आंबा हंगाम अडचणीत सापडलेला असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाची भर पडली. त्याचा सर्वाधिक फटका कॅनिंगला बसला. दुसरीकडे मच्छीमारी आणि पर्यटन हे दोन्ही व्यवसाय पंधरा दिवस आधीच गुंडाळावे लागले. कोकणची अर्थव्यवस्था आंबा, मासळी आणि पर्यटन यावर अवलंबून असते; मात्र यंदा मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तिन्ही व्यवसायांना फटका बसलेला आहे.
मुसळधार पाऊस सुरू झाल्याने हंगाम संपण्यापूर्वीच आवराआवर करावी लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे. त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना मोठे नुकसान सहन करावे लागले. आर्थिक स्रोत असलेल्या तिन्ही व्यवसायांतील सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिणामी, आर्थिक गणित कोलमडले असून त्याचा बाजारपेठांवरही परिणाम होणार आहे. या पावसाने खरीप हंगामातील भातशेतीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. बळीराजा द्विधा मनःस्थितीत आहे. या व्यवसायातून पावसाळ्याची बेगमी करणार्यांना या अस्मानी संकटाचे फटके पुढील काही महिने सहन करावे लागणार आहेत. मे महिन्यात पावसामुळे साकाही आढळला.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य बागायदारांकडील आंबा संपुष्टात आलेला होता. रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली येथे हापूसची लागवड सर्वाधिक आहे; मात्र उरल्यासुरल्या आंब्यावर पावसाने पाणी फेरले. वर्षभर सलग पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका बसला होताच. मे महिन्यातील बराचसा आंबा कॅनिंगसाठी वापरला जातो. यावेळी पावसामुळे झाडावरील आंबा काढणे शक्य झाले नाही. कॅनिंग फॅक्टरीमध्ये 20 हजार टन आंब्यावर प्रक्रिया करून पल्प बनवला जातो. यंदा सुमारे सहा हजार टन माल कमीच मिळालेला आहे.
मच्छीमारांनी नौका 10 दिवसापूर्वीच बंदरात उभ्या करून ठेवल्या. जिल्ह्यात मच्छी उलाढालाची 28 केंद्रे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात नोंदणीकृत साडेतीन हजार मासेमारी नौका आहेत. यंदा 73 हजारटन एवढे मासळीचे उत्पादन झालेले आहे; मात्र मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सर्वसाधारणपणे होणारी 10 ते 12 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाल्याचे चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक मे महिन्यात येतात. या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटनावर आधारित सर्व व्यवसायिकांना चांगलाच फटका बसला आणि कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे यंदा भातशेतीचे भवितव्य अधांतरीच आहे. जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर भातशेती होते. गेल्यावर्षी 51 हजार हेक्टरवर शेती केली गेली. पावसामुळे उपळट झाल्याने पाणथळ शेतात पाणी साचलेले आहे. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी सुरू होते; पण याच काळात पाऊस पडल्यामुळे पुढील सर्वच वेळात्रक विस्कळीत झाले आहे. मे महिन्यात रानमेव्याला कोकणात मोठी मागणी असते. करवंदे, अळू, लोणच्यासाठी वापरात येणारे भोकरे, आमसूल व सरबतासाठी कोकम, जांभळे हे सारे गळून गेले. रानमेव्याची एक टोपली संपली, तरी एका महिलेला 500 ते 1 हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते.
यंदा हजारो कोकणी महिलांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकंदरीत आंबा, मासेमारी आणि पर्यटनाला मोठा आर्थिक फटका जिल्ह्यात बसला आहे. या अस्मानी संकटामुळे 100 कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाकडून समोर आला आहे. अलीकडच्या काळात पावसाचा काही भरवसा राहिलेला नाही. तो केव्हा, कधी, कुठे बरसेल, याची शाश्वती नाही; पण त्यामुळे कोकणचे अर्थकारण बिघडले असून सातत्याने होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.