लक्ष्मीपूजनाचा भावार्थ File Photo
संपादकीय

Laxmi Pujan 2025 | लक्ष्मीपूजनाचा भावार्थ

दीपोत्सवाच्या केंद्रस्थानी असते लक्ष्मीपूजन. जो केवळ धार्मिक विधी नसून समृद्धी, भरभराटीची शाश्वत परंपरा आहे.

पुढारी वृत्तसेवा

दीपोत्सवाच्या केंद्रस्थानी असते लक्ष्मीपूजन. जो केवळ धार्मिक विधी नसून समृद्धी, भरभराटीची शाश्वत परंपरा आहे.

चिं. वि. खाडीलकर

लक्ष्मी ही आदिशक्तीचेच ऐश्वर्यसंपन्न रूप आहे. जीवन जगण्यासाठी धन, वित्त या गोष्टी आवश्यक ठरतात. परंतु, त्या लक्ष्मीला प्रसन्न अंतःकरणाने, प्रसन्न वातावरणात आवाहन करायला हवे. म्हणून आश्विन अमावस्येला मंगल स्नान करून लक्ष्मी, कुबेर या देवतांची पूजा केली जाते.

लक्ष्मीदेवी ही भगवान विष्णूंची दिव्य सहचारिणी. ती केवळ धनाची अधिष्ठात्री नसून समृद्धीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. पुराणकथांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी ती अमृतासोबत प्रकट झाली. समुद्रमंथनाचा तत्त्वार्थ असा की, प्रयत्न, संतुलन आणि सद्गुण यांचा संगम होतो तिथे समृद्धी नांदते. लक्ष्मीदेवीच्या हातातील कमळ हे आत्मशुद्धीचे प्रतीक आहे, तिच्या हातातून वाहणार्‍या सुवर्ण नाण्यांची धार ही अखंड संपन्नतेची ओळख आहे. तिच्या दोन्ही बाजूला उभे असणारे गजराज हे स्थैर्य, प्रतिष्ठा आणि धैर्याचे द्योतक आहेत. अनेक आख्यायिकांत देवी लक्ष्मी ही कृपा, बुद्धी आणि करुणा यांची अधिष्ठात्री म्हणून वर्णिली जाते.

आश्विन अमावस्येला लक्ष्मी रात्री सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता आहे. शोभा, प्रसन्नता, रसिकता आहे त्या ठिकाणी ती स्थिरावते. त्यामुळे या दिवशी प्रत्येक घरात स्वच्छता, सजावट आणि प्रकाशाचे वातावरण निर्माण केले जाते. कारण, पावित्र्य, मांगल्य, स्वच्छता आणि आनंद असणार्‍या घरांमध्ये लक्ष्मी प्रवेश करते, अशी अनेक वर्षांपासूनची धारणा आहे. साक्षात लक्ष्मीदेवी आगमन करणार असल्याने तिच्या स्वागतासाठी गोडधोड पदार्थ, फुले, अगरबत्ती, कुंकू आणि आरती असे यथाशक्ती सर्व काही केले जाते. काहीजण आपल्याकडील रोकड, दागदागिने किंवा मौल्यवान धातू देवीसमोर ठेवतात आणि या संपत्तीचे रक्षण आणि वृद्धी होवो, अशी प्रार्थना करतात.

लक्ष्मी आली असता ती नम्रतेने स्वीकारावी. संपत्तीने उन्मत्त न होता नम्र होऊन तिचा विनियोग करावा. यासाठीच लक्ष्मीला प्रार्थना केली जाते. तुझी कृपा सदैव आमच्या कुटुंबावर राहूदे, चिरलक्ष्मी स्थिर होऊदे, स्थिर लक्ष्मीची बरकत होऊदे. यासह आयुरारोग्य लाभू दे, अशी मनोभावे प्रार्थना करून लक्ष्मीचा आशीर्वाद मागितला जातो.

महालक्ष्मीअष्टक या स्त्रोतात

नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।

शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते॥

नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी ।

सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते॥

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी।

सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते॥

पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी।

परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोस्तुते॥

अशा श्लोकांनी देवी महालक्ष्मीकडे ऐश्वर्य-समृद्धी आणि सुख-शांतीसाठी आवाहन केले आहे.

आजच्या युगात समृद्धीची व्याख्या विस्तारली आहे. संपत्ती म्हणजे केवळ पैसा किंवा मालमत्ता नव्हे, तर मानसिक शांतता, उत्तम आरोग्य, निकोप नातेसंबंध आणि नैतिकता यांचाही त्यात समावेश आहे. प्रामाणिकपणाने कमावलेले धन हे स्वतःपुरते मर्यादित न राहता समाजासाठीही उपयुक्त ठरावे. धन हे केवळ वैभवाचे प्रतीक न राहता त्याचा सदुपयोग होणेही गरजेचे आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी लक्ष्मीचे आगमन होत असताना अलक्ष्मी निस्सारणही केले जाते. यासाठी प्रतीकात्मकता म्हणून घराच्या एका कोपर्‍यापासून प्रवेशद्वारापर्यंत केरसुणी ओढत नेऊन तिचा एक तुकडा मोडून बाहेर टाकला जातो. लक्ष्मीपूजनामध्ये केरसुणीची पूजा केली जाते. या प्रतीकात्मकतेपलीकडे अलक्ष्मीचा विचार केला असता असे दिसते की, वाममार्गाने किंवा अवैधरीत्या किंवा इतरांचे शोषण करून मिळवलेली संपत्ती म्हणजे अलक्ष्मी. अलक्ष्मी कधीही सौख्य देत नाही. त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीसाठी सचोटीचा, प्रामाणिकतेचा मार्गच अवलंबणे गरजेचे आहे, असे धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर नकारात्मकता, निराशा यांनाही अलक्ष्मी म्हटले जाते. याचा भावार्थ समजणे सोपे आहे. आपल्या कर्तृत्वाने धनसंपत्ती मिळवायची असेल, तर निराशा, नकारात्मकता असून चालणार नाही. ती दूर करून सकारात्मता, प्रबळ आत्मविश्वास, प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जिद्द यांची कास धरल्याशिवाय लक्ष्मीप्राप्ती होणार नाही. यासाठीच देवीमातेचे कृपाशीर्वाद लाभावेत हीच लक्ष्मीपूजनामागची मूळ भावना आहे. त्यामुळे पूजाविधीतील कर्मकांडामध्ये चार गोष्टी नसल्या तरी चालतील; पण मनातील भक्तिभाव, शुद्ध अंतःकरण आणि निष्ठापूर्वक आचरण गरजेचे आहे.

बदलत्या काळात धनसंपत्ती मिळवण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत; पण त्यापलीकडे जाऊन मिळवलेले धन टिकवणे आणि वृद्धिंगत होण्यासाठी बचत व गुंतवणूक करणेही गरजेचे आहे. हे करत असताना आपण मिळवलेल्या पैशातील थोडा फार हिस्सा दानधर्मासाठी खर्च करणेही आवश्यक आहे. कारण, शेवटी ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरुची सुपंथ’ ही आपल्या संस्कृतीने दिलेली शिकवणूक आहे. तिचा विसर पडून केवळ स्वार्थी मनोवृत्तीने मिळेल त्या मार्गाने धन ओरबाडत राहिल्यास त्या लक्ष्मीपूजनाला अर्थ राहणार नाही. आहे रे वर्गाने नाही रे वर्गाच्या कल्याणाचा विचार केल्यास संपत्तीचे विकेंद्रीकरण होऊन सर्वांचा विकास होईल. आजच्या काळात हा व्यापक अर्थ लक्षात घेऊन लक्ष्मीपूजनाचा विचार व्हायला हवा.

लक्ष्मी चंचल आहे, असे व्यवहारात म्हटले जाते. वास्तविक, लक्ष्मी चंचल नाही, तर लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल आहे. लक्ष्मी किंवा वित्त ही शक्ती आहे. ती माणसाला देवही बनवू शकते आणि राक्षसही बनवू शकते. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी एकेठिकाणी फार सुंदर म्हटलेले आहे. लक्ष्मीला भोगसामग्रीचे साधन मानणारा माणूस पतनाच्या दरीत जाऊन पडेल, तर लक्ष्मीचे मातृवत पूजन करून तिला प्रभूचा प्रसाद समजणारा माणूस स्वतः पवित्र बनतो आणि लक्ष्मीच्या साहाय्याने समृद्ध जीवन जगतो, सृष्टीलाही पावन करतो आणि इतरांचेही कल्याण करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT