पहिला चहा | जान्हवीच्या नाकात दम! 
संपादकीय

पहिला चहा | जान्हवीच्या नाकात दम!

पुढारी वृत्तसेवा

नाक कापले जाऊ नये म्हणून माणूस आयुष्यभर प्रयत्न करत राहतो. बॉलीवूडमध्ये मात्र नाक करिअर घडवू शकते. बॉलीवूडमध्ये नायिका होण्यासाठी अभिनय यायला हवा, नृत्य यायला हवे, संवादफेक जमायला हवी, असे आपण उगाचच समजत होतो. जान्हवी कपूरच्या ताज्या खुलाशानंतर कळले की, या सगळ्यांपेक्षाही आधी नाकाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. नाक सरळ असेल, तर अभिनयाचा रस्ता मोकळा होतो आणि नाक नसेल (म्हणजे नीट), तर अभिनयाच्या रस्त्यात सर्जरी येते.

जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले की, तिने अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्याकडे व्यक्त केली होती, तेव्हा श्रीदेवीला आश्चर्य वाटले होते. त्यांनी सल्ला दिला की, या क्षेत्रात यायचे असेल, तर संपूर्ण आयुष्य अभिनयाला द्यावे लागेल; पण फक्त एवढंच नव्हतं, तर जेव्हा जान्हवीने नाकावर शस्त्रक्रिया केली, त्यानंतर श्रीदेवीला जान्हवीमध्ये अभिनेत्री होण्याची क्षमता दिसू लागली. म्हणजे अभिनयाची प्रतिभा नाकाच्या शस्त्रक्रियेआधी सुप्तावस्थेत होती आणि शस्त्रक्रियेनंतर तिला ऑक्सिजन मिळाला! डॉक्टरांनी जान्हवीचे नाक दुरुस्त केले आणि श्रीदेवीला जान्हवीच्या अभिनयाचे भविष्य दिसू लागले. वैद्यकीय क्षेत्राने अभिनय क्षेत्रालाही नवी दिशा (म्हणजे जान्हवी) दिली आहे.

उद्या एखाद्या निर्मात्याने नायिकेची ऑडिशन घेताना अभिनयाचा एक सीन आणि नाकाचा एक्स-रे मागितला, तर आश्चर्य वाटायला नको. जान्हवीने आणखी एक गोष्ट सांगितली. ती म्हणजे, खुद्द श्रीदेवी यांनीही नाकाची शस्त्रक्रिया केली होती. बॉलीवूडमध्ये नशीब, मेहनत, अभिनय आणि सौंदर्य यांची भट्टी सतत पेटलेली असते. कोणाला नृत्यामुळे संधी मिळते, कोणाला अभिनयामुळे, तर कोणाला स्टारकिड असल्यामुळे; पण जान्हवीच्या या विधानाने सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात नाकाला स्वतंत्र प्रकरण मिळण्याची शक्यता निर्माण केली आहे.

शेवटी प्रश्न आहेच. अभिनय नाकात असतो का? बॉलीवूडमध्ये आता टॅलेंटपेक्षा नाकाला धार असणे महत्त्वाचे ठरू लागले आहे. इथे अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकता येतात; पण आधी नाकाने दिग्दर्शकाचे लक्ष जिंकावे लागते! टॅलेंटला संधी मिळेल की नाही, सांगता येत नाही; पण नाकाला मात्र दुसरी संधी मिळू शकते...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT