गेल्या 14 महिन्यांपासून सुरू असलेल्या गाझापट्टीतील युद्धात पराजित व जेते दोघेही हतबल झाले आहेत. युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत ते बिकट होतात हे युद्ध जेव्हा टोकाला पोहोचते तेव्हा लक्षात येते आणि मग शांततेची सद्बुद्धी सुचते. हमास-इस्रायलमधील हा युद्धविराम म्हणजे एक नवी शांततेची नांदी असणार आहे. आखातातील इस्रायलने केलेला घणाघात त्यांच्या आत्मसंरक्षणाचा एक भाग होता. आता इस्रायलने आपली अस्मिता सिद्ध केली आहे आणि हमासला नमवले आहे.
गेल्या 14 महिन्यांपासून गाझापट्टीतील गलबला अखेर शांत होण्याच्या मार्गावर आला आहे. लढणारे आणि लढवणारे दोघेही किती काळ लढणार? शेवटी युद्धामध्ये जीत आणि जेते दोघेही हतबल होतात. तेव्हा त्यांना शांततेशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. शिवाय अमेरिकेत युद्धखोर बायडेन युगाचा अस्त होऊन दणकट ट्रम्प सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही भागात आता युद्धाऐवजी शांततेचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचीच प्रचिती इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान कतार येथे चालू असलेल्या द्विपक्षीय शांतता बोलणीतून येत आहे. शांततेची ही बोलणी अंतिम आणि निर्णायक टप्प्यात आहेत, अशी चिन्हे दिसत आहेत. अखेर गतिरोध संपत आला आहे आणि युद्धविराम होऊन जीव मुठीत धरून दोन्ही बाजूंनी अडकून पडलेल्या ओलिसांची अखेर सुटका होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. या युद्धविरामाची शक्यता आणि त्याच्या संभाव्य परिणामांची चर्चा प्रस्तुत लेखामध्ये केली आहे.
त्रिपक्षीय वाटाघाटी निर्णायक व अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीचा झालेला हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनीही हा करार आता द़ृष्टिपथात आला आहे आणि संघर्षाचा विराम होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे सांगून सकारात्मक मत नोंदविले आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्तमधील बोलणी आता निर्णायक अवस्थेकडे पोहोचत आहेत. दोहा येथे चाललेल्या या शिष्टाईचे महत्त्व अनेक द़ृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहे. ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यापुढे इस्रायलला लष्करी मदतीचा सढळ हात कितपत सुरू राहील याचीही शंका आहे. शिवाय इस्रायलमध्ये आघाडी सरकार निवडणूक पूर्व काळात तडजोडींच्या आधारे टिकले आहे. तेथील अतिउजव्या पक्षांना अजून निर्णायक विजय मिळवावा, असे वाटते तर सत्ताधारी आघाडीतील काही पक्षांना आता थांबले पाहिजे. यापुढे अधिक युद्धात भाग घेणे म्हणजे आर्थिक दिवाळखोरी ठरेल, असे वाटू लागले आहे
इस्रायल आणि हमास यांच्यामधील संघर्ष 14 महिने चालला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने सीमा ओलांडून इस्रायलमध्ये अभूतपूर्व गोंधळ घातला. अत्याचाराची परिसीमा गाठली. अनेक महिलांना व मुलांना ओलीस ठेवले. त्याची जबर शिक्षा आणि चोख प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझापट्टीत खोलवर हल्ले केले. पॅलेस्टिनी लोकांना निर्वासित म्हणून पळ काढावा लागला. हमासची पळताभुई झाली आणि त्याच्या समर्थक राष्ट्रांचेही नुकसान झाले. सीरियामध्ये असद यांना रशियात पळ काढावा लागला. तिकडेही अमेरिकेची सरशी झाली. हिजबुल्लाने मागेच नांग्या टाकल्या आणि इस्रायलबरोबर युद्धबंदी केली. आता हमासमध्ये खोलवर घुसत असलेल्या इस्रायलसोबत यापुढे दोन हात करण्यापेक्षा तूर्त युद्धबंदी करणेच शहाणपणाचे ठरेल, असे हमासने मनावर घेतलेले दिसते.
नियोजित युद्धबंदी किंवा शांतता करार हा तीन टप्प्यांनी अमलात येणार आहे, असे सध्याच्या बोलणीक्रमावरून दिसून येत आहे. पहिल्या 45 दिवसांत इस्रायलने गाझामधील ओलीस ठेवलेले सैनिक आणि महिला यांच्या सुटकेचा प्रयत्न त्यांना अपेक्षित आहे. शहर, केंद्रे, किनारपट्टीचा भाग आणि सीमालगतची पट्टी या सर्व भागातून टप्प्याटप्प्याने इस्रायल आपले सैन्य मागे घेण्याची योजना आहे. गाझामधील विस्थापितांना परत उत्तरेकडे येण्यासाठी एक योजनाही आखली आहे. या कराराच्या दुसर्या टप्प्यात ओलिसांची सुटका होईल आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिक निःश्वास टाकतील. तिसर्या टप्प्यात युद्ध संपण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी सैन्याची माघार घेतली जाईल. अशाप्रकारे या तीन टप्प्यातून या युद्धबंदीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मध्यरात्री केलेल्या हल्ल्यानंतर पकडलेले 96 ओलीस गाझाच्या ताब्यात होते. त्यापैकी 62 ओलीस अद्यापही जिवंत आहेत, असा इस्रायलचा ग्रह आहे.
जे काही जिवंत ओलीस आहेत त्यांची सुटका ताबडतोब व्हावी, असा इस्रायली जनतेचा आग्रह व दबाव आहे. त्यासाठी इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनेही झाली. नेतान्याहू युद्ध लांबवित आहेत, त्यामुळे पकडण्यात आलेल्या ओलिसांचा जीव धोक्यात येतो. आता सरकारने युद्धाचे नाटक फार काळ चालवू नये, ओलिसांची सुटका करावी म्हणजे लोकांचा जीव भांड्यात पडेल, असे लोकांना वाटते. आखातातील इस्रायलने केलेला घणाघात त्यांच्या आत्मसंरक्षणाचा एक भाग होता. आता इस्रायलने आपली अस्मिता सिद्ध केली आहे आणि हमासला नमवले आहे. परंतु युद्ध दीर्घकाळ सुरू राहिले तर मानवी विनाश अटळ आहे. तेव्हा मानवतावादी द़ृष्टिकोन ठेवून दोन्ही बाजूंनी युद्ध व संघर्ष टाळले पाहिजेत आणि शांततेने जीवन जगण्याचा मार्ग अनुसरला पाहिजे. तोच खरा दोन्हीही धर्माचा अर्थ आहे. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दणका दिला आहे आणि दोन्ही बाजूंना असे धमकावले आहे की आता युद्ध थांबवा. मी पदभार स्वीकारण्यापूर्वी युद्धविराम झालाच पाहिजे.