डॉ. दीपक शिकारपूर
दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ युवकांचा गौरव करण्यासाठी नाही, तर त्यांच्या आकांक्षा, संघर्ष, संधी आणि भविष्याचा विचार करण्यासाठी आहे.
आजची युवा पिढी अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. तिच्या हातात ज्ञानाची अमर्याद साधने आहेत. जगभरातील माहिती क्षणात उपलब्ध होत आहे; मात्र माहितीचा महासागर असूनही योग्य दिशा, योग्य कौशल्ये आणि योग्य निर्णय यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे आजच्या युवकांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे बदलत्या काळाशी जुळवून घेत स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणे. आजचा रोजगार बाजार झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक नोकऱ्या कमी होत आहेत, नव्या संधी निर्माण होत आहेत. केवळ पदवी मिळविणे पुरेसे राहिलेले नाही. उद्योगजगताला काम करणारे हात नकोत, तर विचार करणारे, समस्या सोडविणारे आणि नवनिर्मिती करणारे युवक हवेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन आणि संघभावना यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढील पिढीसमोर एआय हे सर्वात मोठे आव्हान नसून सर्वात मोठी संधी आहे. पुनरावृत्तीची कामे यंत्रे करू लागली असली, तरी सर्जनशीलता, नेतृत्व, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आणि निर्णयक्षमता यांची गरज अधिक वाढत आहे. त्यामुळे नोकरीची सुरक्षितता पदवीवर नाही, तर सातत्याने नवीन कौशल्ये शिकण्यावर अवलंबून असेल. करिअर सुरक्षित ठेवण्यासाठी युवकांनी बदल स्वीकारणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रतिस्पर्धी नव्हे, तर सहकारी म्हणून वापरणे शिकले पाहिजे. आपल्या क्षेत्रातील आधुनिक साधनांचा प्रभावी उपयोग करणारे कर्मचारी अधिक मागणीत राहतील. त्याचबरोबर परकीय भाषांचे ज्ञान, विशेषतः जपानीसारख्या भाषांचे अध्ययन, जागतिक रोजगाराच्या संधी वाढवू शकते. प्रत्यक्ष कामाचा अनुभव, उद्योगांशी संपर्क, नवउद्योगांची मानसिकता आणि सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवण्याची सवय ही यशाची गुरुकिल्ली ठरेल.
उद्याचा रोजगार केवळ प्रमाणपत्रांवर मिळणार नाही, तर कौशल्य, नवकल्पना आणि शिकण्याची तयारी यांवर मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या संपवत नाही, तर करिअरची नवी दारे उघडते. जे युवक बदलाशी जुळवून घेतील, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करतील आणि मानवी मूल्यांसह काम करतील, तेच भविष्यातील जागतिक स्पर्धेत आघाडीवर राहतील.
उद्योजकता हे आजच्या युवकांसाठी आणखी एक मोठे क्षेत्र आहे. पूर्वी नोकरी मिळविणे हेच यशाचे मापदंड मानले जात होते. आज स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देणारे युवक समाजात नवा आदर्श निर्माण करीत आहेत. एखादी समस्या ओळखून तिचे नवे समाधान शोधणे, त्यातून सेवा किंवा उत्पादन निर्माण करणे आणि त्याचे व्यवसायात रूपांतर करणे हीच उद्योजकतेची खरी ताकद आहे. शासनाच्या विविध योजना, गुंतवणूकदारांची साथ आणि नव्या तंत्रज्ञानामुळे उद्योग सुरू करणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे; मात्र यासाठी चिकाटी, संयम, नियोजन आणि सातत्य या गुणांची जोड आवश्यक आहे. भविष्यातील रोजगाराचा पाया कौशल्यांवर उभा राहणार आहे. पुस्तकातील ज्ञान महत्त्वाचे आहेच; परंतु त्याचा प्रत्यक्ष वापर करता येणे अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आज उद्योगांना समस्या समजून घेणारे, नवीन कल्पना मांडणारे, जलद शिकणारे आणि बदल स्वीकारणारे युवक हवे आहेत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शिक्षणासोबत एखादे व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. परकीय भाषांचे ज्ञान ही आजच्या काळातील मोठी ताकद ठरत आहे. जगातील अनेक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. अशावेळी त्या देशांची भाषा अवगत असल्यास रोजगाराच्या संधी अनेकपटीने वाढतात. जपानने भारतीय युवकांसाठी आपले दरवाजे मोठ्या प्रमाणावर खुले केले आहेत. मात्र त्यासाठी जपानी भाषा, शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि गुणवत्तेबद्दलची बांधिलकी आत्मसात करावी लागेल. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती आणि विश्वास यांच्यामधील पूल असते.
जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात आपली संशोधन केंद्रे, विकास केंद्रे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. येथे केवळ दैनंदिन कामे होत नाहीत, तर नव्या कल्पनांवर संशोधन, अत्याधुनिक उत्पादनांची निर्मिती आणि जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेतही भारतीय युवक सहभागी होत आहेत. त्यामुळे आता परदेशात जाणे हाच यशाचा एकमेव मार्ग राहिलेला नाही. योग्य कौशल्ये, भाषा आणि प्रामाणिक मेहनत असेल, तर भारतात राहूनही जागतिक स्तरावर काम करता येते. आजचा सजग, सक्षम आणि आत्मविश्वासी युवकच उद्याच्या विकसित भारताचा खरा शिल्पकार ठरणार आहे.