मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबद्दलची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी महाराष्ट्राचे मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिल्याने, ही सर्व प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. अकरा वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडी सरकार, 2014 मध्ये सत्तेत असलेले भाजप-शिवसेनेचे सरकार तसेच त्यानंतर महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सरकारनेही या प्रश्नाचा पाठपुरावा केला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मराठीसोबत पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांनाही हा दर्जा मिळाला. भारतीय परंपरेत मराठीला कायमच मोलाचे स्थान आहे. आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा मार्ग प्रशस्त झाला असून अनेक लोकांना ही भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अभिजात भाषा या भारताच्या पुरातन वारशाचे जतन करण्याचे काम करत असतात. तसेच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक-सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व त्यातून प्रतीत होत असते. हा दर्जा मिळण्यासाठी अनेक मराठी भाषेत विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत, मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यात आले. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मायमराठीला हा बहुमान मिळाला. त्यावेळी महाराष्ट्रात आनंदाची एक लहर पसरली.
20 वर्षांपूर्वी भारत सरकारने विविध भाषांना अभिजात भाषा ही नवी श्रेणी देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी तमिळ भाषेला पहिल्यांदा हा दर्जा देण्यात आला. आता अभिजात भाषा ठरल्यामुळे, मराठीसाठी केंद्र सरकार पुरेसा निधी देईल आणि अनुषंगिक बाबी सोप्या होतील, अशी अपेक्षा आहे. दिल्लीतील मराठी शाळा सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, ही चांगली बाब आहे. पण, राज्यातील शाळांचीही गुणवत्ता उंचावण्याची गरज असून, तेथे मराठी भाषा उत्तमरीत्या शिकवण्यासाठी सर्व त्या सेवासुविधा पुरवण्याची गरज आहे. मराठी भाषेचे चांगले शिक्षक तयार झाले पाहिजेत आणि शाळा व महाविद्यालयांतील ग्रंथालयांत भाषेतील श्रेष्ठ ग्रंथ असतील, यासाठी सरकारने सर्व ती मदत केली पाहिजे. आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील सीबीएसई, आयसीएसईसह सर्व केंद्रीय शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षांपासून मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे हे स्वागतार्ह आहे. यामुळे कोणतीही पळवाट न शोधता इंग्रजी शाळांतही मराठी विषय बंधनकारक असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळेही मराठीचा जागर होण्यास मदत होणार आहे. जागतिकीकरणामुळे जगातील विविध भाषा, संस्कृती व लोकांचा परिचय आणि माहिती एकमेकांना होत आहे. पण, त्याचसोबत जागतिकीकरणाच्या विळख्यात या वेगवेगळ्या सांस्कृतिक अस्मिता व ओळख नष्ट होत आहेत. जागतिक पातळीवर भाषा, साहित्य, संगीत, चित्रपट या सांस्कृतिक अंगांमध्ये सारखेपणा आणून, वैश्विक खेड्यातील माणसांची तथाकथित जागतिक संस्कृती निर्माण होत आहे.
जागतिकीकरणाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही. त्यामध्ये प्रमुख म्हणजे, विविध जनसमूहांच्या भाषा नष्ट होत आहेत. युनेस्कोच्या अहवालानुसार, आज जगातील 6 हजार भाषांपैकी निम्म्या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासानुसार, भारतात 22 अधिकृत भाषा असल्या, तरी विविध पोटभाषा मिळवून 780 भाषा बोलल्या जातात. पण, गेल्या 50 वर्षांत भारतातील 220 भाषा नष्ट झाल्या असून, येत्या 50 वर्षांत आणखी 150 भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मातृभाषेऐवजी इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याकडे कल प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील शाळा पटापट बंद होत आहेत. भारतात विविध भाषांच्या एकूण 86 लिप्या होत्या, त्या वेगाने नष्ट होऊन, मोठ्या प्रमाणावर रोमन लिपीचा वापर होऊ लागल्याचे दिसते. सुदैवाने नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर भर देण्यात आला आहे. दोन हजार वर्षांपूर्वी वाशिमच्या गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने उत्तरेत जाऊन ‘बृहत्कथा’ हा ग्रंथ ‘पैशाची’ या प्राकृत भाषेत लिहिला. या ग्रंथात अनेक प्रकरणे ही मराठी भाषेतील आहेत. श्रीलंकेत दोन हजार वर्षांपूर्वी ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ हे ग्रंथ लिहिले गेले. त्यात बर्याच मराठी भाषकांचा उल्लेख आहे. ‘विनयपिटक’ या अडीच हजार वर्षांपूर्वी उत्तर भारतात लिहिलेल्या बौद्ध ग्रंथात ‘महाराष्ट्र’ हा प्रदेशवाचक उल्लेख आहे.
वैदिकपूर्व भाषांमधून संस्कृतचा जन्म झाला तसाच मराठीचाही. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मराठी अभिजात भाषाविषयक समितीने असे अनेक ठोस पुरावे अहवालात दिले होते. मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. मराठी ही जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा आहे आणि 72 देशांत ती बोलली जाते. आता देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मराठीतील दस्तावेजीकरण वगैरे कामे आता गतीने हाती घेता येतील; मात्र विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा आजही इंग्रजीच असून, या क्षेत्रातील मराठी प्रतिशब्दांचे काम अधिक कसदारपणे होण्याची गरज आहे. मराठी भाषाविषयक संशोधनास प्रोत्साहन दिले पाहिजे. लहान मुलांना मराठी भाषेची गोडी लागेल, अशा पद्धतीची पुस्तके प्रथितयश लेखकांकडून लिहून घेता येतील. या सर्व उपक्रमांमध्ये असंख्य तरुणांना रोजगारही मिळू शकेल; मात्र भाषेत अधिक पायाभूत संशोधनात्मक कामे होणे आवश्यक असून, या भाषेला पुन्हा प्रतिष्ठेचे आणि वैभवाचे स्थान मिळवण्यासाठी सरकारी व खासगी पातळीवर समन्वयाने काम होणे आवश्यक आहे. परकीयांनाही मराठीत शिक्षण घ्यावे किंवा ती भाषा यावी, याचे अधिक आकर्षण निर्माण झाले पाहिजे. दर्जा तर मिळाला आता कसोटी मोठी आहे!