संपादकीय

लवंगी मिरची : आली लहर

Arun Patil

यार मित्रा, नेमका कोणता ऋतू चालू आहे तेच कळत नाही. उन्हाळा आहे, पावसाळा आहे की हिवाळा आहे? भर उन्हाळ्यात पाऊस पडतोय. दिवसभर गर्मी होते. संध्याकाळी पाऊस पडतो आणि रात्री थंडी वाजते. म्हणजे एकाच दिवशी तिन्ही ऋतू, ही काय भानगड असेल?

अरे भानगड वगैरे काही नाही. हवामानाला किंवा ऋतूमानाला दोष देण्यात काय अर्थ आहे? लहरीपणा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये तुफान वेगाने वाढत आहे. प्रत्येक कुटुंबात पाहशील, तर प्रत्येक माणसाची वेगळीच लहर असते. तरुण पोरांची वेगळी लहर, बायकांची वेगळी लहर आणि पुरुषांची वेगळीच लहर. राजकारणाविषयी तर बोलायलाच नको. आली लहर आणि केला कहर असाच प्रकार आहे. असा लहरीपणा सर्वत्र सुरू असेल, तर मग यात हवामानाने तरी मागे राहून कसे चालेल?

तसे नाही रे; पण पूर्वी कसा पावसाळा आला की पाऊस पडायचा, हिवाळा आला की थंडी वाजायची आणि उन्हाळा आला की कडक ऊन पडायचे हे ऋतूचक्र वर्षानुवर्ष असेच सुरू होते; पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून पावसाचा नवीन प्रकार आला आहे आणि तो म्हणजे अवकाळी पाऊस. अवकाळी म्हणजे ठराविक काळामध्ये न येता नको त्या काळात येणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस.

केवळ पाऊसच अवकाळी असतो, असे नाही तर खूप माणसे पण अवकाळी असतात. म्हणजे नको त्यावेळी नको तिथे जाऊन टपकतात. अशावेळी समजा पावसाने अचानक टपकायचे ठरवले, तर त्याला दोष कसा देता येईल? मी तर ठरवले आहे. सकाळी उठल्याबरोबर सूर्य उगवतो, ऊन पडते म्हणून एसी किंवा पंखा लावतो. संध्याकाळच्या वेळी हमखास पाऊस येतो म्हणून छत्री घेऊन बाहेर पडतो आणि त्या पाठोपाठ रात्री प्रचंड थंडी पडते म्हणून ब्लँकेट घेऊन झोपतो. म्हणजे एकाच दिवसामध्ये पंख्याची किंवा एसीची गार हवा , छत्री किंवा रेनकोट आणि संध्याकाळी ब्लँकेट किंवा उबदार पांघरूण याचा उपयोग करावा लागतो, असा ऋतू मिळायला आणि अनुभवायलासुद्धा भाग्य लागते. गेल्या कित्येक पिढ्यांना असे हे भाग्य मिळालेले नाही ते आपल्या पिढीला मिळाले आहे, याचा खरे तर तुला अमिमानच वाटायला हवा.

अरे, पण मोठ्या संख्येने लोक आजारी पडत आहेत त्याचे काय करायचे? म्हणजे तुझे म्हणणे आहे की, पावसाने आपल्याला वाटेल तेव्हा पडावे, उन्हाने वाटेल तेव्हा भाजून काढावे आणि थंडीने वाटेल तेव्हा पडून लोकांना आजारी पाडावे.

आजारपणाचेच म्हणशील, तर उन्हाळ्यात काही लोक आजारी पडतात. हिवाळ्यात काही लोक आजारी पडतात आणि पावसाळ्यात काही लोक आजारी पडतात. आजार काही संपलेले नसतात. हे तिन्ही ऋतू एकत्र आल्यानंतर काही लोक आजारी पडतात त्यात पावसाळ्याला दोष कसा देणार? आणि लहरीपणाचे म्हणशील, तर तो सर्वत्र वाढतच आहे. सून सासूचे ऐकत नाही आणि लेक बापाचे ऐकत नाही. कुटुंब संस्थेमध्ये ज्याच्या मनाला जसे वाटेल तसे तो वागत असतो, मग पावसानेच काय कुणाचे घोडे मारले आहे?

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT