Iran Protests news | इराणमधील उठाव (Pudhari File Photo)
संपादकीय

Iran Protests news | इराणमधील उठाव

पुढारी वृत्तसेवा

महागाई, बेरोजगारी आणि चलनातील घसरण याविरोधात इराणमध्ये जोरदार आंदोलन सुरू झाले आहे. देशाच्या 20 प्रांतांमध्ये बंडाची आग पसरली असून, 110 पेक्षा अधिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. या भडक्यात आतापर्यंत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, लोकांनी धार्मिक नेतृत्वाविरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरून आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. वास्तविक इराणमध्ये नाक खुपसण्याचे अमेरिकेस काही एक कारण नाही. आधीच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो व त्यांच्या पत्नीस मुसक्या बांधून वॉशिंग्टनला नेण्यात आले.

मेक्सिको, निकाराग्वासारख्या देशांनाही अमेरिकेने ड्रग्जविरोधी कारवाया न केल्यास, थेट कृती करण्याची धमकी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संकेत अमेरिका पाळत नाही, हे स्पष्ट आहे. अर्थात गेली अनेक दशके अमेरिकेच्या ‘सीआयए’ने विविध देशांतील सरकारे उलथवली. इराणमधील आंदोलकांशी चर्चेची तयारी आहे, मात्र दंगलखोरांशी नाही, असे उद्गार इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी काढले आहेत; तर इराणवर हल्ला केल्यास अमेरिकी लष्कर आणि इस्रायलला इराण लक्ष्य करेल, असा थेट इशारा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद गालिबाफ यांनी तर ट्रम्प यांच्या धमकीनंतर दिला आहे. आम्ही आंदोलकांवर कठोर कारवाई करू शकतो, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असे गालिबाफ यांनी बजावले आहे. याचा अर्थ, इराण ‘अरे’ला ‘कारे’ करण्याच्या पवित्र्यात दिसतो.

आर्थिक संकटामुळे व्यापारी व व्यावसायिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशात पसरले असून, त्यामध्ये लाखो नागरिकही सहभागी झाले आहेत. इंटरनेट सेवा संथ करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा बंद करण्यात आली. मात्र आंदोलन थांबायला तयार नाही. ट्रम्प यांनी तर इराणवर हल्ला करण्याची धमकीही दिल्याने तणाव वाढला आहे. विशेष म्हणजे, इराणमधील सामान्य जनतेच्या ‘अभूतपूर्व शौर्या’बद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रशंसा केली आहे. इस्रायल हा इराणचा मुख्य शत्रू असून, हमास, हेजबुल्ला, त्याचप्रमाणे येमेनमधील हुथी बंडखोरांना इराणची मदत असते. त्यामुळे इस्रायल विरुद्ध इराण, हा संघर्ष अनेक दशके सुरू आहे. इराणविरोधी कारवायांत अमेरिकेची इस्रायलला साथ असते. आम्ही इराणमधील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत, असे नेतान्याहू यांनी म्हटले असून, त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. अमेरिका अथवा इराणने मर्यादित हल्ला केल्यास इराण त्याला प्रत्युत्तर देईल आणि त्याचा लाभ उठवून इस्रायल हा इराणवर अमर्यादित हल्ला चढवू शकेल. एकूण इराणची राजवट उलथवण्याचा कट शिजला असावा, असे चित्र दिसते.

एकेकाळी इराणमध्ये शहा यांची राजवट होती. रशियाविरोधी तळ म्हणून शहा यांना अमेरिकेने लष्करी मदत केली. अमेरिका व पाश्चात्त्य राष्ट्रे तेव्हा इराणच्या तेलावर बरीच अवलंबून होती. इराणचे शहा मोहम्मद रझा पहलवी यांच्या विरोधात ज्यावेळी 1978-79 मध्ये इराणी क्रांती झाली, त्यावेळी अली खामेनी यांनाही सहा वेळा अटक झाली होती. रूहल्ला खोमेनी यांनी ही क्रांती घडवून आणली होती आणि त्यानंतर खोमेनी यांनी इराणमधील इस्लामी राजवटीत आपले पट्टशिष्य अली खामेनी यांना अनेक पदे दिली. खामेनी यांचा खून करण्याचा एकदा प्रयत्न झाला होता. इराण-इराक युद्धाच्या वेळी म्हणजेच 1981 ते 1989 या काळात अली खोमेनी (जे आज सर्वोच्च धार्मिक नेते आहेत) हे इराणचे अध्यक्ष होते. त्याचवेळी त्यांनी ‘इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअर’शी जवळचे संबंध प्रस्थापित केले. खोमेनी यांचे 1989 मध्ये निधन झाल्यानंतर इराणच्या विद्वत् सभेने म्हणजेच ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्टस्’ने खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड केली. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय निर्बंध असतानादेखील खामेनी यांनी युवा वर्गाला शिक्षण आणि वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देणे तसेच देशाच्या वैज्ञानिक प्रगतीवर भर देण्याचे काम केले. त्यांनीच इराणच्या नागरी वापरासाठीच्या अणुकार्यक्रमावर भर दिला आणि अणुशक्तीचा विध्वंसक वापर करण्यावर बंदी आणली.

खामेनी यांनी इराणमध्ये खासगीकरण आणले आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रात परिवर्तन आणून इराणला ‘एनर्जी सुपरपॉवर’ बनवले. मात्र त्याचवेळी त्यांचे परराष्ट्र धोरण शियापंथीय इस्लामवाद आणि इराणी क्रांतीचा आशय सर्वत्र पसरवणे याच सूत्रानुसार राहिले. त्यामुळे इराणने ‘अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स कोयलेशन’ला इराक युद्धात पाठिंबा दिला. तसेच सीरिया आणि येमेनमधील युद्धात त्यांनी इराणला उतरवले. खामेनी हे इस्रायलचे कडवे टीकाकार. त्यामुळे त्यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला. मात्र 2009 मध्ये खामेनींच्या अध्यक्षीय पदावरील निवडीनंतर देशभर निदर्शने झाली. नंतरच्या काळात देशात राष्ट्रव्यापी संप झाला आणि हिजाबवरून स्त्रीविरोधी मध्ययुगीन प्रथांचे समर्थन केल्याबद्दल महिलांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.

खामेनी हे अमेरिकी साम्राज्यवादाच्या विरोधात आहेत. त्यांना पाश्चात्त्य वर्चस्ववाद मान्य नाही. मात्र त्याचवेळी दडपशाही, विरोधकांच्या हत्या आणि एकाधिकारशाहीबद्दल ते कुप्रसिद्ध आहेत. इराणमधून देशांतर केलेल्या 160 व्यक्तींचे जगात ठिकठिकाणी जाऊन खामेनी यांनी खून घडवून आणले आहेत. ‘पीपल्स मुजाहिदीन ऑफ इराण’च्या हजारो सदस्यांचे त्यांनी शिरकाण घडवले. अनेक लेखक व विचारवंतांचा त्यांनी ‘बंदोबस्त’ केला. तरीदेखील खामेनी यांची राजवट बदलण्याचा अधिकार हा तेथील जनतेलाच आहे, इस्रायल वा अमेरिकेला नाही. आता इराणच्या शहांचे चिरंजीव रझा पहलवी यांनी, लोकांना सत्तांतर हवे आहे, असे म्हटले आहे. 1979 पासून रझा पहलवी हे इराणबाहेरच वास्तव्यास असून, इराणमध्ये सत्तांतर झाल्यास तेथे पुन्हा अधिराज्य गाजवण्याची त्यांची इच्छा असू शकते. मात्र केवळ अमेरिकेचे प्यादे म्हणून ते बसल्यास हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही. दोन विविध पातळ्यांवर संघर्ष सुरू असताना इराणची स्थानिक जनताच परिवर्तन घडवून आणते की, हा देश पुन्हा कट्टरपंथीयांच्या हाती जातो, हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT