Digital Education 
संपादकीय

नव्या युगाची नवी पाटी

नव्या पिढीसाठी डिजिटल दालने खुली

पुढारी वृत्तसेवा

डॉ. दीपक शिकारपूर

19 मार्च हा ‌‘डिजिटल शिक्षण दिवस‌’ आपल्याला याची जाणीव करून देतो की, आपण एका मोठ्या बदलाचा भाग आहोत.

शिक्षण म्हणजे मानवाचा सर्वांगीण विकास. पूर्वी शिक्षणाची व्याख्या ही शाळा, फळा, खडू आणि पुस्तकांपुरती मर्यादित होती. आज ज्ञान केवळ वर्गाच्या चार भिंतीत अडकलेले नाही, तर ते एका ‌‘क्लिक‌’वर उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर, 19 मार्च हा दिवस ‌‘डिजिटल शिक्षण दिवस‌’ म्हणून साजरा करणे केवळ औपचारिक नसून ते काळाचे प्रतीक आहे. 19 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय डिजिटल शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस युनेस्कोने 2023 मध्ये अधिकृतपणे घोषित केला आणि 2024 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे.

डिजिटल शिक्षणामुळे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांचे कोर्सेस आता खेड्यापाड्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार आणि गतीनुसार शिकू शकतात. एखादा विषय समजला नाही, तर तो व्हिडीओ पुन्हा पाहण्याची सोय यात असते. व्हिडीओ किंवा ॲनिमेशनद्वारे पाहिल्यावर अधिक काळ लक्षात राहते. विज्ञानातील प्रयोग किंवा इतिहासातील घटना डिजिटल माध्यमातून जिवंत होतात.

डिजिटल शिक्षणाने शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे. गुगल, एआय चॅटबॉटस्‌‍ आणि विविध शैक्षणिक ॲप्समुळे संदर्भ शोधणे आता सेकंदांचे काम झाले आहे. कौशल्य विकास पदवीसोबतच नवीन सॉफ्टवेअर्स, कोडिंग, ग््रााफिक डिझाईन किंवा परदेशी भाषा शिकणे डिजिटल माध्यमामुळे सोपे झाले आहे. कागदविरहित शिक्षण ई-बुक्स आणि डिजिटल नोटस्‌‍मुळे झाडांची कत्तल थांबण्यास मदत होत आहे. विद्यार्थी स्वतःहून शोध घेण्यास आणि प्रश्न विचारण्यास प्रवृत्त होतात. अनेकदा ऑनलाईन कोर्सेस हे प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणापेक्षा स्वस्त असतात. प्रवास आणि निवासाचा खर्चही वाचतो.

तासन्‌‍ तास लॅपटॉप किंवा मोबाईलसमोर बसल्याने डोळ्यांचे विकार, पाठदुखी आणि मानसिक थकवा येऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाच्या दरम्यान बेक घेणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षेचे नियम पाळावेत. केवळ डिजिटल जगात न रमता प्रत्यक्ष सामाजिक संवाद आणि मैदानी खेळ खेळणे आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी गरजेचे आहे. शिक्षणासाठी घेतलेला मोबाईल कधी सोशल मीडिया आणि गेमिंगच्या व्यसनाकडे नेतो, हे कळत नाही. त्यामुळे स्वतःवर ताबा असणे महत्त्वाचे आहे. डिजिटल शिक्षणाचा पाया ‌‘वीज‌’ हा आहे. आजही भारतातील अनेक खेड्यांत अनेक तास वीज नसते. त्यामुळे ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच बंद पडणे किंवा तांत्रिक अडचणी येतात. डोंगराळ आणि ग््राामीण भागात साधी ‌‘2जी‌’ची रेंज मिळणेही कठीण आहे. ‌‘बफरिंग‌’ आणि ‌‘नेटवर्क एरर‌’मुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. एका बाजूला श्रीमंत मुलांकडे स्वतःचे लॅपटॉप आणि हायस्पीड बॉडबँड आहे, तर दुसरीकडे संपूर्ण घरासाठी एकच साधा स्मार्ट फोन असलेली कुटुंबे आहेत. ही आर्थिक दरी समाजाला ‌‘डिजिटल सधन‌’ आणि ‌‘डिजिटल वंचित‌’ अशा दोन गटांत विभाजत आहे.

अनेकदा प्रश्न विचारला जातो की, जर सर्व काही इंटरनेटवर उपलब्ध आहे, तर शिक्षकांची गरज काय? याचे उत्तर असे आहे की, तंत्रज्ञान हे केवळ ‌‘साधन‌’ आहे; पण ‌‘शिक्षक‌’ हा त्या साधनाची दिशा ठरवणारा शिल्पकार आहे. एआय किंवा गुगल माहिती देऊ शकते; पण ती माहिती कशी वापरावी आणि योग्य-अयोग्य यातील फरक काय, हे फक्त शिक्षकच सांगू शकतात. शिक्षण ही केवळ तांत्रिक प्रक्रिया नाही, ती भावनिक प्रक्रिया आहे. 2026 च्या काळात शिक्षक हे ‌‘फॅसिलिटेटर‌’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करणे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे हे कार्य शिक्षकच पार पाडतात. डिजिटल शिक्षण ही केवळ काळाची गरज नसून ते भविष्यातील प्रगतीचे साधन आहे. भविष्यात ‌‘हायबीड‌’ (पारंपरिक + डिजिटल) शिक्षण पद्धती हीच यशाची गुरुकिल्ली ठरेल. ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वेग आणि शिक्षकांच्या संस्कारांची जोड असेल.

(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT