Tadaka Article | अरे बिबट बिबट..! Pudhari File Photo
संपादकीय

Tadaka Article | अरे बिबट बिबट..!

पुढारी वृत्तसेवा

दिसेल त्याला गोळ्या घाला, असा आदेश जनरल डायरने दिला होता; पण तो आदेश आता बिबट्याच्या नशिबी आला आहे. खरे तर, बिबट्या हा मार्जार कुळातील अतिशय लाजराबुजरा आणि सभ्य सदस्य आहे. मनुष्यवस्तीत येऊन स्वतःला माणसाळून घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झालेली असावी. म्हणून तर नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत नव्हे, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत तो जनसंपर्कात येऊ लागला आहे. मांजर कसे मनुष्याशी लडिवाळपणे वागते. त्यांच्या अंगाखांद्यावर चढते तसे आपणही माणसाबरोबर प्रेमाने वागावे, असे त्याला वाटत असावे; पण माणसाची जात किती भयंकर आहे, ते त्याला ठाऊक नसावे.

‘माणसा माणसा कधी व्हशील माणूस...’ ही बहिणाबाईंची कविता बहुधा त्याने वाचलेली नसावी. स्वतःच्या बापाच्या नरडीचा घोट घेणारा माणूस आपली काय अवस्था करून ठेवेल, हे त्याला ठाऊक नसावे. बिबट शेतात येऊ दे नाही तर बंगल्यात येऊ दे, त्याला कसा पकडायचा, हे माणसाला शिकवायला लागत नाही. अशावेळी विहिरी, म्युनिसिपालिटीची गटारे आणि पोल्ट्री फार्मसुद्धा माणसाच्या मदतीला धावून येतात. चिकन सिक्स्टी फाईव्हसुद्धा बिबट्याला आवडते. त्यामुळे चिकन सिक्स्टी फाईव्ह विकणार्‍यांची मदत बिबट्याला पकडण्यासाठी होऊ लागली.

बिबट्याची भीड मोडू लागली आहे तसतसा तो माणसाच्या बंगल्याचा व्हरांडा म्हणू नका, दिवाणखाना म्हणू नका, परसदार म्हणू नका, अंगण म्हणू नका... पाळीव प्राण्यांप्रमाणे वावरू लागला आहे. बंगलेवाले आता बंगल्याची राखण करण्यासाठी कुत्र्याऐवजी बिबट्या पाळू लागतील, असे वाटत आहे. त्यामुळे माणसाच्या सान्निध्यात राहण्याचे त्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे वाटते; पण या बिबट्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाच्या स्वप्नांची पुरती वाट लागली आहे. बिबट्याचे ‘कुटुंब नियोजन’ हा एक उपाय पुढे येत आहे. तूर्तास त्याला ऐदी बनविता येते का, हाही विचार सरकार करत आहे. नागरिकांना जशी मोफत धान्य देण्याची योजना आहे, त्या धर्तीवर एक कोटी शेळ्या जंगलात सोडून द्यायच्या. म्हणजे तो मनुष्यवस्तीत येणार नाही; पण सरकारने पुढील गोष्ट ध्यानात ठेवावी...

‘अरे बिबट बिबट... खोटा कधी म्हणू नये, फुकटच्या शेळ्या घेऊन जंगलात सोडू नये, निधी संपला म्हणून पाया पडून चालणार नाही, नरडीचा घोट घ्यायला तो मागे पुढे पाहणार नाही’ दिनू मास्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT