केटी पेरी Katy Perry (Pudhari File Photo)
संपादकीय

Pop Star Katy Perry | केटी पेरी

केटी पेरी एक प्रसिद्ध अमेरिकन गायिका, गीतकार आहे.

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

केटी पेरी एक प्रसिद्ध अमेरिकन गायिका, गीतकार आहे. ती तिच्या पॉप संगीतातील योगदानासाठी आणि तिच्या खास शैलीसाठी ओळखली जाते. ती इतिहासातील सर्वाधिक संगीत रेकॉर्ड विक्री होणार्‍या कलाकारांमध्ये गणली जाते. तिचे जगभरात 143 दशलक्ष रेकॉर्ड विकले आहेत. केटी तिच्या फॅशन सेन्स आणि सोशल मीडियावर सक्रियतेसाठी ओळखली जाते. ती व्यावसायिक आयुष्यासोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

केटी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे नुकतेच एकत्र डिनर करताना दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 28 जुलै 2025 रोजी रात्री मॉन्ट्रियलमधील मले वायलोनया हाय-प्रोफाईल रेस्टॉरंटमध्ये दोघांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर त्यांच्यात नव्या नात्याची सुरुवात झाल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, यामध्ये केटी आणि ट्रुडो हे एकाच टेबलवर बसून मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या अटकळी लावल्या जात आहेत. ही भेट एका खासगी डेटसारखी वाटत असली तरी, ते दोघे एकटे नव्हते. त्यांच्यासोबत अनेक सुरक्षा रक्षकही होते, जे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन होते. हे सुरक्षा रक्षक जवळच्याच टेबलवर बसून काचेच्या भिंतीआडून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

केटी आणि ट्रुडो यांनी रेस्टॉरंटमध्ये लॉबस्टरसह अनेक पदार्थांची ऑर्डर दिली. जेवणानंतर रेस्टॉरंटचे हेड शेफ स्वतः दोघांना भेटायला आले आणि त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, जेवण संपल्यावर केटी आणि ट्रुडो यांनी स्वतः किचनमध्ये जाऊन तेथील कर्मचार्‍यांचे आभार मानले. दोघेही खूप मनमिळाऊ वाटत होते आणि त्यांच्यात बराच वेळ संवाद सुरू होता, असे सांगितले जात आहे. सध्या केटी तिच्या नवीन अल्बम ‘143’ च्या प्रमोशनसाठी कॅनडाच्या दौर्‍यावर आहे. तिने नुकताच विनिपेगमध्ये एक शो केला असून तिचा पुढील कार्यक्रम ओटावा येथे होणार आहे. 2023 मध्ये ट्रुडो यांनी त्यांची पत्नी सोफी यांच्यासोबतचेc

18 वर्षांचे वैवाहिक नाते संपुष्टात आणले होते, तर दुसरीकडे या वर्षाच्या सुरुवातीलाच केटीचे अभिनेता ऑरलँडो ब्लूमसोबत ब्रेकअप झाले आहे. दोघांना एक मुलगी असून ते अजूनही चांगले मित्र आहेत आणि मिळून मुलीचे संगोपन करत आहेत. यापूर्वी केटीचे पहिले लग्न 2010 मध्ये ब्रिटिश कॉमेडियन रसेल ब्रॅंडसोबत झाले होते. राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाजवळ एका पारंपरिक हिंदू समारंभात हा विवाह पार पडला होता; पण दोघांचे नाते केवळ 14 महिन्यांतच संपले. काही लोकांना केटी आणि ट्रुडो यांचे डिनर म्हणजे एका नवीन नात्याची सुरुवात वाटत असला तरी, दोघांपैकी कोणीही यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र सोशल मीडियावर या भेटीची जोरदार चर्चा सुरू असून केटी पेरी बॉयफ्रेंड आणि जस्टीन ट्रुडो डेटिंग यासारखे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये असल्याचे बघायला मिळत आहे, हे विशेष!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT