लिथियममधील ‘आत्मनिर्भर’तेकडे... Pudhari File Photo
संपादकीय

lithium Self Reliance India | लिथियममधील ‘आत्मनिर्भर’तेकडे...

संपूर्ण जग सध्या जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.

पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण जग सध्या जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा, मिथेन, हायड्रोजन, इतकेच नव्हे तर समुद्राचे पाणी, यासारख्या पर्यायांचा इंधनासाठी वापर करून पाहिला जातोय. या प्रयत्नांमधून तूर्त तरी विद्युतऊर्जेचा इंधन म्हणून वापर केला गेल्यास तो अधिक प्रभावी आणि व्यवहार्य ठरतो, असे दिसून आले आहे. विद्युत वाहनांमध्ये ही ऊर्जा तयार करण्यासाठी ज्या बॅटरीचा वापर केला जातो, त्यामध्ये लिथियम हा महत्त्वाचा घटक असतो.

रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

जागतिक अर्थकारण आणि राजकारणात अलीकडील काळात रेअर अर्थ मिनरल्स म्हणजेच दुर्मीळ खनिजांचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. चीनने तर या खनिजसाठ्यांच्या जोरावर अमेरिकेसारख्या महासत्तेची आणि त्यांच्या हेकेखोर राष्ट्राध्यक्षांची मस्ती जिरवली आहे. याचे कारण ही खनिजे विविध उद्योगांचा पायाभूत आधार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील राजस्थानमध्ये अलीकडेच सापडलेल्या लिथियमच्या साठ्याकडे पाहावे लागेल. आजघडीला बोलिव्हियामध्ये 21 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे. याखेरीज अर्जेंटिनामध्ये 17 दशलक्ष टन, ऑस्ट्रेलियामध्ये 6.3 दशलक्ष टन आणि शेजारी चीनमध्ये 4.5 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे.

मुळात 21 व्या शतकात बॅटरींना तेलाइतके महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या नवीन खेळात चीनने बाजी मारली आहे. माईनिंगपासून रिफायनिंग, बॅटरी उत्पादनापासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत चीनने दशकांपूर्वीची योजना, सबसिडी आणि उत्कृष्ट अंमलबजावणी यांचा उपयोग करून लिथियमची अशी पुरवठा साखळी तयार केली आहे की, इतर कोणताही देश त्याची स्पर्धा करू शकत नाही. 2026 पर्यंत चीन ऑस्ट्रेलियाला मागे टाकून जगाचा सर्वात मोठा लिथियम उत्पादक होणार आहे. ऑस्ट्रेलियाजवळ जरी जास्त साठे असले, तरी चीनने लॅटिन अमेरिकेमधील लिथियम ट्रायंगल आणि आफ्रिकेतील मिनरल बेल्टमध्ये मोठी गुंतवणूक करून पुरवठा साखळी सुनिश्चित केली.

लिथियम हे पर्यावरणपूरक पद्धतीने जीवनाला अनुकूल बनवण्यास उपयुक्त असल्याने अलीकडील काळात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले आहे. याचे कारण आज संपूर्ण जग जीवाश्म इंधनाला पर्यायाच्या शोधासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. यासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा, मिथेन, हायड्रोजन, इतकेच नव्हे तर समुद्राचे पाणी यासारख्या अनेकविध पर्यायांचा इंधनासाठी वापर करून पाहिला जात आहे. या प्रयत्नांमधून तूर्त तरी विद्युतऊर्जेचा इंधन म्हणून वापर केला गेल्यास तो अधिक प्रभावी आणि व्यवहार्य ठरतो, असे दिसून आले आहे. विशेषतः, दळणवळणाच्या क्षेत्रात वाहनांसाठी विद्युतऊर्जेचा वापर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, त्याचे फायदे समोर येताहेत. आज भारतात इलेक्ट्रिक कार, दुचाकी, बसेसची संख्या वेगाने वाढत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वेगाने वाढत असला, तरी बॅटर्‍यांमध्ये आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. जवळजवळ प्रत्येक विद्युत वाहनांमध्ये चीनची बॅटरी आहे; पण भारत या क्षेत्रात आता वेगाने पुढे येत आहे. अलीकडेच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील डेगाना भागातील रेवंत पर्वतात अंदाजे 14 दशलक्ष टन लिथियमचे भांडार सापडले आहे. हा लिथियमचा मोठा खजिना फक्त राज्यासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी क्रांतिकारी ठरू शकतो. मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक वाहने आणि रिचार्जेबल बॅटर्‍यांसाठी महत्त्वाचे असणारे लिथियम आता देशात उपलब्ध होणार असल्यामुळे चीनवर असलेले आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात येईल, असे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT