उपवर मुलाचे लग्न जुळविणे संपूर्ण समाजात अत्यंत कठीण झाले आहे. ‘जोडे झिजवणे’ ही क्रिया कधी काळी उपवर कन्येच्या लग्नासाठी तिच्या पित्याला करावी लागत असे. आता चिरंजीवाच्या लग्नासाठी बाप-मुलगा दोघांना मिळून विवाह जोडणी संकेत स्थळावर बोटे घासावी लागतात. एका वरपित्याने मुलाला लिहिलेले हे पत्र.
प्रिय चिरंजीव, अ.उ.आ. तुझ्या लग्नाच्या काळजीने मी खंगत आणि तुझी आई दिवसेंदिवस वाळत चाललो आहोत. अनेक विवाह जुळविणार्या वेबसाईटस्वर तुझे नाव नोंदवूनही फारसा उपयोग झालेला नाही. आपण अनेक मुलींना इंटरेस्ट दाखवला, पण त्यांचा रिस्पॉन्स रेट अत्यंत कमी आहे. आपल्या समाजाचे वधू-वर सूचक मेळावे अटेंड करून आम्ही थकलो. तिथे येणार्या मुलींची संख्या असते दीडशे आणि मुले सातआठशे. त्यात तुझा आणि आमचा निभाव लागणे शक्य नाही. आजकाल मुलगी दाखविण्याचे कार्यक्रम होत नाहीत, तरीपण परवा असा योग आला. म्हणून आम्ही दोघे मुलगी पाहण्यासाठी गेलो. ‘मुलगा सोबत आलेला नाही’ असे सांगताच, ‘तुम्ही कशासाठी आलात?’ असा प्रश्न मुलीच्या बापाने विचारला. मी तर माघारी निघालो होतो; पण मुलीच्या आईने आमची सुटका ‘या’ असे म्हणून केली. थोड्याच वेळात चहा घेऊन मुलगी आली आणि समोर बसली. तिचा पोशाख बर्म्युडा आणि टी शर्ट असा होता. चहाबरोबर बिस्किटे सुद्धा नव्हती. ‘आता प्रश्न विचारा’ असे मुलीचे वडील म्हणाले. प्रथम हे उद्गार आम्हाला उद्देशून आहेत, असे आम्हाला वाटले. मी प्रश्न विचारण्यास सुरुवात करण्यापूर्वीच मुलीने प्रश्न विचारला, ‘तुमच्याकडे मायक्रोओव्हन, वॉशिंग मशिन, डीश वॉशर, व्हॅक्युम क्लीनर आहे का?’
मी ‘हो’ म्हणून सांगितले. पुढचे प्रश्न तिचे आहेत आणि उत्तरे माझी आहेत.
‘स्वयंपाक, धुणी-भांडी, झाडू, पोचा करण्यासाठी बाई आहे का? मला अजिबातच स्वयंपाक येत नाही हां अंकल.’
तुझ्या आईकडे पाहून मी म्हणालो, ‘तूर्त स्वयंपाकाला या बाई आहेत. बाकी कामे मोलकरीण करते.’
‘मला कोणताही उपवास नसतो, सांगून ठेवते. मी वटसावित्रीची पूजा पण करणार नाही. एक जन्म लग्न टिकले तरी पुरे आणि साता जन्माच्या गप्पा करायच्या. सासरचे लोक आलेले मला चालणार नाहीत. वीकेंडला मी दुपारी बाराशिवाय उठत नसते. शनिवार, रविवार शॉपिंग आणि जेवण हॉटेलमध्येच असेल. माझ्या सगळ्या अटी मान्य असतील तर पोराला रविवारी घेऊन या आणि नसतील तर पुन्हा फोन करू नका. बराय. या. नमस्कार.’
आम्ही दोघे जड पावलांनी आणि त्याहून जड अंत:करणाने परत निघालो. हा प्रसंग घडल्यापासून तुझ्या आईने अंथरूण आणि मी पांघरूण धरले आहे. तुझी आई या धक्क्यातून सावरण्यास वेळ लागेल, असे दिसते. तूर्त तुझ्या लग्नाचा विचार बाजूला ठेवून तुझ्या आईला मानसिक बळ देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. जमल्यास तू एकदा येऊन जा. बाकी क्षेम आहे.
- तुझा प्रेमळ पप्पा.