सृष्टीच्या प्रारंभी केवळ एकमेवाद्वितीय असे ‘ब्रह्म’च होते. प्राचीन बृहदारण्यक उपनिषदात म्हटले आहे की ‘ब्रह्म वा इदमग्र आसीत’ म्हणजे प्रारंभी केवळ निराकार, एकमेवाद्वितीय ब्रह्मच होते. त्याने ‘एकोऽहम बहुस्याम’ असा संकल्प केला आणि या दिव्य संकल्पातून विविध नाम-रूप व कर्माच्या सृष्टीची निर्मिती झाली. या सृष्टीचे निमित्त आणि उपादान कारण एक ब्रह्मच आहे. याचा अर्थ एक परब्रह्मच विविध रूपांनी नटलेले आहे, वेगवेगळ्या क्रीडा करीत आहे; मात्र मायेमुळे त्याची प्रचिती सर्वांनाच येते असे नाही. त्यामुळेच या भौतिक जगतात ज्या-ज्या वेळी अधर्माचे वर्चस्व वाढते, सज्जनांचा छळ होऊ लागतो, त्यावेळी तेच निराकार, निर्गुण परब्रह्म स्वमायेने साकार रूपात प्रकटते. पाच हजार वर्षांपूर्वी द्वापारयुगाच्या अखेरीसही हे परब्रह्म ‘वसुदेव व देवकीचा पुत्र श्रीकृष्ण’ या सुंदर रूपात प्रकटले. भगवद्गीतेत स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे की, ‘मी अजन्मा आणि अविनाशीस्वरूप ईश्वर असूनही प्रकृतीला अधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होतो. ज्या-ज्या वेळी धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होते, त्या-त्या वेळी मी साकार रूपात प्रकट होतो.’ या श्रीकृष्णावतारात भगवंताने ज्या थक्क करणार्या लीला करून दाखवल्या, त्या आजही देश-विदेशात भक्तिभावाने गायिल्या जातात. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे की, ‘जन्म कर्म च मे दिव्यमेवं...’ माझा अवतार व लीला या दिव्य आहेत. त्यांना जे तत्त्वतः जाणतात, त्यांचा पुनर्जन्म होत नाही व ते माझ्या स्वरूपाला प्राप्त करतात’.
भगवान श्रीकृष्णाचे अलौकिक चरित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या संकुचितपणाला झिडकारून सर्वव्यापकतेचाच पुरस्कार केलेला आहे. त्यांचा भगवद्गीतेतील उपदेश असो किंवा उद्धवगीतेतील, यामध्येही संकुचितपणाला झिडकारून उदात्त, व्यापकतेचा राजमार्गच दाखवलेला आहे. श्रीकृष्णांच्या चरित्रातूनही भुकेलेल्या अन्न देणे (यज्ञपत्नींची कथा), निसर्ग-नद्या आणि पर्वतांची काळजी घेणे (गोवर्धनपूजा), अन्यायाला प्रखर विरोध करणे (कंस व असुरांचे मर्दन), विद्यासंपादन व गुरुसुश्रूषा करणे (सांदिपनी आश्रम), गरिबांची उन्नती घडवून आणणे (सुदामा) असे अनेक प्रकारचे उपदेश मिळतात. भौमासुराने अपहरण केलेल्या राजकन्यांशी विवाह करून श्रीकृष्णाने त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. एक योद्धा, राजनीतिज्ञ म्हणूनही श्रीकृष्णाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे श्रीकृष्णाचा नेहमी ‘पूर्णावतार’ म्हणून गौरव केला जात असतो. ‘कृष्णस्तु भगवान स्वयम्’ अशी त्यांची महती व्यासांनीही गायिली. श्रीकृष्णाकडे एक देहधारी व्यक्ती म्हणून पाहणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. तसेच श्रीकृष्ण कुठे दूरवर आहेत, असे समजणेही अज्ञानच आहे. श्रीकृष्ण आत्मस्वरूप आहेत. छांदोग्य उपनिषदात म्हटले आहे की ‘स वा एष आत्मा हृदि’ (हा आत्मा हृदयातच आहे.) श्रीकृष्णानेही गीतेत म्हटले आहे ‘सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो’ (मी सर्वांच्या हृदयात आत्मस्वरूपाने अस्तित्वात आहे.) तसेच ‘ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति’ (सर्व प्राण्यांच्या हृदयात ईश्वर आहे.) या आनंदकंद परमात्म्याचे वर्णन छांदोग्य उपनिषदात ‘भूमा’ असे केले आहे. ‘भूमा’ म्हणजे सर्वव्यापक, निरतिशय तत्त्व. जो भूमा आहे, तेच खरे सुख आहे. अल्प किंवा संकुचितपणामध्ये सुख नसते. त्यामध्ये तृष्णा असते व ही तृष्णाच दुःखालाही कारणीभूत ठरते. हा ‘भूमा’ म्हणजेच आत्मा सर्वत्र व्यापून आहे. श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलेय, योगी सर्व भूतमात्रांमध्ये आत्मरूपाने स्थित अशा मज सच्चिदानंदघन वासुदेवालाच भजतो. ‘वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः’ सर्व काही एक वासुदेवच आहे, त्याशिवाय एक कणही रिता नाही, असे भगवंताने म्हटलेले आहे. तोच आपल्या हृदयातही आत्मस्वरूपाने विद्यमान आहे. आपल्या हृदयातच असलेल्या या भगवंताचा कुणीही खर्या अर्थाने ‘भक्त’ होऊ शकतो, म्हणजे ‘विभक्त’ न होता त्याचा आपल्या हृदयातच अनुभव घेऊ शकतो. ‘भक्त्या मामभिजानाति’ (भक्तीने मला जाणता येऊ शकते) असे भगवंतांनीही म्हटले आहे. अशी भक्ती करणे म्हणजेच भगवंताचा जन्म व कर्म यांना ‘तत्त्वतः जाणणे’ होय! त्या आत्मस्वरूपी, हृदयस्थ श्रीकृष्णाला जन्माष्टमीनिमित्त शतशः वंदन!