- सचिन पाटील
इराक सरकारने जगप्रसिद्ध नेव्हिगेशन ॲप ‘वेझ’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या ॲपची निर्मिती मूळतः इस्रायलमध्ये झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे इराकच्या दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या घोषणेनंतर इराकमध्ये डेटा सुरक्षेवरून मोठी चर्चा सुरू झाली. दूरसंचार मंत्री मुस्तफा सनद यांनी ॲप बंदीची घोषणा केली. दूरसंचार मंत्रालय डिसेंबरअखेरपर्यंत ॲप ब्लॉक करण्याची योजना आखत आहे, तर मंत्री मुस्तफा सनद यांनी ही बंदी २०२७ च्या सुरुवातीपासून लागू होईल, असे नमूद केले.
‘वेझ’ हे जगभरातील वाहनचालक आणि टॅक्सी चालकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले नेव्हिगेशन ॲप्लिकेशन आहे. हे ॲप वापरकर्त्यांच्या थेट सहभागावर चालते. रहदारीची कोंडी, रस्ते अपघात, बंद रस्ते आणि पोलिस तपासणी नाके याबद्दल रिअल-टाईम माहिती चालक स्वतः ॲपवर नोंदवतात. २००६-२००८ दरम्यान इस्रायलमध्ये स्थापन झालेल्या या कंपनीला २०१३ मध्ये गूगलने सुमारे १ अब्ज डॉलर्सना विकत घेतले होते. हे ॲप वापरकर्त्यांचे रिअल-टाईम लोकेशन, प्रवासाचे मार्ग, तपशील गोळा करते. लाखो लोकांचा हा डेटा एकत्र केल्यास त्यातून नागरिकांच्या हालचालींचे पॅटर्न, गर्दीच्या वेळा आणि हालचालींमधील संवेदनशील बदल उघड होतात. इराकने इस्रायलला कधीही अधिकृत देश म्हणून मान्यता दिलेली नाही; तांत्रिकदृष्ट्या दोन्ही देश १९४८ पासून युद्धजन्य स्थितीत आहेत. आजअखेर दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध नाहीत. प्रादेशिक तणावाच्या काळात इराकमध्ये इस्रायली घुसखोरीच्या आणि गुप्तचर हालचालींच्या घटना समोर आल्याने अशा ॲप्सद्वारे लोकेशन डेटा शत्रू देशाच्या हाती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराकच्या संसदेने मे २०२२ मध्ये एक अत्यंत कठोर कायदा मंजूर केला, ज्यानुसार इस्रायलशी संबंध सामान्य करणे किंवा कोणत्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करणे हा गंभीर गुन्हा ठरवला आहे. इस्रायलमध्ये स्थापन झालेल्या किंवा तिथल्या कंपन्यांशी जोडलेल्या कोणत्याही ॲप्स आणि उत्पादनांना याच कायद्याच्या चौकटीत पाहिले जाते.
ॲप बंदीच्या घोषणेनंतर इराक सरकार पर्यायी उपाययोजनांवर भर देत आहे. दूरसंचार मंत्रालयाचे प्रवक्ते उमर अल-अमिरी यांच्या मते, वेझच्या जागी लवकरच एका नव्या इराकी स्वदेशी नेव्हिगेशन ॲपची घोषणा केली जाईल. तोपर्यंत वापरकर्ते गूगल मॅप्स किंवा इतर सेवांचा वापर करू शकतात; मात्र तज्ज्ञांच्या मते, केवळ इराकी नकाशा किंवा स्थानिक लोगो लावून उत्तम नेव्हिगेशन सिस्टीम तयार होत नाही. यशस्वी ॲपसाठी अचूक भौगोलिक डेटाबेस, रस्त्यावरील स्थिती बाबत सतत अपडेट करणारी यंत्रणा, अचूक राऊटिंग अल्गोरिदम, आणि रिअल-टाईम ट्रॅफिक, अपघात व रस्ते बंदची अचूक माहिती लागते. वेझ आणि गूगल मॅप्स या दोन्ही सेवांची मूळ मालक कंपनी अल्फाबेट हीच आहे. त्यामुळे जर वेझवर इस्रायली निर्मितीमुळे बंदी येत असेल, तर गूगल मॅप्सला पर्याय म्हणून कसे सुचवले जाऊ शकते? केवळ एका ॲपवर बंदी घातल्याने नागरिकांचा लोकेशन डेटा सुरक्षित राहू शकत नाही. इतर डझनावर ॲप्सदेखील वापरकर्त्यांचा तसाच संवेदनशील डेटा गोळा करतात. इराकचा ‘वेझ’ ॲपवरील बंदीचा निर्णय हा केवळ एका मोबाईल ॲप्लिकेशनपुरता मर्यादित नसून तो डेटा सुरक्षेशी जोडलेला आहे. इस्रायलशी असलेल्या शत्रुत्वामुळे उचललेले हे पाऊल इराकला राष्ट्रीय पातळीवर योग्य वाटत असले, तरी जोपर्यंत इराक एक सक्षम तांत्रिक सुविधा निर्माण करत नाही, तोपर्यंत त्यांना वाटणारी डिजिटल सुरक्षेची भीती संपणार नाही.