Russian oil sanctions lift | युद्धामुळे रशियाची चांदी (Pudhari File Photo)
संपादकीय

Russian oil sanctions lift | युद्धामुळे रशियाची चांदी

पुढारी वृत्तसेवा

युद्ध आता लवकरच संपेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी म्हटले होते. परंतु त्यांचा ‘लवकर’ केव्हा उजाडणार, याची कल्पना नाही. युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये 1500 पेक्षा जास्त आणि लेबनॉनमध्ये हजारावर लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इराणने इस्रायलवर 400 क्षेपणास्त्रे डागली असून, त्यापैकी 92 टक्के निकामी करण्यात आल्याचा इस्रायलचा दावा आहे. अमेरिका व इस्रायलच्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाणी व ऊर्जा क्षेत्रांतील इराणच्या पायाभूत सुविधांची अपरिमित हानी झाली आहे. अणुकेंद्रांजवळ हल्ले केले जात असल्याने हे युद्ध धोकादायक टप्प्यावर आल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला असला, तरी याची कोणालाही फिकीर नाही. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलची हवाई सुरक्षा भेदून दिमोना आणि अराद या शहरांना रविवारी लक्ष्य केले. ही दोन्ही शहरे इस्रायलच्या अणुप्रकल्पापासून जवळ आहेत. इराणच्या नतांझ अणुप्रकल्पाला लक्ष्य केल्याचा सूड इराणने उगवलेला दिसतो. इस्रायलमध्ये उत्सर्जनाचा कोणताही धोका नसल्याचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने म्हटले असले, तरी उद्या तो निर्माण होऊच शकणार नाही, याची शाश्वती नाही. एकीकडे इराणविरोधातील लष्करी कारवाई आटोपती घेण्याचा आपण विचार करत आहोत, असे ट्रम्प यांनी पुन्हा म्हटले असले तरीदेखील त्यांच्या प्रशासनाने युद्धासाठी 200 अब्ज डॉलरचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यासाठी काँग्रेसकडे विनंती केली आहे.

इराणच्या लष्कराने हिंद महासागरातील दिएगो गार्सिया येथील ब्रिटन आणि अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला चढवला. चगोस बेटाचा भाग असलेले दिएगो गार्सिया इराणपासून 4000 किलोमीटर अंतरावर असूनही इराण हा हल्ला घडवू शकला. याचा अर्थ इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ झाली आहे. इराणची क्षेपणास्त्र क्षमता आपण संपुष्टात आणली असल्याचा अमेरिकेचा दावा बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. पश्चिम व दक्षिण आशिया आणि पूर्व आफ्रिकेतील सुरक्षात्मक कारवायांसाठी दिएगो गार्सिया हवाई तळ अमेरिकेच्या द़ृष्टीने महत्त्वाचा आहे. यापूर्वी व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान तसेच येमेनवर हल्ले करण्यासाठी अमेरिकेने या तळाचा वापर केला होता. इराणने दिएगो गार्सिया तळावर केलेल्या हल्ल्यातून त्यांची युरोपात आतपर्यंत जाण्याची आणि संपूर्ण जगाला संकटात टाकण्याची क्षमता स्पष्ट झाली आहे. इराण आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारी मार्ग रोखून संपूर्ण जगाला वेठीस धरत आहे, अशी टीका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली आहे. मात्र इराणची कुरापत प्रथम आपणच काढली याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. थोडक्यात, या युद्धाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आवाहनास कोणीही भीक घालत नाही, अशी परिस्थिती आहे.

चीनचा आणि खास करून रशियाचा पूर्ण पाठिंबा असलेला इराण, दीर्घकाळ चालणार्‍या या युद्धात इस्रायल-अमेरिकेकडून पराभूत होणे हे अवघड असल्याचे आरंभापासूनच स्पष्ट झाले होते. नवरोजनिमित्ताने इराणला शुभेच्छा संदेश पाठवताना रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी, आम्ही इराणचे निष्ठावान सोबती आहोत, असे उद्गार काढले आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला मुज्तबा खामेनी यांना पुतीन यांनी खास संदेश पाठवले आहेत. अली खामेनी यांच्या हत्येचा पुतीन यांनी पुन्हा एकदा धिक्कार केला आहे. रशिया-इराण युती अंतर्गत रशिया इराणला अमेरिकन आणि इस्रायली लष्करी तळांची, युद्धनौकांची आणि विमानांची रिअल टाईम गुप्तचर माहिती पुरवत आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी मालमत्तांना लक्ष्य करण्यासाठी इराणला या माहितीचा उपयोग होत आहे. अमेरिकन सैन्याची ठावठिकाणे, रडार व हवाई सुरक्षा यंत्रणेचे अचूक तपशील रशिया पुरवत आहे. रशियाने अत्याधुनिक लष्करी सामग्री इराणला पुरवली आहे. अझरबैझानमार्गे इराणला मदत पाठवून रशियाने उभय देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध द़ृढ केले आहेत. रशिया इराणला र्डी-35 लढाऊ विमानांच सुटे भाग आणि एस-300 क्षेपणास्त्र प्रणालीच्या दुरुस्तीसाठी मदतही करणार आहे. रशियाच्या तेल विक्रीवरील निर्बंध उठवण्यात आल्यामुळे या युद्धात रशियाची चांदी झाली आहे.

रशियाच्या केंद्र सरकारच्या महसुलात हायड्रोेकार्बन उत्पन्नाचा वाटा 40 ते 45 टक्के इतका आहे. म्हणूनच तेलाचे भाव जसजसे वाढत आहेत, तसतशी रशियाच्या तिजोरीत भर पडत आहे. शिवाय अमेरिकन आणि इस्रायली कारवायांमध्ये प्रिसिजन गाइडेड शस्त्रे, पॅट्रिएट इंटरसेप्टर्स आणि अन्य सामग्री मोठ्या प्रमाणात पुरवली जात आहे. ही सामग्री एरवी युक्रेनच्या संरक्षणासाठी वापरली जाऊ शकली असती. त्यामुळे याद़ृष्टीनेही मॉस्कोचा फायदाच आहे. सीरियामधील बशर अल असद राजवटीच्या पतनानंतर तेथील रशियाचा प्रभाव कमी झाला. युद्धात इराणमधील ड्रोन उत्पादन सुविधा उद्ध्वस्त झाली असून, त्यामुळे रशियाच्या द़ृष्टीने महत्त्वाची पुरवठासाखळी विस्कळीत झाली आहे. उद्या इराणमधील विद्यमान सत्ता कोसळल्यास रशियाला मध्य पूर्वेतील एक महत्त्वाचा भागीदार गमवावा लागणार आहे.

यापूर्वी रशियाने केवळ अफगाणिस्तान आणि सीरियातील युद्धात थेट उडी घेतली होती. इतरवेळी रशिया कायम मुत्सद्देगिरी आणि तटस्थतेवर भर देत असतो! शिवाय असद राजवट संकटात सापडली असताना रशिया तिच्या मदतीला धावून गेला नव्हता. इस्रायल-इराणच्या युद्धात रशियाने थेट उडी घेतलेली नाही. याचे कारण रशियाला त्या भागातील राजेशाही देशांशी संबंध बिघडवायचे नाहीत किंवा इस्रायलशी असलेले संबंधही तोडायचे नाहीत. रशियाने इस्रायलचा निषेध केला असून, हा संघर्ष थांबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. गेल्या जानेवारीत रशिया व इराण यांनी सर्वसमावेशक सहकार्याचा करार केला होता. परंतु युद्धाच्या परिस्थितीत लष्करी मदत नसेल, असा उल्लेख त्यात होता. गेल्यावर्षी इस्रायलने पहिल्यांदा इराणवर हल्ला केला, तेव्हा रशियाने इराणला प्रगत हवाई संरक्षण प्रणाली दिल्या नाहीत. त्यामुळे इराण नाराज झाला होता. रशियाचे हात युक्रेनमधील युद्धामुळे बांधले गेले आहेत आणि ताज्या युद्धात मर्यादित मदत करण्याचेच धोरण रशियाने अवलंबले आहे. रशियाने सर्व सामर्थ्यानिशी इराणच्या युद्धात भाग घेणे, हे जगाच्या द़ृष्टीने नवी आपत्तीच ठरेल. मात्र या युद्धामुळे जगासमोर ऊर्जासंकट निर्माण झाले असून या जगात जबाबदार देशांनी तरी मध्य युगाप्रमाणे वागता कामा नये!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT