संपादकीय

सामाजिक न्यायाचे अध्वर्यू : जननायक कर्पूरी ठाकूर

Arun Patil

जननायक कर्पूरी ठाकूर यांची आज बुधवारी जन्मशताब्दी आहे. सामाजिक न्यायासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. कर्पूरी यांना भेटण्याची संधी मला कधी मिळाली नाही; पण त्यांचे निकटवर्ती कैलाशपती मिश्रा यांच्याकडून मी त्यांच्याबद्दल खूप ऐकले आहे. ते नाभिक या मागासलेल्या समाजातील होते. असंख्य अडथळ्यांवर मात करत त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी काम केले.

जननायक कर्पूरी ठाकूर यांचे जीवन साधेपणा आणि सामाजिक न्याय या दुहेरी स्तंभाभोवती गुंफले आहे. अखेरच्या श्वासापर्यंतची त्यांची साधी राहणी आणि नम्र स्वभाव सर्वसामान्यांच्या स्मृतीत कायम राहील. त्यांच्यासोबत काम केलेल्या असंख्य लोकांनी ठाकूर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासह कोणत्याही वैयक्तिक बाबींसाठी स्वतःचेच पैसे खर्च केले, याबाबतच्या आठवणी सांगितल्या. बिहारचे मुख्यमंत्री असताना राजकीय नेत्यांसाठी वसाहत बांधण्याचा निर्णय घेतला; पण त्यांनी स्वत:साठी कोणतीही जमीन किंवा पैसा घेतला नाही. 1988 मध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हा अनेक नेते आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावाला गेले होते. तेव्हा त्यांच्या घराची अवस्था पाहून सर्वांना अश्रू अनावर झाले, एवढ्या मोठ्या माणसाचे घर इतके साधे कसे असू शकते?

त्यांच्या साधेपणाचे अजून एक उदाहरण द्यायचे झाले, तर काही वर्षांपूर्वी 1977 मध्ये ज्यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला होता, तेव्हाचे द्यावे लागेल. त्यावेळी दिल्ली आणि बिहारमध्येही जनता पक्षाचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी जनता दलाचे नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमध्ये जमले होते. प्रमुख नेत्यांच्या मांदियाळीत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर फाटका सदरा घालून फिरत होते. आपल्या अनोख्या शैलीत चंद्रशेखर यांनी लोकांना काही पैसे दान करण्याचे आवाहन केले, ज्या निधीमधून कर्पूरी एक नवीन सदरा विकत घेऊ शकतील. त्यांनी पैसे तर स्वीकारले, मात्र ते त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दान केले.

जननायक ठाकूर यांना सामाजिक न्यायाप्रती विशेष आस्था होती. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत एका अशा समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी कार्य केले, जिथे प्रत्येकाला मग तो समाजाच्या कोणत्याही स्तरातील असो, संसाधनांचे समान वाटप केले, प्रत्येक व्यक्तीला समान संधी कशी मिळेल याकडे पाहिले. आदर्श आणि मूल्यांप्रती त्यांची निष्ठा इतकी दृढ होती, की ज्या काळात काँग्रेस पक्ष सर्वव्यापी होता, त्यावेळीही त्यांनी स्पष्टपणे काँग्रेसविरोधी भूमिका घेतली. कारण काँग्रेस मूलभूत तत्त्वांपासून विभक्त झाली आहे, याची त्यांना जाणीव झाली होती. ठाकूर यांची राजकीय कारकीर्द 1950 च्या दशकाच्या सुरुवातीस सुरू झाली आणि तेव्हापासून ते कामगार वर्ग, मजूर, लहान शेतकरी आणि तरुणांच्या संघर्षांना मोठ्या हिमतीने आवाज देत राहिले आणि विधिमंडळाच्या सभागृहातले एक सामर्थ्यवान प्रतिनिधी झाले. शिक्षण हा विषय अगदी जवळचा विषय होता. संपूर्ण राजकीय जीवनात त्यांनी गरिबांसाठी शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये शिक्षण द्यावे या विचारांचे ते पुरस्कर्ते होते, ज्यामुळे छोटी शहरे आणि खेड्यातील लोक शिक्षण घेऊन जीवनात यशोशिखरावर पोहोचतील. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठीही उपाययोजना केल्या.

लोकशाही, वादविवाद आणि चर्चा हे ठाकूर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. बालपणी त्यांनी भारत छोडो आंदोलनात स्वतःला झोकून दिले. जेव्हा त्यांनी आणीबाणीचा सर्वशक्तीनिशी प्रतिकार केला, तेव्हा ते धैर्य पुन्हा दिसून आले. जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया आणि चरणसिंह यांच्या सारख्यांनी त्यांच्या अद्वितीय अशा कामगिरीची प्रशंसा केली. मागासवर्गीयांना त्यांचे हक्काचे प्रतिनिधित्व आणि संधी मिळतील आणि अस्तित्वासाठी कृती यंत्रणा बळकट करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या या निर्णयाला प्रचंड विरोध झाला; पण ते कोणत्याही दबावापुढे झुकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली, धोरणे अमलात आणली गेली. जिथे एखाद्याचा जन्म एखाद्याचे भाग्य ठरवत नाही, या आधारावर या धोरणांनी अधिक समावेशक समाजासाठी पाया घातला. ते समाजातील सर्वात मागासलेल्या स्तरातील होते; पण त्यांनी सर्व लोकांसाठी काम केले. त्यांच्यामध्ये कटुतेचा कोणताही मागमूस नव्हता, हे वैशिष्ट्य त्यांना खरोखर महान बनवते.

गेली दहा वर्षे आमचे सरकार जननायक ठाकूर यांच्या मार्गावर चालले आहे, आमच्या योजना आणि धोरणांमध्ये परिवर्तनशील सशक्तीकरण आणले आहे. ठाकूर यांच्यासारख्या काही नेत्यांना वगळून सामाजिक न्यायाची हाक केवळ राजकीय घोषणांपुरती मर्यादित राहिली, ही आपल्या राजकारणाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. ठाकूर यांच्या दृष्टिकोनाने प्रेरित होऊन आम्ही त्यांचे दृष्टिकोन प्रभावी शासन मॉडेल म्हणून अमलात आणले. मी आत्मविश्वासाने आणि अभिमानाने सांगू शकतो, की गेल्या काही वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्याच्या भारताच्या कामगिरीचा जननायक ठाकूर यांना खूप अभिमान वाटला असेल.

ठाकूर यांच्यासारखे लोक समाजातील सर्वाधिक मागास वर्गातील आहेत, ज्यांना वसाहतवादी शासनापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुमारे सात दशके मूलभूत सुविधा नाकारल्या होत्या. त्याचवेळी प्रत्येक योजनेचे 100 टक्के लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे सुनिश्चित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे सामाजिक कल्याणाबाबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचे दर्शन घडत आहे. आम्ही इतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात यश मिळवले आहे (दुर्दैवाने ज्याला काँग्रेसने विरोध केला होता), ठाकूर यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही काम करत आहोत. सरकारची पीएम-विश्वकर्मा योजना भारतातील इतर मागासवर्गाच्या समुदायाच्या कोट्यवधी जनतेसाठी समृद्धीची नवी दालनेदेखील खुली करणार आहे. मी स्वतःच इतर मागासवर्गातील असल्यामुळे जननायक ठाकूर यांचा मी खूप आभारी आहे. दुर्दैवाने आपण ठाकूर यांना कमी वयात 64 व्या वर्षी गमावले. आम्हाला अधिक गरज असताना आपण त्यांना गमावले. तरीही ते कोट्यवधी जनतेच्या हृदयात राहतील. ते खर्‍या अर्थाने जननायक होते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT