Land acquisition compensation | पारदर्शकता वाढवणारा निर्णय 
संपादकीय

Land acquisition compensation | पारदर्शकता वाढवणारा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नवनाथ वारे, कृषी अभ्यासक

जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, भरपाईची रक्कम जिल्हाधिकार्‍यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक केले आहे. जमिनीचा नेमका किती मोबदला मंजूर झाला, ही माहिती घरी बसून मिळेल.

भूसंपादन ही कोणत्याही राष्ट्राच्या विकास प्रक्रियेतील अत्यंत पायाभूत आणि तितकीच संवेदनशील बाब मानली जाते. रस्ते, रेल्वे, धरणे, औद्योगिक वसाहती आणि नागरी सुविधांच्या उभारणीसाठी जमिनीची आवश्यकता असते आणि ही जमीन बहुतांश वेळा शेतकर्‍यांकडून किंवा खासगी मालकांकडून घेतली जाते. ताज्या निर्णयानुसार, आता भूसंपादनाचा अंतिम निवाडा आणि भरपाईची रक्कम जिल्हाधिकार्‍यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक झाले आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय सुधारणा नसून, तो पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारतामध्ये दीर्घकाळ 1894 चा भूसंपादन कायदा अस्तित्वात होता. या कायद्याचा मुख्य उद्देश हा वसाहतवादी शासनाला हव्या असलेल्या प्रकल्पांसाठी सक्तीने जमीन अधिग्रहित करणे हा होता. 2013 मध्ये केंद्र सरकारने ‘भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित मोबदला मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क कायदा’ संमत केला. या कायद्याने भूसंपादनाच्या प्रक्रियेत मानवी चेहरा आणण्याचा प्रयत्न केला. जमिनीच्या मोबदल्यात भरघोस वाढ, सामाजिक परिणामांचे मूल्यांकन आणि बाधित लोकांच्या संमतीला महत्त्व अशा तरतुदी यामध्ये करण्यात आल्या. महाराष्ट्रातही या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी येत होत्या. शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा निवाडा किती झाला, त्याला किती पैसे मिळणार आणि त्याच्या जमिनीचा ताबा कधी घेतला जाणार, या माहितीसाठी तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असत. ज्यामुळे भ—ष्टाचाराला वाव मिळायचा.

भूसंपादनातील समस्यांचा विचार केल्यास माहितीचा अभाव ही सर्वात मोठी समस्या ठरते. एखादा प्रकल्प जाहीर होतो, तेव्हा दलाल आणि मध्यस्थ सक्रिय होतात. सरकारी दप्तरी होणारा विलंब आणि सातबारा उतार्‍यावर वेळेत नोंदी न होणे यामुळे कायदेशीर गुंतागुंत वाढते. अनेकदा भूसंपादन होऊनही कागदोपत्री मालकी बदलत नाही. त्यामुळे नंतरच्या काळात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊन फसवणुकीचे प्रकार घडतात. हरियाणा आणि तेलंगणासारख्या राज्यांनी भूसंपादनासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित केली. तिथे जमिनीच्या मालकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश मिळतो आणि सर्व कागदपत्रे सार्वजनिक उपलब्ध असतात. महाराष्ट्राने याच धर्तीवर पाऊल उचलले असून, जिल्हाधिकार्‍यांच्या संकेतस्थळावर सर्व निवाडे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणताही शेतकरी गावाच्या किंवा प्रकल्पाच्या नावानुसार शोध घेऊन आपल्या जमिनीचा निवाडा डाऊनलोड करू शकेल. त्याला नेमकी किती रक्कम मंजूर झाली आहे, हे घरी बसून मोबाईलवर पाहता येईल.

यामुळे सरकारी कार्यालयातील हेलपाटे थांबतील आणि मध्यस्थांची साखळी मोडीत निघेल. तसेच, जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत निवाड्याची प्रत महसूल अधिकार्‍यांकडे पाठवणे बंधनकारक केल्यामुळे प्रशासकीय गतिमानता वाढेल. सरकारी मालकीची नोंद सातबारावर वेळेत झाल्यामुळे भविष्यातील वादांना पूर्णविराम मिळेल. विशेष म्हणजे, केवळ नवीनच नव्हे तर 1894 च्या जुन्या कायद्यानुसार झालेल्या संपादनाचे उपलब्ध रेकॉर्डही स्कॅन करून संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे भूसंपादनाचा एक डिजिटल इतिहास तयार होईल. ज्यांच्या जमिनी पिढ्यान् पिढ्या प्रकल्पांत गेल्या आहेत, त्यांना आपल्या हक्काची माहिती मिळवणे सोपे होईल. पारदर्शकतेमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल आणि विकास प्रकल्पांना होणारा विरोध कमी होण्यास मदत होईल. राज्याच्या महसूल व वन विभागाने घेतलेला हा निर्णय महसूल प्रशासनातील एक मोठी सुधारणा आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास भूसंपादन ही प्रक्रिया त्रासदायक न ठरता विकासाचे एक सुसह्य माध्यम बनेल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT