साक्षात लक्ष्मी दर्शन (Pudhari File Photo)
संपादकीय

Lakshmi Blessings | साक्षात लक्ष्मी दर्शन

लक्ष्मी ही फार चंचल देवता आहे, असे म्हणतात. ती घटकेत इथे तर घटकेत तिथे असते, असे बहुतेकांचे निरीक्षण आहे.

पुढारी वृत्तसेवा

लक्ष्मी ही फार चंचल देवता आहे, असे म्हणतात. ती घटकेत इथे तर घटकेत तिथे असते, असे बहुतेकांचे निरीक्षण आहे. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत, असाही एक पुरातन समज किंवा गैरसमज आहे. ते जे काय असेल ते असो; परंतु लक्ष्मी दर्शन झाले की, मानवाचा जीव सुखावतो, हे निश्चित आहे. तुम्ही म्हणाल की, आज लक्ष्मी दर्शनाचा विषय काय आहे? राज्यातील बर्‍याच नगरपरिषदांमध्ये काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. लगेचच लक्ष्मी दर्शनाच्या चर्चा कानावर पडू लागतात. रात्र वैर्‍याची आहे... हा एक वाक्प्रचारही या तोफा थंडावल्या की, सतत कानावर पडत असतो. आपण गाफील राहायला नको, जो या रात्री गाफील राहील त्याच्या वैरी म्हणजे शत्रू म्हणजे विरोधी पक्षातील आपल्या विरोधातील उमेदवार आपल्याला भारी पडू शकतो, हे त्यातून सूचित करायचे असते.

तर विषय लक्ष्मी दर्शनाचा होता. प्रचार थांबला की, त्या रात्री लक्ष्मी दर्शनाच्या आशेने अनेक जण जागेच राहतात. जेवणावळी, चाय पे चर्चा, मिसळ पे चर्चा, नाश्ते पे चर्चा, यानंतर जेवणावळी अशा बर्‍याचशा गोष्टी आधीच होऊन गेलेल्या असतात. त्यानंतर मिशन मतदानमधील ही अखेरची गोष्ट असते. अर्थातच, अनेकजण याला अपवाद आहेत, असतात; पण कितीही नाही म्हटले तरी तेदेखील कटू वास्तवच झाले आहे. पैशांशिवाय निवडणूक लढता येत नाही, ही सर्वसामान्यांची द़ृढभावना झाली आहे आणि जो पैशांशिवाय निवडणूक लढवतो, त्याच्याकडे मतदार ढुंकूनही पाहत नाहीत, हेदेखील सत्य आहे; पण उमेदवार काम करणारा असला, तर जनता स्वतःच त्याच्यासाठी पैसे गोळा करून त्याला निवडून आणलेलीही उदाहरणे आपल्याकडे आहेतच. निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने सर्व नेत्यांनी निवडून आल्यानंतर पूर्ण केली, तर राज्यातील प्रत्येक शहर स्वच्छ आणि सुंदर होईल, यात शंका नाही; पण प्रत्येकवेळी अनुभव वाईट येत असल्यानेच मतदार लाभ पदरात पाडून घेण्याचा विचार करत असतात. जनतेला काय द्यायचे हे नेतेमंडळींना पक्के माहीत असते. फार आधी वाटप केले तर इतर लोक जास्त वाटतील, त्यामुळे मतदान कमी होईल ही भीती असते. त्यामुळेच प्रत्यक्ष मतदानाच्या आधीची रात्र अत्यंत महत्त्वाची असते. त्याचा रिझल्ट दुसर्‍या दिवशी दिसतो. मतदानासाठी रांगा लागतात की, मतदान केंद्रे ओस पडली आहेत, यावरून ते कळू शकते.

आता काही हुशार नेते मंडळी थेट आवाहन करतात. करदाते म्हणून पैसा जनतेचाच आहे. काय कोणी खिशातला देत नाही. त्यामुळे लक्ष्मी दर्शन होत असेल तर नाकारू नकाच; पण मतदान करताना सुज्ञपणेच करा. अल्पशिक्षित मतदारांना तर शपथा, भंडारा, असे काहीबाही करायला लावल्याचेही वाचनात येत असते. आणखी एक गट असतो. जो उशिरा मतदानाला जातो. ते मतदानाची वेळ संपेपर्यंत कुणी येतेय का, याची प्रतीक्षा करतात आणि मगच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाला जात असतात. असो. आज मतदान संपेल आणि मतदारराजा आणि नेते या सर्व प्रक्रियेतून मुक्त होतील. पुढील निवडणुकीपर्यंत; पण आपल्या जगण्यात फरक पडतो काय, हा प्रश्न महत्त्वाचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT