श्रावणात येणारी गोकुळाष्टमी ही देशभरात श्रद्धेने साजरी होते. या दिवशी केवळ एक देव जन्मला नाही, तर एक अंतर्मुख विचार उगम पावला. अष्टमीच्या रात्री, जेव्हा नभ निःशब्द होते, जेव्हा वेळ एक गूढ ठिपका बनला, तेव्हा या नव भावांचा एक गहिरा संन्यास घडतो. म्हणूनच गोकुळाष्टमी ही केवळ तिथी नाही, ती मनाच्या स्वरधारेतून अष्ट भावांचे विसर्जन आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, अपेक्षा, अभिलाषा आणि अनावश्यक ओझे हे सारे ते भाव की, जे मनात खोलवर रुजून बसलेले आहेत, ते मीपण श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करून एक नवा, निरतिश, निर्मळ, शांत प्रकाश सुरू करणे म्हणजेच कृष्णजन्म..!
ऋतुजा केळकर, लेखिका-कवयित्री
अंधारलेली रात्र, नभ स्थिर, संथ पृथ्वी शांत, पावसाच्या ओलसर गंधात चिंतनात मग्न. त्या सांद्र शांततेत, एक स्वर निसटतो... न विसरता येणारा, न पकडता येणारा... आणि त्यात जन्मतो तो एक निळा, सावळा, कोमल तेजस्वी कृष्ण. त्याच्या डोळ्यांत लपलेलं आभाळ, त्याच्या हास्यात गोकुळातला उत्सव, त्याच्या पावलांनी जमिनीवर उतरते एक लय, एक नवा सूर.
देवकीच्या पोटी जन्म घेऊन यशोदेच्या कुशीत जेव्हा तो विसावतो, तेव्हा वात्सल्याला हृदयाची एक नवी धडधड लाभते. मथुरेच्या कारागृहात अन्याय-अत्याचारांच्या अंधारात उजेड घेऊन जन्मलेला कान्हा यशोदेच्या कुशीत वात्सल्याचं विश्व भरून जन्मतो. विश्वासाच्या दीपज्योतीतून वार्याच्या झुळकीसारखा तो प्रत्येक मनात लपतो, फुलांच्या पाकळ्यांसारखा तो दरवळतो. ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ ही केवळ एक तिथी नाही, ती भावना आहे, एक उजळणारा क्षण आहे की, जी मनाच्या गाभ्यात थेट प्रकाशते, थेट वसते.
नभात भरलेलं कृष्णमेघाचं गूढ, शंखध्वनीत न्हालेलं वातावरण आणि भाविकांच्या मनात जपलेला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव, ही फक्त एका अवताराच्या जन्माची आठवण नव्हे, ही जीवनाच्या गाभ्यात उमटणार्या शुभतेची आणि शुद्धतेची साजरी साज आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव नुसता बाहेर साजरा होत नाही, तर तो हृदयाच्या खोल कप्प्यात दरवळतो. फुलांच्या माळा, पानांची तोरणं आणि संथ रेखाटलेल्या रांगोळ्यांमधून गोजिरं रूप जणू हसतं. जिथं आपलं मन बालकृष्ण लीलांमध्ये रमते, तिथंच कान्हा भक्तांच्या भावांमध्येही विराजमान होतो. त्याचा जन्म केवळ देवतेच्या रूपात झाला नाही, तो सहानुभूतीचा, स्नेहाचा, नात्यांचा आणि कर्तव्यासाठी उभा राहणार्या सत्याचा प्रतीक बनतो. कृष्ण कधी राधेच्या प्रेमातली समर्पण भावना आहे, तर कधी अर्जुनाला सांगितलेली गीता आहे. कृष्ण हा एक गोष्ट नाही, तर तो जीवनाच्या प्रत्येक चरणात समरस होणारा गाभा आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होते, जिथे भक्ती ओसंडते, जिथे मनाला कोमलता लाभते, जिथे जीवनाचा अर्थ पुन्हा उमजतो.
कृष्ण आहे पाचूसारखा निळसर गालिचा आभाळाचा.. त्यात विरघळलेले त्याचे कोमल तेजस्वी रूप, कधी पावसाच्या सरींमध्ये हसत भिजणारे... तर कधी वार्याच्या कुजबुजीत ओढ लपवणारे... त्याचे डोळे जणू खोल सरोवरात भिरभिरणार्या तळ्याच्या गूढ लाटेसारखे. त्याचे ओठ जणू पहाटेच्या पहिल्या प्रार्थनेतले सौम्य मंत्र हास्य... जणू अंगणातल्या पारिजातकाच्या पहिल्या पाकळीवरून वार्यानं सरकलेलं स्वप्न... त्याच्या वेशात ओढ आहे. त्याच्या चालण्यात लय आहे... कधी गायींसोबत चरणारा बालक, तर कधी राधेच्या नजरेत हरवलेला प्रियकर, तर कधी रणभूमीवर शौर्याचं तेज राखणारा योगेश्वर. तो फक्त रूप नाही, तो अनुभूती आहे. जिथं मनाला स्पर्श असतो, तिथं तो अस्तित्वाला शब्दांत गुंफणारं गहिरं गाणं असतो. तोच आपला नटखट श्रीकृष्ण असतो.