Smart Phone | स्मार्टफोनची सद्दी खरंच संपली का? 
संपादकीय

Smart Phone | स्मार्टफोनची सद्दी खरंच संपली का?

पुढारी वृत्तसेवा

तानाजी खोत

गेल्या दोन दशकांत स्मार्टफोनने मानवी जीवन असे काही व्यापून टाकलेय की, तो आता केवळ एक ‘गॅजेट’ न राहता मानवी शरीराचा एक अविभाज्य भाग बनला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 2007 मध्ये सुरू झालेले हे ‘टच स्क्रीन’ क्रांतीचे युग आता एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. सध्या 2026 च्या सुरुवातीला तंत्रज्ञान जगतात एकच चर्चा आहे- स्मार्टफोनचे युग संपले आहे का? आणि जर संपले असेल, तर त्याची जागा कोण घेणार? या वादात जगातले टॉप टेक जायंट समोरासमोर उभे आहेत. यात मार्क झुकेरबर्ग, इलॉन मस्क आणि टिम कूक यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

‘मेटा’चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग हे अलीकडच्या काळात आपली पूर्ण ताकद ‘स्मार्ट चष्म्यां’वर लावत आहेत. त्यांच्या मते, आता मान खाली घालून स्क्रीन बघण्याचे दिवस संपले आहेत. चष्म्याच्या काचेवरच मेसेजेस, नकाशे आणि व्हिडीओ हवेत तरंगताना दिसतील, ज्यामुळे स्मार्टफोन खिशातून बाहेर काढण्याची गरजच उरणार नाही. मेटा कंपनीने असे चष्मे तयार करण्यासही सुरवात केली आहे. त्यांचे काही चष्मे उपलब्धही झाले आहेत.

दुसरीकडे, इलॉन मस्क हे अजून एक पाऊल पुढे जाऊन ‘न्यूरालिंक’ या त्यांच्या महत्वाकांक्षी कंपनीच्या माध्यमातून थेट मानवी मेंदू आणि संगणक यांचा संवाद साधू पाहत आहेत. मस्क यांच्या मते, जर आपण विचारानेच सर्व क्रिया करू शकलो, तर हातात एखादे भौतिक साधन बाळगणे ही कालबाह्य गोष्ट ठरेल; तर एआय तथा कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम अल्टमन हे ‘एआय पिन’ सारख्या उपकरणांच्या मदतीने स्क्रीनलाच हद्दपार करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मात्र, या सर्वांपेक्षा ‘अ‍ॅपल’चे टिम कूक यांचे मत पूर्णपणे वेगळे आणि सर्वसामान्य वापरकर्त्याच्या मानसिकतेच्या जवळ जाणारे आहे. कूक यांचा असा ठाम विश्वास आहे की, स्मार्टफोन कधीच मरणार नाही. उलट, तो आपल्या डिजिटल आयुष्याचा ‘मुख्य केंद्रबिंदू’ राहील. कूक यांच्या मते, स्मार्ट चष्मा किंवा वॉच हे फोनला पर्याय नसून, ती फोनची ताकद वाढवणारी ‘पूरक’ साधने ठरणार आहेत. जसे आपण लॅपटॉप असूनही मोबाईल वापरतो, तसेच चष्मा वापरतानाही बॅकएंडला स्मार्टफोनची प्रक्रिया करण्याची क्षमता लागेलच. बँकिंगमधील सुरक्षितता, अचूक टायपिंग आणि जटिल कामे करण्यासाठी स्मार्टफोन इतका सोयीस्कर आणि खात्रीशीर पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही.

आपल्याला स्मार्ट फोन वापरताना गेल्या 15 ते 20 वर्षांत ‘टॅपिंग’ आणि ‘स्क्रोलिंग’ची जी सवय लागली आहे, ती सहजासहजी सुटणारी नाही. आपण सध्या ‘स्थित्यंतराच्या’ काळात आहोत. स्मार्टफोन लगेच गायब होणार नाही; पण त्याचे स्वरूप नक्कीच बदलेल. तो आता केवळ एक संपर्काचे साधन न राहता, आपल्या अंगावरील इतर ‘स्मार्ट’ उपकरणांना नियंत्रित करणारा रिमोट कंट्रोल बनेल. आपण स्क्रीनच्या गुलामगिरीतून थोडे मुक्त होऊ; पण या काचेच्या आयताकृती तुकड्याचे महत्त्व मात्र अढळ राहील, हे मात्र नक्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT