(सभागृहात प्रश्न-उत्तरांची जुगलबंदी)
अध्यक्ष : प्रश्न क्रमांक 550. उद्योगसंबंधी विचारण्यात यावा.
खासदार : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाविषयी प्रश्नावर संबंधित मंत्री यांनी उत्तर दाखल करावे. समस्या असतील तर सांगाव्यात. (सभेत शुकशुकाट)
अध्यक्ष : मंत्रिमहोदय त्वरित उत्तर दाखल करा, हा आदेश आहे.
खासदार : मंत्रिमहोदय आणि इतर संबंधित व्यक्ती इथे या ठिकाणी अनुपस्थित आहेत.
अध्यक्ष : कसे सुटणार देशाचे प्रश्न? उद्योगधंद्यांवर देशाचे भवितव्य आधारित आहे.
खासदार : त्यांचे भवितव्य विस्तवावर दिसते. घरोघरी मातीच्या चुली त्याप्रमाणे.
अध्यक्ष : गॅसवर का नाही बोललात? विस्तवावर काय पोळ्या भाजणार ते?
खासदार : अध्यक्ष महोदय, गॅसचा तुटवडा आहे देशात आपणास माहिती असावे. (हशा)
अध्यक्ष : कृपया शांतता राखा. थोडी वाट पाहा. त्यानंतर पुढील प्रश्न घ्यायला हरकत नाही.
खासदार : महोदय, हे मंत्रिमहोदयांचे वेळकाढू धोरण सभेच्या पचनी पडेल की नाही माहिती नाही; पण नियम सर्वांना सारखे हवेत.
अध्यक्ष : नियम पाळून प्रश्न सुटत नाहीत.
खासदार : जनसंपर्क आणि स्वसुरक्षा हल्ली बेताचीच ठेवल्यामुळे मंत्रिमहोदय सगळीकडे उशिरा पोहोचतात. ताफे पेट्रोलमुळे कमी केलेत.
अध्यक्ष : खासगीकरण आणि राजकारण यात अंतर आहे. कृपया खात्यांतर्गत बाबींमध्ये इतर खात्यांनी लुडबुडू नये. ऐरणीवरचे प्रश्न धीराने सोडवावे लागतात. असेल काहीतरी क्लिष्ट बाब. थोडा वेळ थांबू.
खासदार : महोदय, नसते उद्योग झालेत हल्ली. कोणी वेळेवर येत नाहीत. प्रश्न ऐरणीवरच ठेवायचा हेतू दिसतो त्यांचा उत्तर नसल्याने.
अध्यक्ष : मग, तुम्ही द्या. बुद्धिवादी आहात. विश्लेषण करा प्रश्नाच्या स्वरूपाचे.
खासदार : ते आमचे खाते नाही.
अध्यक्ष : ते समोर बसले आहेत त्यांच्या जागी कोण आहेत. बेजबाबदार आहात सगळे. कोणी कुठेही बसतो.
अन्य मंत्री : (टिपणी लिहून ठेवत) हे माझे खाते नाही. ते पूर्वी माझ्याकडे होते, आता मी अन्नमंत्री आहे.
अध्यक्ष : हा प्रश्न निलंबित करा. पुढचा घ्या.
खासदार : ते बघा, मंत्रिमहोदय अवतरले.
अध्यक्ष : ओके. इथून पुढे आपण वेळेवर यावे; अन्यथा रामदासजी अध्यक्षपद स्वीकारतील. कवितांना सामोरे जावे लागेल. (हशा)
मंत्री : थांबा मी आलोय.
अध्यक्ष : गौरवास्पद की हास्यास्पद? बसून बोला.