Keir Starmer | कीर स्टार्मर  
संपादकीय

Keir Starmer | कीर स्टार्मर

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

ब्रिटनने जगाला दिलेली मोठी देणगी म्हणजे लोकशाही होय; पण त्याच देशात गेल्या काही वर्षांत एकाही ब्रिटिश पंतप्रधानाने कार्यकाळ पूर्ण केलेला नाही, हे विशेष! अशातच सर कीर स्टार्मर यांनी नुकतेच पंतप्रधान आणि लेबर पार्टीच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. स्टार्मर यांनी राजीनामा अशावेळी दिला आहे की, ज्यावेळी लेबर पार्टीच्या आत त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रदीर्घ काळापासून असंतोष वाढत होता. लेबर पार्टीच्या ४०० खासदारांपैकी १०० हून अधिक खासदारांनी आपल्याच सरकारविरोधात बंड पुकारले होते. एक तर स्टार्मर यांनी तातडीने पंतप्रधानपद सोडावे किंवा ते कोणत्या दिवशी राजीनामा देणार याची तारीख निश्चित करावी. स्टार्मर हे गेल्या १० वर्षांत कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडणारे पाचवे पंतप्रधान आहेत. यापूर्वी डेव्हिड कॅमेरून, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

स्टार्मर यांनी २०२४ च्या निवडणुकीत लेबर पार्टीला मोठा विजय मिळवून दिला होता; पण त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घसरण झाली. अनेक वाद, धोरणात्मक यू टर्न आणि राहणीमानात सुधारणा करण्याचे आश्वासन पूर्ण न करू शकल्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जबर धक्का पोहोचला. डेव्हिड कॅमेरून यांनी २०१६ मध्ये ब्रेक्झिट सार्वमतामध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या थेरेसा मे संसदेतून ब्रेक्झिट करार मंजूर करून घेऊ शकल्या नाहीत आणि त्यांना २०१९ मध्ये पद सोडावे लागले. यानंतर बोरिस जॉन्सन यांनी कोरोना काळात सरकारी निवासस्थानी झालेल्या पार्ट्या आणि अनेक राजकीय वादांमुळे २०२२ मध्ये राजीनामा दिला. त्यांच्यानंतर लिझ ट्रस पंतप्रधान बनल्या; पण त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे बाजारात मोठी घबराट निर्माण झाली. त्या केवळ ४९ दिवसच पदावर राहू शकल्या आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनाक पंतप्रधान झाले; पण वाढती महागाई आणि आर्थिक आव्हानांमुळे सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव झाला, ज्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान बनू शकले नाहीत.

आता स्टार्मर यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनला ७ वर्षांत सहावा आणि १० वर्षांत सातवा पंतप्रधान मिळणार आहे. पेशाने वकील असलेले स्टार्मर हे ब्रिटनमधील उच्चशिक्षित राजकारणी मानले जातात. त्यांनी ऑक्सफर्ड आणि लीडस्‌ विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी १९८७ मध्ये वकील म्हणून कारकीर्द सुरू केली. अनेक वर्षे वकिली करत असतानाच त्यांनी राजकरणात नशीब आजमावले आणि २०१५ मध्ये ते ब्रिटिश संसदेचे सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले.

२०२० मध्ये ते लेबर पक्षाचे नेते बनले. त्यानंतर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पक्षाने मोठा विजय मिळवला आणि ते ब्रिटनचे पंतप्रधान झाले. स्टार्मर हे मानवाधिकार आणि फौजदारी कायद्याच्या क्षेत्रातील अनुभवी वकील असून, त्यांनी लेबर पक्षाला पुन्हा सत्तेत आणून ब्रिटनचे पंतप्रधानपद मिळवले; पण ब्रिटनमध्ये पंतप्रधान वारंवार बदलण्याचे मोठे कारण तेथील संसदीय व्यवस्था आहे. तिथे पंतप्रधान थेट जनतेद्वारे निवडले जात नाहीत, तर त्यांच्या पक्षाचे खासदार त्यांना पाठिंबा देतात. पंतप्रधान तोपर्यंतच पदावर राहू शकतात, जोपर्यंत पक्षाचे खासदार त्यांच्या पाठीशी उभे राहतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT