करीना थापा pudhari photo
संपादकीय

चर्चेतील चेहरा: करीना थापा

Karina Thapa: प्रतिष्ठित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा
सचिन बनछोडे

आपल्या देशात लहान वयातच धैर्य आणि प्रसंगावधान राखून इतरांचे प्राण वाचवणारे अनेक लहान मुलं-मुली आहेत. अशा अनेक मुलांना आतापर्यंत राष्ट्रीय शौर्य पुरस्कारही मिळालेले आहेत. आता अशीच एक सतरा वर्षांची मुलगी 70 कुटुंबांचे प्राण वाचवल्यामुळे देशभरात चर्चेत आली आहे. अमरावतीच्या करीना थापा या मुलीने एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीवेळी प्रसंगावधान राखून व धाडस दाखवून अनेकांचे प्राण वाचवले. आता तिला गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाद्वारे दिल्या जाणार्‍या प्रतिष्ठित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येईल.

15 मे 2024 या दिवशी सायंकाळी अमरावतीच्या कठोरा रोडवर असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळील जय अंबा अपार्टमेंटच्या बी विंगमधील दुसर्‍या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे उडालेल्या गोंधळात घरकाम करणार्‍या करीनाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये घुसून, धुराचे लोट आणि आगीच्या ज्वालांचा सामना करीत गॅस सिलिंडरजवळ लागलेली आग आटोक्यात आणली. तिने बादलीतून पाणी घेऊन सिलिंडरच्या चारही बाजूला लागलेली आग नियंत्रित केली आणि सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन आग भडकण्याची आणि दुर्घटनेची व्याप्ती वाढण्याची भीती दूर झाली. करीनाचे हे धाडस आणि प्रसंगावधान अपार्टमेंटमधील 70 कुटुंबांचे प्राण वाचवणारे ठरले. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच करीनाने हे सिलिंडर बाहेर काढून मोठाच अनर्थ टाळला. त्यानंतर अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले व सर्व रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला!

अपार्टमेंटचे केअर टेकर असलेले अशोक थापा यांची करीना ही कन्या. पत्नी आणि दोन मुलींसह केअरटेकर म्हणून जबाबदारी सांभाळणार्‍या मूळच्या नेपाळमधील अशोक थापा यांच्या कुटुंबीयांनी या अपार्टमेंटलाच आपले घर मानले आहे. अमरावतीतच अकरावीचे शिक्षण घेत असलेली करीना आपल्या आईला मदत म्हणून अपार्टमेंटमध्ये घरकाम करते. फ्लॅटमधून धूर निघत असल्याचे दिसताच तिने आधी फ्लॅटचे दार ठोठावले. कुलूप असल्याने आतून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहताच तिने लगेचच वडिलांना घटनेची माहिती दिली. मात्र, या संकटाच्या काळात आपणच तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असे तिला वाटले. एव्हाना फ्लॅटला आग लागली. ती आग तत्काळ विझवण्यासाठी तिने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आग व धुराचे लोट येत असतानाही एका व्यक्तीच्या मदतीने तिने बादलीतून पाण्याचा मारा करीत सिलिंडरजवळील आग पूर्णपणे आटोक्यात आणून सिलिंडर बाहेर काढले. वडिलांचे कार्य एका अर्थी या लेकीने आपलीच जबाबदारी आहे असे जाणून पार पाडले. ती खर्‍या अर्थाने वडिलांप्रमाणेच अपार्टमेंटची ‘केअरटेकर’ बनली! आता या वीर कन्येला राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT