उभा राहणारच! (Pudhari File Photo)
संपादकीय

Local Elections | उभा राहणारच!

काय मित्रा, एवढी कसली तयारी चालली आहे? नगरपरिषदेला वार्डातून उभा राहतोस की काय? अरे म्हणजे काय? उभा राहणारच आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये उभा राहिलो तिन्ही वेळेला पडलो; पण धीर सोडला नाही, हिंमत खचली नाही. एक बार फिर लढेंगे.

पुढारी वृत्तसेवा

काय मित्रा, एवढी कसली तयारी चालली आहे? नगरपरिषदेला वार्डातून उभा राहतोस की काय?अरे म्हणजे काय? उभा राहणारच आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये उभा राहिलो तिन्ही वेळेला पडलो; पण धीर सोडला नाही, हिंमत खचली नाही. एक बार फिर लढेंगे.

ते ठीक आहे; पण कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आहेस, याचा काही विचार झालाय का? अरे तसे काही आता राहिले नाही. आता जो पक्ष तिकीट देईल, त्याच्याकडून उभे राहायचे. नाहीच कुणी दिले तर आपण अपक्ष आहोतच की. पक्षाचा फायदा एवढाच होतो की, निवडणूक चिन्ह लोकांच्या ओळखीचे असते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे जाते. बाकी काय, निवडणुका कशा जिंकायच्या, हे तुला माहितीच आहे.

नाही रे, मला फारशी माहिती नाही. जे काय वर्तमानपत्रातून, बातम्यातून असते तेवढीच मला माहिती आहे. मागच्या निवडणुकीला तू पडलास तेव्हा नेमके काय झाले होते? अरे बाबा, काय कथा सांगायची? माझ्या घरामध्ये एकूण 20 मते आहेत आणि त्यातली मला फक्त बारा मते पडली. माझ्या आई-वडिलांनीसुद्धा मला मतदान केले नाही.

काय सांगतोस? कसं काय?

अरे अजिबात नाही. माझ्या वडिलांना नेहमी वाटते की, मी जर नगरसेवक म्हणून निवडून आलो तर पाच वर्षांत एवढा बिघडून जाईन की पुन्हा सुधारणे शक्य होणार नाही. त्यांनी आयुष्यामध्ये एकही चांगला नगरसेवक पाहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी मला मतदान केले नाही. घरातल्या लोकांनीच मतदान केले नाही, तर ज्या लोकांची मी पाच वर्षे कामे केली त्यांनीही मतदान केले नाही. मग मी निवडून कसा येणार सांग. शिवाय मला चिन्ह मिळाले ते कपबशी. मी घरोघर प्रत्येकी एक डझन कपबश्या वाटल्या. लोक आजही त्यातून चहा पितात; परंतु त्यांनी मला मतदान केले नाही, हे मात्र निश्चित आहे.

नशीब तुझे तुला टीव्ही चिन्ह मिळाले नाही. नाहीतर घरोघरी टीव्ही वाटायला लागले असते आणि पैशाची वाट लागली असती. पैशाची तर वाट अशीही लागलीच आहे. मागच्या इलेक्शनच्या वेळेला पाच एकरचा तुकडा विकला होता. या इलेक्शनला तीन एकरचा तुकडा काढला आहे विकायला. सगळी जमीन गेली तरी चालेल; पण निवडणुकीला उभा राहणार म्हणजे राहणारच!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT