती उपलब्ध करून देणे या जबाबदार्या युद्धकाळात ‘हॅपॅग लॉईड’ने लिलया पार पाडल्या. यामुळेच युद्धकाळातही जगाची पुरवठा साखळी खंडित झाली नाही. युद्धकाळात ‘हॅपॅग लॉईड’सारख्या कंपन्या प्रत्यक्ष दिसत नसल्या, तरी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी त्या ऑक्सिजन पुरवितात. यामुळेच आधुनिक युद्धाच्या समीकरणात लॉजिस्टिक ही अद़ृश्य पण निर्णायक शक्ती म्हणून उदयास आली आहे.
जगाचा भूतकाळ 350 वर्षे मागे नेला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे युद्धाचे तंत्र किती प्रभावी होते, याची जाणीव आजही होते. यामुळेच इस्रायलसारख्या अत्याधुनिक संरक्षण सज्ज लष्कराला शिवछत्रपती आपले आजही आदर्श वाटतात. शत्रूची रसद तोडणे आणि मूठभर सैन्यानिशी हजारोंच्या सैन्यावर तुटून पडणे, हे छत्रपतींच्या गनिमी काव्याचे गमक होते. 1939 ते 1945 या दरम्यान दुसर्या महायुद्धातही पुरवठा साखळी हीच विजयाची गुरुकिल्ली ठरली होती. दुसर्या महायुद्धात जर्मनीने अॅटलांटिक महासागरात मित्रराष्ट्रांच्या जहाजांवर हल्ले करून पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमेरिकेने लेंड-लीज कार्यक्रमाद्वारे बि—टन व सोव्हिएत युनियनला सामग्री पुरविली. स्टॅलिनग्राडच्या लढाईवेळी (1942-1943) जर्मन सैन्याने रशियात मुसंडी मारली होती; पण केवळ पुरवठा साखळीतील खंडामुळे जर्मनीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गल्फ युद्ध असो वा 1955 ते 1975 या प्रदीर्घ कालावधीतील अमेरिका-व्हिएतनाम युद्ध असो. व्हिएतनामच्या जंगलातून जाणारा ‘हो ची मिन्ह ट्रेल’ या लवचिक पुरवठा साखळीने अमेरिकेच्या नाकी दम आणला होता. यानंतर कारगिल युद्ध असो आणि रशिया-युक्रेन युद्ध. प्रत्येक ठिकाणी पुरवठा साखळीने आपली महत्त्वाची भूमिका बजावली. गल्फमधील युद्धात अमेरिकेने काही आठवड्यांत लाखो टन सैनिकी साहित्य मध्यपूर्वेत पुरविले. ही केवळ सैन्याची नव्हे, तर लॉजिस्टिकची ताकद होती. या युद्धांनी आता जगामध्ये पुरवठा साखळी टिकून राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय शिपिंग व लॉजिस्टिकचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यामुळेच अमेरिका आणि इस्रायल एकीकडे इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत असताना युद्धाच्या समेटाची चर्चा होमुर्झ समुद्रधुनीच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर केंद्रित झाली आहे. स्वाभाविकच, युद्ध गोळ्या, बंदुका आणि क्षेपणास्त्रांच्या जोरावर जिंकता येत असले, तरी युद्ध टिकविण्यासाठी पुरवठा साखळीवरचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इराणने दाखवून दिले आहे.