साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे  
संपादकीय

अण्णा भाऊंच्या साहित्यातील जीवनमूल्ये

पुढारी वृत्तसेवा
विष्णू पावले

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव येथे झाला. आयुष्यातील बहुतांशकाळ त्यांना पराकोटीच्या दारिद्य्राला तोंड द्यावे लागले. शाळेचा केवळ दीड दिवस सोडला, तर शिक्षणापासून ते दूर गेले. त्यामुळे त्यांची जीवनशैली उन्मुक्त बनली. डोंगरदर्‍या, नदी-ओहोळ, माळ अशा लौकिकाशी ते जोडले गेले. त्यांच्या आजच्या जयंतीनिमित्त..!

जीवनातील अनुभवाच्या संचितावर आणि वारणा खोर्‍यात, वाटेगाव टापूत होणार्‍या लोककलांवर त्यांचा मन:पिंड पोसला. त्यांच्यातला कलावंत विकसित झाला. क्रांतिसिंह नाना पाटील आणि बर्डे गुरुजींच्या क्रांतित्वाने भारून जाऊन अण्णा भाऊंनी भूमिगत लढ्यात सहभाग दर्शवला. पुढे मुंबईनगरी त्यांना ऊर्जादायी ठरली. कम्युनिस्ट विचारांची ओढ निर्माण झाली. आधीच गोष्टीवेल्हाळ स्वभाव; तो लेखणीत उतरला. त्यांच्यातला बहुमुखी प्रतिभावंत लौकिक पावला. पोवाडे, लोकनाट्य, नाटक, प्रवासवर्णन, कथा आणि कादंबरी लेखन केले. वारणा ते वोल्गा असा विचारांचा प्रदेश व्यापणारे त्यांचे साहित्य जवळजवळ जगभरातील 27 भाषांत भाषांतरित झाले आहे. अण्णा भाऊ ज्या काळात लिहायला लागले, त्यावेळचा साहित्यव्यवहार हा मांडीवरच्या तिळांत आणि गालावरच्या खुणांत अर्थ शोधत होता. आवळ्या-भोपळ्याची मोट बांधत होता. स्वातंत्र्याची पहाट झाली होती; परंतु सामान्यांच्या स्वातंत्र्याचे त्यांना वावडे होते. नवभांडवलदार वर्ग उदयास येत होता.

वर्ग-वर्ण संघर्षाचा धोका टळला नव्हता. सरंजामशाहीचा पीळ सुटला नव्हता. सामाजिक उलथापालथ होत होती. त्या काळात अण्णांनी लिहिले, ते जाणिवेने लिहिले. पुराणकथा सांगण्याऐवजी त्यांनी वर्तमान वास्तव रेखाटले. त्यामागे मानवी जीवनाविषयीची अपार करुणा होती. दलित, वंचित, शेतमजूर आणि स्त्री हा त्यांच्या आस्थेचा परीघ होता. त्यामागे सामाजिक भान होते म्हणून 1949 मध्ये ‘मशाल’ या मासिकात ‘माझी दिवाळी’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. अण्णांनी उदात्त जीवनमूल्ये चिरंतन वाहती राहावीत, हा विचार ठेवून लेखन केले. मानवाचे वर्तन स्वच्छ, तर व्यवहार स्पष्ट असावा याची शिकवण त्यांचे साहित्य देते. शोषणमुक्त, विषमतामुक्त समाजाचा ध्यास त्यांनी घेतला. जातजाणिवा नाकारल्या. त्यांची ‘डोळे’ ही कथा स्त्री अस्मितेचे दर्शन घडवते. ‘मरीआईचा गाडा’ अंधश्रद्धेला दूर सारते. औद्योगिकीकरणाचा फटका बसलेली ‘चित्रा’ ही स्त्री शील किती महत्त्वाचे आहे, हे सांगते. चारित्र्यासाठी लढणार्‍या स्त्रिया सामर्थ्यवान होत्या. ‘माकडीचा माळ’ ही कादंबरी भटक्या-विमुक्तांची वेदना मांडते. ‘चिखलातील कमळ’ ही देवदासी प्रथेवर आधारित आहे. ‘आवडी’तला विचार प्रागतिक ठरतो. ‘सापळा’ ही कथा धर्मचिकित्सा करते. सामाजिक अभिसरणाला पूरक ठरते. ‘तीन भाकरी’ विज्ञाननिष्ठ द़ृष्टिकोन जागा करते.

‘जिवंत काडतूस’, ‘मास्तर’ या कादंबर्‍या क्रांतिकाळातले जिकिरीचे प्रश्न मांडतात. ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’ कलिकाळाच्या टाळूवर नाचण्याचे सामर्थ्य देतात. ‘शेटजीचं इलेक्शन’मधून शेतकरी-शेतमजुरांचा प्रश्न पुढे येतो. त्यांची कथनपद्धत ही देशी बाण्याची होती. त्याद्वारे यातनांचा शोध घेतला. जीवनव्यवहार, लोकव्यवहार समजून सांगितला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, मांगल्याचा अट्टाहास धरला. स्वाभिमान जागृत केला. चारित्र्य सुधारले. दुबळ्याला कृतिप्रवण केले. सृष्टीची विलोभनीयता शोधली म्हणून ‘खरी कला काळजाशी भिडून बोलते’ असे ते म्हणत. त्यांना सूर्योदय-सूर्यास्ताचे आकर्षण होते म्हणून त्यांनी साचलेपण नाकारले.

‘लेखक हा सदैव जनतेबरोबर असावा लागतो कारण जो कलावंत जनतेसोबत असतो, त्याच्याबरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरविणार्‍याकडे जनताही पाठ फिरवीत असते. जगातील सर्व श्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरूर आहे. तसेच शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते. त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अवघड आहे. तेही काही लेखकांना सहज साधून जाते; पण त्या आत्म्यामागची इतिहास परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार अवघड आहे.’ तसेच ‘हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे,’ असे अण्णांनी म्हटले आहे. खडकातून झिरपणार्‍या पाझराप्रमाणे असणारे जीवन त्यांनी जवळून पाहिले. त्यांचे साहित्य ही मराठीजनांसाठी शिदोरी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT