रहदारीचा, वाहतुकीचा बोजवारा उडालेले शहर म्हणजे पुणे. येथे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लक्षात येते की ते चुकीचे झालेले आहे त्यामुळे नवे पूल तोडून पुन्हा नवे पूल बांधले जातात. रहदारी टाळून कसे जावे हे पुण्यात जन्माला आलेल्या पुणेकरांनाही आजकाल समजेनासे झाले आहे. अशी परिस्थिती असताना बिबटे कशासाठी इथे आले, हे समजायला मार्ग नाही. चांदणी चौक नावाचा एक प्रख्यात पूल जुना असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथील रहदारीमध्ये अडकले होते. अर्धा पाऊण तासानंतर ते खाली उतरले आणि त्यांनी पाहणी केली. त्यांच्या लक्षात आले की इथे सर्वच काही बदलणे आवश्यक आहे. सूत्रे हलली आणि चांदणी चौकामध्ये एकावर एक असे वेगवेगळे उड्डाणपूल झाले. सर्वत्र दिशादर्शक पाट्या लावल्या असल्या तरी नेहमीच्या पुणेकरांना भूलभुलैयासारखे फिरावे लागते आणि कुठून कुठे जावे हे समजत नाही. अशा परिस्थितीमध्ये चांदणी चौक ओलांडून एक बिबट्या बावधनच्या दिशेने आलाच कसा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
बावधनवासीयांच्या आयटी आणि तत्सम लाईफस्टाईलमध्ये बिबट्याने एकच खळबळ माजवली आहे. या भागातून रामनदी नावाची एक नालावजा नदी वाहते. कधीकाळी ही नदी चांगल्यापैकी वाहत असेल; परंतु बिल्डरांच्या कृपेने नदीचे पात्र आकुंचन होत निव्वळ नाल्याच्या रूपात ती शिल्लक आहे. नदीच्या काठाकाठाने एक बिबट्या बावधन परिसरामध्ये दाखल झाला आणि काही लोकांच्या कॅमेरामध्ये त्याचे चित्रण केले गेले. परिसरात बिबट्या ही बातमी काही क्षणात व्हायरल झाली आणि राम नदीच्या पुलावर उभे राहून बिबट्या दिसतो का हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. जंगलात जाऊनही सहजासहजी बिबट्या नजरेला पडत नाही तिथे पुण्यातील लोकांना बिबट्या छोट्याशा नदीपात्रात बहुतेक खुर्ची टाकून त्यांना दर्शन देण्यासाठी बसला आहे, असा समज झाला असावा. या परिसरामध्ये उंच डोंगराची झाडी असल्यामुळे बिबट्यांचा अधिवास आहेच, शिवाय जवळच एनडीएचे जंगल देखील आहे.
आम्हास असा प्रश्न पडला की रस्ता चुकून हा बिबट्या बावधनमध्ये आला असेल तर हा परत मुळशीच्या दिशेने कसा जाईल? जागोजागी ट्रॅफिक जाम, अंगावर येणारी वाहने, रात्रीच्या वेळचे विविध अवतारात असलेले स्त्री-पुरुष, त्यांच्या गाड्यांचा वेग या सगळ्यातून मार्गक्रमण करत बिबट्या बिचारा परत कसा जाणार, याची मात्र काळजी करावी, अशीच परिस्थिती आहे. साधारण दोन किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यामध्ये संध्याकाळच्या वेळी अर्धा तास लागतो. इथे येऊन बिबट्याने असे कोणते दिवे लावले आहेत ते समजण्याचा मार्ग नाही. असो. बिचारा सुखरूप आपल्या घरी परत जावा एवढीच सदिच्छा आहे. ‘जा बिबट्यांनो परत फिरा रे’, असे म्हणायची वेळ आली आहे. सुखरूप रस्ते ओलांडण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पुण्यात आलेल्या या बिबट्याला आमच्या शुभेच्छा!