संपादकीय

तडका : भाषा संवर्धन असेही..!

Arun Patil

आपली मराठी भाषा ही जगात सर्वश्रेष्ठ आहे, याविषयी मराठी भाषा दिनानिमित्त भरपूर चर्चा झालेली आहे. दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात, त्याप्रमाणे मराठी भाषेमध्ये प्रत्येक प्रांतामधील वेगळे शब्द असतात. शब्दांची भर पडत-पडत भाषा समृद्ध होत असते. सध्या राज्यामध्ये राजकारण अटीतटीला आलेले असल्यामुळे राजकीय लोकांनी मराठी भाषेच्या संवर्धनात कशी भर घातलेली आहे, ही नवीन माहिती आम्ही आज तुम्हाला देत आहोत. पाणी पाजणे, अस्मान दाखवणे, चितपट करणे अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार मराठीमध्ये सर्रास वापरले जातात. राजकीय लोकांनी अशात एक नवीन वाक्प्रचार रूढ केला आहे आणि तो म्हणजे 'कार्यक्रम करणे'. कार्यक्रम करणे याची सुधारित आवृत्ती म्हणजेच करेक्ट कार्यक्रम करणे. आता कार्यक्रम करणे म्हणजे काय आणि करेक्ट कार्यक्रम करणे म्हणजे काय, हे आपण समजून घेऊया.

कार्यक्रम करणे याचा अर्थ शिकारीवर शेवटचा घाव घालून तिचे अस्तित्व संपवून टाकणे, असा साधारण काढता येईल. सावज आणि शिकारी हा विषय आल्याबरोबर आपल्याला जंगलातील वाघ, सिंह अशा प्रकारचे मांसाहारी प्राणी आठवतील. कार्यक्रम करण्याआधी शिकार टप्प्यात यावी लागते. शिकार टप्प्यात आल्यानंतरच कार्यक्रम करता येतो, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शिकार टप्प्यात आलेली असते. हा टप्पा म्हणजे सावज आणि शिकारी यांच्यामधील अंतर जेवढे कमी असेल, तेवढी शिकार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. राजकीय लोक कार्यक्रम करतात म्हणजे काय, तर आधीच हाकारे पुकारे मारून त्याला विशिष्ट दिशेने टप्प्यामध्ये आणतात आणि त्यानंतर घाव घालतात. यालाच करेक्ट कार्यक्रम करणे असे म्हणतात. 'कार्यक्रम करणे' हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता रूढ झालेला वाक्प्रचार आहे.

ग्रामीण भागात एखादा सामाजिक कार्यकर्ता उत्साहाने समाजकार्य करत असतो. त्याच्याभोवती असलेले लोक त्याला राजकारणामध्ये उतरण्याची सूचना करत असतात. आमदार, खासदार आणि तत्सम लोकप्रतिनिधी यांना असलेले ग्लॅमर पाहून या सामाजिक कार्यकर्त्यालाही त्याचा मोह होतो आणि तो आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला उभा राहतो. निवडणूक लढवायची म्हणजे पैसा खर्च करणे आले. तो जर नसेल तर आपली शेतजमीन विकून पैसा उभा करणे आणि तो खर्च करून निवडणूक लढवणे आलेच. हे सर्व करण्यासाठी त्याच्या जवळचे लोक त्याला पटवून तयार करत असतात.

एखादे इलेक्शन लागल्यानंतर विशिष्ट उमेदवाराला पाडण्यासाठी त्याच्या जातीचा किंवा विचारसरणीचा आणखी एक उमेदवार अपक्ष म्हणून उभा केला जातो. या अपक्ष उमेदवाराला भरपूर पैसे पुरविले जातात. त्याच्या वकुबाप्रमाणे तो मते खातो व पराभूत होतो; परंतु दुसर्‍या एका यशस्वी होऊ शकणार्‍या उमेदवाराला त्याने पराभूत केलेले असते. म्हणजे अपक्ष उमेदवार ज्यांनी उभा केला, त्यांनी समोरच्या पार्टीचा 'कार्यक्रम केलेला' असतो व जर तो कार्यक्रम यशस्वी झाला तर तो 'करेक्ट कार्यक्रम केला,' असे म्हटले जाते. राजकारणातील डावपेचांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला नेस्तनाबूत करून त्याची जी काय हीन-दीन आणि लीन अवस्था केली जाते, त्यालाच 'कार्यक्रम करणे' असे म्हणतात. सध्या निवडणुका जवळ आल्यामुळे एकमेकांचा 'कार्यक्रम करणे' या गोष्टीला बहर आलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT