महात्मा जोतिबा फुले हे महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील एक श्रेष्ठ समाजसुधारक आहेत. तसेच ते श्रमजीवी वर्गाच्या सामाजिक व आर्थिक गुलामगिरीची व त्यांच्यावर होणार्या अन्यायाची मीमांसा करून त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारा एक विधायक व क्रांतिकारक विचारवंत म्हणून सुपरिचित आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त...
जोतिबा फुले यांच्या काळात दिन-दलितांना शिक्षण घेण्याची सोय नव्हती. त्यांना शिक्षणाचे मार्गही उपलब्ध नव्हते; पण जोतिबांना शिक्षणाची विलक्षण आवड असल्यामुळे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने शालांत परीक्षेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्जनासाठी अपरिमित कष्ट केले. इंग्रजीतील श्रेष्ठ ग्रंथांचे वाचन व आकलन तसेच लेखन करण्याइतपत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन केले. चातुर्वर्ण्य व्यवस्था, जातिभेद, रुढी व परंपरा यांच्या प्रभावामुळे अनेक शतकांपासून अस्पृश्य व दीनदलित जनतेला ज्ञानार्जनाची दारे बंद झाली होती. त्यामुळे या वर्गातील जनतेची सामाजिक, आर्थिक व अन्य सर्व क्षेत्रांत अवनती होऊन हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले होते. या दैन्यावस्थेतून या जनतेला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शिक्षण हे ओळखून त्यांनी शिक्षणासंबंधी सखोल विचार करून मते मांडली. दीनदलितांमध्ये शिक्षण प्रसार होण्यासाठी शाळा उघडून प्रत्यक्ष शिक्षण देण्याचे कार्य केले. केवळ मुलांच्याच नव्हे, तर मुलींच्याही शिक्षणाचा पायंडा त्यांनी पाडला आणि त्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी शाळा स्थापन केली. या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचे त्यांना सर्वतोपरी सहकार्य लाभले. ज्योतिबा यांच्या प्रेरणेने त्या स्वतः शिकल्या व त्यांनी मुलींच्या शाळेची जबाबदारी स्वीकारून स्त्री शिक्षणाचे कार्य जोेतिबांच्या निधनानंतरही सुरू ठेवले. दीनदलितांच्या उद्धारासाठी शिक्षण व ज्ञान हे एकमेव साधन असल्याची जोेतिबा यांची ठाम धारणा होती. शिक्षणामुळे दीनदलितांना आपल्यावरील अन्यायाची जाणीव होईल आणि त्याबाबत चीड येऊन त्याचा प्रतिकार करण्याची प्रवृत्ती व शक्ती त्यांच्या मनात निर्माण होईल, आपल्या अधिकारांबाबत ते जागृत होतील असा जोेतिबा यांचा विश्वास होता. बुद्धी किंवा शिक्षण घेण्याची पात्रता जन्मजात नसते, हेच त्यांना सुचवायचे होते. म्हणून तत्कालीन संकेत व परंपरा तोडून त्यांनी सर्वांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला. जोतिबा हे केवळ सामाजिक व धार्मिक सुधारक नव्हते, तर ते शिक्षण सुधारक आणि क्रांतिकारक होते. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. ज्योतिबा यांनी 1848 मध्ये पुण्यातील तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मागास जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. 1848 रोजी जोेतिबा यांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या. जोेतिबा यांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनविले आणि त्यांनी शिक्षणाचे अविरत कार्य सुरू ठेवले. ज्योतिबा यांनी काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर 1853 मध्ये मागासवर्गीयांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. 1955 मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली रात्र शाळा त्यांनी स्थापन केली. 1882 मध्ये भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर ज्योतिबा साक्ष देऊन 12 वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती-जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसार्याची रक्कम ही शेतकर्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे, अशी मागणी करणारे जोतिबा हे आशिया खंडातील पहिले शिक्षणतज्ज्ञ होते.