पाकिस्तान फुफाट्यात! (Pudhari File Photo)
संपादकीय

पाकिस्तान फुफाट्यात!

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षाने आशियात तणाव!

पुढारी वृत्तसेवा

इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने जगाला घेरले असून, गेल्या अठरा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धात इराणचे 1400 लोक मृत्युमुखी पडले, तर इस्रायलचे 15 आणि लेबनॉनमधील 800 लोक मरण पावले. युद्ध जूनपर्यंत लांबल्यास लाखो लोकांना भुकेच्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा ‌‘वर्ल्ड फूड प्रोग््रॉम‌’ने दिला आहे. ही भीषण लढाई सुरू असतानाच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. दहशतवाद पोसणारे हे दोन्ही देश एकमेकांची डोकी फोडत आहेत. इस्लामी देशांची एकजूट उभारण्याचे प्रयत्न आजवर अनेकदा झाले असले, तरी ते फोल ठरले. त्यांच्यात शिया-सुन्नी वाद आहेच आणि याखेरीज अनेक गट-उपगटही आहेत. याच कारणातून आखात आणि आशियातील हे देश एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. यापैकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश धार्मिक राष्ट्रवादावर उभे राहिले असले, तरी धर्माधिष्ठित राज्य कधीही शांतता व प्रगती देऊ शकत नाही. आता ही दोन्ही धर्मवादी राष्ट्रे एकमेकांविरुद्ध रणभूमीवर उभी आहेत.

पाकिस्तानने सोमवारी रात्री अफगाणिस्तानात काबूलवर हवाई हल्ले करून तेथील अनेक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या. व्यसनमुक्ती पुनर्वसन रुग्णालयावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 400 जणांचा मृत्यू झाला. युद्धामध्येदेखील नागरी वस्त्यांवर किंवा धर्मादाय संस्थांवर हल्ले केले जात नाहीत. व्यसनमुक्ती पुनर्वसनाचे काम हे समाजपरिवर्तनाचे असून त्यालाच लक्ष्य करून आपण किती नीच पातळीवर जाऊ शकतो, हे या देशाने दाखवून दिले. आता हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा अफगाणिस्तानने दिला आहे; मात्र दहशतवादी तळांनाच लक्ष्य केल्याचे पाकने म्हटले आहे. रमजान महिन्यात अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत भारताने पाकचा तीव शब्दांत निषेध केला. रास्तपणे ही खणखणीत भूमिका घेतली असून, पाक हे कसे दहशतवादी राष्ट्र आहे, हेच जगापुढे पुन्हा आणले. पाकने नेहमीच भारतावर खोटे व तथ्यहीन आरोप केल्याचेही म्हणत हा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणला. पाक आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश दहशतवाद्यांचे अड्डे म्हणून ओळखले जातात. युरोप व अमेरिकेतील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये या दोन देशांतील सत्ताधाऱ्यांचा आणि अतिरेकी संघटनांचा हात होता. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट निर्घृण असून, एकेकाळी जगभर दहशतवादी कारवाया करणारे तालिबानी आता सत्तेवर आहेत. या दोन देशांतील संघर्ष नवीन नाही. तो ऐतिहासिक, राजकीय आणि सुरक्षेच्या कारणांनी सतत पेटत राहिला. 1893 मध्ये आखलेली ड्यूरंड रेषा अफगाणिस्तान मान्य करत नाही. या सीमेमुळे पश्तून लोक दोन देशांत विभागले गेले. त्यामुळे संघर्ष सतत धुमसत राहिला. या दोन्ही देशांत अल्पसंख्याकांवर हल्ले केले जात आहेत आणि स्त्रियांच्या लेखी गुलामीचे जिणे आले. अफगाणिस्तानातून 1980 च्या दशकात रशियन फौजांना हाकलून लावण्याच्या मोहिमेत पाक व अफगाणिस्तान हे दोन्ही देश एकत्र आले होते. तालिबान्यांचे अस्तित्व या दोन्ही देशांत असून, अन्य देशांमध्ये घुसून दहशतवादी कारवाया करणाऱ्या या उभय देशांनाच आता दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी काबूल, कंदाहार आणि पक्तिया या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानच्या 133 तालिबानी सैनिकांना कंठस्नान घातल्याचा दावा पाकने केला होता, तर प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या 55 सैनिकांना ठार मारल्याचा दावा करण्यात आला. ‌‘आमचे हे उघड उघड युद्ध सुरू झाले आहे, असे आम्ही मानतो‌’, असे उद्गार पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी काढले होते. अफगाणविरूद्ध ‌‘ऑपरेशन गजब लिल हक‌’ सुरू केल्याची घोषणाही केली. पाकने या हल्ल्यात 27 लष्करी चौक्या उडवल्या. प्रत्युत्तरात अफगाण लष्कराने ड्युरंड सीमेवरील पक्तिया, खोस्त, नांगरहार आणि नुरीस्तान या भागांजवळच्या पाक चौक्यांवर तुफानी हल्ले केले. त्यानंतर पाकने युद्धाची घोषणा करत अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले.

