कोकण वार्तापत्र pudhari file photo
संपादकीय

ZP Elections: जिल्हा परिषदेसाठी स्वबळावरच विश्वास

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांत युती-आघाडीपेक्षा पक्षांची स्वबळाची चाचपणी अधिक ठळक ठरत आहे

पुढारी वृत्तसेवा
शशिकांत सावंत

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकांत युती-आघाडीपेक्षा पक्षांची स्वबळाची चाचपणी अधिक ठळक ठरत आहे. शिवसेनेतील फूट, भाजपची वाढती ताकद आणि राष्ट्रवादी-शेकापची भूमिका यामुळे राजकीय गणिते बदलली असून, रायगडमध्ये सत्तेची लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा तीन जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा समावेश आहे. यामध्ये युती, आघाडी जाहीर झाली असली आणि काही जिल्ह्यात जाहीर झाली नसली, तरी भाजप-शिंदे शिवसेनेने स्वबळ तपासण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने पाच उमेदवार बिनविरोध निवडून आणत आघाडी घेतली. रत्नागिरीत शिंदें शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना असा जोरदार सामना पाहायला मिळत आहे.

तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा शिंदे शिवसेना लढवत आहे. एकूण तीन जिल्हा परिषदांमध्ये 170 जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार आहेत. यात शिंदे शिवसेना 157 जागा लढवत आहे. त्या खालोखाल भाजप 130, ठाकरे शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 100 च्या आसपास जागा लढवत आहे. काँग््रेास एकूण 20 ते 25 जागा लढवत आहे. शेतकरी कामगार पक्ष 35 जागांवर लढत आहे. त्यामुळे सर्वाधिक उमेदवार उभे करण्याचे रेकॉर्ड शिंदे शिवसेनेच्या पारड्यात आहे.

सिंधुदुर्ग हा भाजपचा, रत्नागिरी शिवसेनेचा, तर रायगड शेकाप-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी मागील निवडणुकीची पार्श्वभूमी आहे; पण यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पक्षांत पडलेली फूट आणि भाजपची वाढलेली ताकद यामुळे निवडणुकीचे चित्र काहीसे वेगळे आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फारशी कुठे दिसत नसल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्याचे चित्र कोकणात पाहायला मिळत आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पूर्वीच्या गडद सीमारेषा काहीशा अस्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत.

सिंधुदुर्गात पुन्हा खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून निवडणूक लढवली जात आहे. महाविकास आघाडी काहीशी क्षीण झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यामुळे भाजपने सर्वाधिक उमेदवार निवडून आणून पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळते. रत्नागिरीत शिंदेंच्या शिवसेनेच्या विजयासाठी उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काही ठिकाणी भाजपला सोबत घेत, तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेत सत्तासूत्र शिवसेनेच्या हाती राहतील याची काळजी घेतली आहे.

रायगडमध्ये मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग््रेास, ठाकरे शिवसेना, शेकाप स्वतंत्रपणे लढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात शिंदे शिवसेना 54, राष्ट्रवादी काँगेस 51, भाजप 41, ठाकरे शिवसेना 36, शेकाप 34, तर काँग््रेास 11 जागांवर लढत आहे. एकूण 59 सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेमध्ये सत्तारूढ घटक पक्ष आमने-सामने असल्याने रंगत वाढली आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरेंविरुद्ध शिंदे सेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. या जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची 16 ते 18 जागा निवडून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग््रेास भाजपबरोबर काही ठिकाणी सहमतीचे राजकारण खेळत आहे. त्यामुळे शिवसेनेला दुसरा भिडू कोण, हे शोधावे लागणार आहे.

ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे शिवसेना यांचे वरिष्ठ नेते एकत्र यायला तयार नसले, तरी ग््राामीण भागात दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सलोखा असल्याचे पाहायला मिळते. नगरपालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन मंत्री भरत गोगावले यांनी केले. हा प्रसंगही बरेच काही सांगणारा होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर रायगडच्या राजकारणाची दिशा अधिक स्पष्ट होणार आहे. शेकाप हा राष्ट्रवादीला जवळचा मित्र वाटतो. हे चित्रही अनेकदा पुढे आले. त्यामुळे नवी गणिते जुळवण्यासाठी सर्वच नेते हे पुढील पाच दिवसांत आपली रणनीती तयार करतील आणि त्यातूनच रायगडच्या राजकारणाची दिशाही निश्चित होईल, असे चित्र आज तरी पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT