ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून इस्रायलवर अत्यंत नृशंस हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने अणू कार्यक्रमाचे नेहमीचे निमित्त करत इराणविरोधात संयुक्त कारवाई सुरू केली. यामध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला अली खामेनी यांची हत्या करण्यात आली. इराणमधील खामेनींची राजवट उलथवून टाकत तेथे आपल्या तालावर नाचणाऱ्या नेतृत्वाला विराजमान करायचे आणि व्हेनेझुएलाप्रमाणे हा देश खिशात टाकायचा, अशा आविर्भावाने अमेरिका आणि इस्रायल मैदानात उतरले होते. खामेनींच्या हत्येने त्यांचा एक उद्देश सफल झाला; पण मुख्य डाव फसला. खामेनींच्या एकाधिकारशाहीवादी राजवटीला कंटाळलेल्या इराणी जनतेकडून जोरदार निदर्शने, मोर्चे, आंदोलने सुरू होती; पण अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात ते मारले गेल्यानंतर संपूर्ण इराण एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणे अंतर्गत मतभेद बाजूला सारत पाश्चिमात्य दडपशाहीचा बिमोड करण्यासाठी एकवटला. इराणने अमेरिका आणि इस्रायल यांना सातवे अस्मान दाखवले.
इन्फर्मेशनल वॉरफेअरचा कौशल्याने वापर करत अमेरिकेला वेळोवेळी तोंडघशी पाडले. खामेनींच्या अंत्यविधीच्या निमित्ताने इराण माहितीयुद्धातील पुढची पावले टाकत आहे. इस्लाममध्ये मृत्यूनंतर २४ तासांत अंत्यविधी पार पडतो; मात्र खामेनी यांचे पार्थिव ४ महिने सुरक्षित ठेवले गेले. प्रशासनाने खामेनी यांच्या अंत्यसंस्कार सोहळ्याची घोषणा केली आणि जगभरातील देशांच्या प्रमुखांना व इस्लामिक बांधवांंना आमंत्रण दिले. इराणमधील एकूण ९ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी सुमारे २० ते २५ टक्के लोक इस्लामिक क्रांतीच्या विचारांशी आणि व्यवस्थेशी एकनिष्ठ आहेत. ही २५ टक्के संख्याही खूप मोठी ठरते आणि त्यामुळेच या अंत्यविधीला रस्त्यांवर प्रचंड गर्दी दिसून येत आहे. सामूहिक अंत्यसंस्काराला इस्लाममध्ये ’फर्ज-ए-किफाया’ म्हणजेच सामूहिक धार्मिक कर्तव्य मानले जाते. जितकी जास्त लोकांची उपस्थिती असेल, तितकी मृतात्म्याला अल्लाहकडून क्षमा मिळण्याची शक्यता जास्त असते, अशी श्रद्धा आहे. मोठ्या धार्मिक नेत्याचे निधन होते, तेव्हा लाखो भाविक आदरांजलीबरोबरच धार्मिक कर्तव्य आणि पुण्य कमावण्याचा मार्ग म्हणून या सोहळ्यात सामील होतात. या प्रचंड गर्दीतून मुस्लीम समाजाची 'उम्मा' अर्थात सामूहिक एकता जगासमोर प्रकट होते. खामेनी कणखर बाण्याचे होते. विरोधक किंवा सुधारणावाद्यांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही.
इस्रायल, अमेरिकेसह पश्चिमी जगाच्या दबावाला झुगारताना वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तोच कणखर बाणा त्यांच्या मृत्यूपश्चात कायम ठेवत इराणी लष्कर अमेरिकेशी लढले. इराणच्या अंदाजानुसार या अंत्ययात्रेला पाच कोटी लोक उपस्थित राहतील. या माध्यमातून देशांतर्गत ऐक्य टिकवून ठेवण्याबरोबरच अरब जगतामध्ये राजकीय व धार्मिक प्रभाव अधिक घट्ट करण्याचा इराण प्रयत्न करत आहे. खामेनी यांच्या पार्थिवाचा प्रवास तेहरानच्या दक्षिणेकडील पवित्र कोम शहरापासून सुरू होऊन इराकमधील नजफ आणि कर्बला या शिया पंथियांच्या पवित्र स्थळांवरून जाणार आहे. अंतिम संस्कारापूर्वी मशहद येथील इमाम रझा यांच्या दर्ग्यात पार्थिव आणले जाईल. गेल्या पाच दशकांत सीमापार शिया विचारसरणीचा प्रसार करण्याच्या इराणच्या धोरणाचेच हे प्रतीक आहे. हा सोहळा प्रतिशोधाचा आहे. यामध्ये वापरलेली भाषा, दिल्या जाणाऱ्या घोषणा, निवडलेले मार्ग आणि धार्मिक प्रतीकांचा केलेला वापर यातून इराणच्या भविष्यातील धोरणांची दिशा स्पष्ट होते.
खामेनी यांचे पार्थिव इराण आणि इराकमधील विविध शहरांमधून फिरवताना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करून एक विशिष्ट राजकीय मांडणी केली जात आहे. खामेनींचा मृत्यू हा शहादत असून जनतेने या दुःखात सहभागी होणे हे त्यांचे राष्ट्रीय दायित्व आहे, असा संदेश सातत्याने दिला जात आहे. 'आपल्याला उभे राहिलेच पाहिजे' यांसारखी कुराणावर आधारित वाक्ये वापरून संपूर्ण मु मुस्लीम समाजाला एका दैवी उद्दिष्टासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. यातील खामेनी यांच्या उगारलेल्या घट्ट मुठीचे चित्र इराणच्या भविष्यातील भूमिकांची चुणूक दाखवणारे आहे.
लाल आणि काळ्या पार्श्वभूमीवर दाखवलेल्या या घट्ट मुठीला एक अर्थ आहे. एका प्राणघातक हल्ल्यात खामेनी यांचा उजवा हात निकामी झाला होता; पण मृत्यूनंतर त्यांच्या निरोगी हाताची मूठ घट्ट आवळलेली होती, असा दावा मोजतबा करताहेत. शत्रूसमोर कधीही न झुकण्याच्या आणि शेवटपर्यंत संघर्ष करण्याच्या इराणच्या वृत्तीचे दृश्य रूप म्हणून याकडे पाहिले जात आहे. सुरक्षा आणि संभाव्य हल्ल्यांच्या भीतीने मोजतबा या ऐतिहासिक सोहळ्यापासून दूर राहिले; पण या मुठीच्या प्रतीकाद्वारे त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. ग्रँड मोसल्लावर फडकवलेला प्रचंड मोठा लाल ध्वज आणि त्यावर अरबी भाषेत लिहिलेला संदेश भविष्यातही इराण अमेरिकेच्या दादागिरीपुढे कदापि झुकणार नाही आणि खामेनींची शहादत व्यर्थ जाऊ देणार नाही, हे जगाला सांगणारा आहे. इराणच्या प्रशासनाने या मृत्यूला थेट १३०० वर्षांपूर्वी झालेल्या कर्बलाच्या युद्धाशी जोडले आहे. या युद्धात प्रेषित मोहम्मद यांचे नातू इमाम हुसेन यांची क्रूर हत्या झाली होती. शिया संप्रदायात कर्बलाची घटना ही अन्याय आणि दडपशाहीविरुद्धच्या संघर्षाचे सर्वोच्च प्रतीक मानली जाते. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलकडून खामेनी यांच्या हत्येचा सूड घेणे हे धार्मिक कर्तव्य बनले आहे, असे इराणने स्पष्ट केले आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने तेहरानमध्ये लेबनॉनमधील हिजबुल्लाह, पॅलेस्टाईनमधील हमास या इराण पुरस्कृत सशस्त्र संघटनांच्या म्हणजेच ’रेझिस्टन्स ॲक्सिस’च्या नेत्यांची झालेली गर्दी इस्रायलसह अरब जगताला स्पष्ट इशारा देणारी आहे. जनतेच्या भावनांना धार्मिक प्रक्षोभाशी जोडून, स्वतःच्या सत्तेला ऐतिहासिक आणि दैवी अधिष्ठान देणे हा इराणच्या राज्यकर्त्यांचा प्रयत्न या राष्ट्राला अधिक कट्टर बनवणारा आहे. अंत्यविधी सोहळा संपला, तरी यातून निर्माण झालेली सुडाची भावना आणि धार्मिक कट्टरतेचे राजकारण मध्य पूर्वेला नव्या संघर्षात लोटू शकते. इराणची इस्लामिक राजवट कोलमडलेली नाही, तर ती अजूनही कणखर आणि शक्तिशाली आहे, हे तेथील प्रशासनाला आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवून द्यायचे आहे. या शोककाळात अमेरिका आणि इराण चर्चा तात्पुरती स्थगित आहे. युद्धांमधून आणि अंतर्गत संकटांमधून तावूनसुलाखून निघाल्याने इराणचा आत्मविश्वास वाढला आहे. महासत्तेवर मिळवलेल्या विजयानंतर इराण अधिक आक्रमक बनत जगाची नव्याने कोंडी करणार की खामेनींच्या काळात रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने नेणार, हे पाहायचे!