मुळात पाकिस्तान हा दहशतवादी व दिवाळखोर देश अतिरेकी कारवायांमुळे स्वतःच घेरलेला आहे. अफगाणी तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेने मदत करावी, ही पाकची इच्छा असून, तीही पूर्ण होत नाही. अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवटीने ‌‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान‌’ला (टीटीपी) वेसण घालावी, ही पाक सरकारची प्रमुख मागणी आहे. 2007 पासून पाकिस्तानमध्ये ‌‘टीटीपी‌’ने घुसखोरी करून धुमाकूळ घातला. या संघटनेस अफगाण तालिबान्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने अफगाण सरकार काहीएक करत नाही, ही पाकची तक्रार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, अफगाण तालिबान्यांना भारताचे समर्थन आहे, असा निराधार आरोप पाकिस्तानने केला आहे. खरे तर, भारत आणि अफगाणिस्तान यांचे संबंध सुधारत असल्यामुळे पाकची पोटदुखी वाढली आहे. पाकिस्तान सरकार उलथवून टाकून तेथे इस्लामी खिलाफत राजवट प्रस्थापित करणे, हे टीटीपीचे उद्दिष्ट आहे. ज्यावेळी भारतात अतिरेकी पाठवून अक्षरधाम मंदिर, संसद तसेच पहलगामसारखे हल्ले घडवून आणले जात होते, तेव्हा पाकिस्तानला त्याची लाजही वाटत नव्हती. गेल्या काही वर्षांत पाकमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरू झाल्यानंतर तेथील सरकारचे डोळे उघडले. वास्तविक, पाच वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात तालिबानी राजवट पुन्हा प्रस्थापित झाली, तेव्हा पाकने तिचे स्वागत केले होते. त्यानंतर ‌‘टीटीपी‌’ने सीमेलगतच्या खैबरपख्तुनख्वा विभागात बॉम्बहल्ले करण्यास सुरुवात केली. गेल्या ऑक्टोबरात याच मुद्द्यावरून दोन्ही देशांत संघर्ष निर्माण झाला, तेव्हा कतार व तुर्कस्तानने दोहा येथे दोघांमध्ये मध्यस्थीसाठी बोलणी सुरू केली; मात्र त्यास कोणतेही यश आले नाही. अमेरिका व आखाती देश इराणविरुद्धच्या युद्धात गुंतले असून, पाकिस्तान-अफगाण संघर्ष मिटवणे, हा त्यांचा प्राधान्यक्रम नाही. या स्थितीचे साधे भानही पाकच्या नेतृत्वाला नाही. जगात आपल्याला कोणतीही किंमत राहिलेली नाही, हे माहीत असूनही पाकिस्तान आगीतून फुफाट्यात चालला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT