Semiconductor Industry | सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप! Pudhari File Photo
संपादकीय

Semiconductor Industry | सेमीकंडक्टर क्रांतीत भारताची छाप!

पुढारी वृत्तसेवा

शहाजी शिंदे, संगणकप्रणाली तज्ज्ञ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच ‘विक्रम-32’ ही देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप प्रदान केली. हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या विश्वातील आकांक्षांच्या इतिहासातील निर्णायक टप्पा आहे. आतापर्यंत भारताचे योगदान डिझाईन आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात जागतिक दर्जाचे असले, तरी प्रत्यक्ष उत्पादनात तो मागे राहिला होता. पण, आता सेमीकंडक्टर निर्मितीच्या स्पर्धेत भारताने अग्रणी स्थान मिळविण्याची दिशा निश्चित केली आहे.

आजचे जग एका प्रचंड तांत्रिक क्रांतीच्या टप्प्यावरून जात आहे आणि या क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे सेमीकंडक्टर. ही छोटीशी चिप आधुनिक जीवनातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला नियंत्रित करत आहे. स्मार्ट फोन असो वा संगणक, मोटारगाडी असो वा रॉकेट, आरोग्य उपकरणे असोत वा कृत्रिम बुद्धिमत्तेची जटिल रचना... या सर्वांमध्ये सेमीकंडक्टरच खरे इंजिन म्हणून कार्य करत आहे. भारताने ज्या वेगाने सेमीकंडक्टर निर्मिती व संशोधनाच्या दिशेने पावले टाकली आहेत, ती येत्या काळात केवळ आत्मनिर्भरतेचा आधार ठरणार नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेत भारताची निर्णायक भूमिका निश्चित करतील. आज देशात 65 कोटींपेक्षा अधिक स्मार्ट फोन वापरकर्ते आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीचा बाजार वार्षिक 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अशा स्थितीत भारताने आता आपली तांत्रिक मागणी देशांतर्गत उत्पादनातून पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हे स्वाभाविक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या द़ृष्टिकोनामुळे व सरकारच्या त्वरित धोरणात्मक उपक्रमांमुळे सेमीकंडक्टर मिशनला ठोस आकार मिळू लागला आहे.

सरकारने ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’अंतर्गत आतापर्यंत 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापैकी अनेक युनिटस्मध्ये बांधकाम वेगाने सुरू आहे. गुजरातमधील साणंद येथे पायलट उत्पादन लाईन सुरू झाली आहे आणि याच वर्षात पहिली ‘मेड इन इंडिया’ चिप बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हा क्षण भारताच्या तांत्रिक इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे सेमीकंडक्टरला केवळ एक तांत्रिक वस्तू म्हणून न पाहता या शतकातील स्टील, वीज आणि रसायन यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांच्या घटकांपैकी एक म्हणून मान्यता मिळू लागली आहे. चिपशिवाय आधुनिक उद्योग व सेवा अस्तित्वातच राहू शकत नाहीत. म्हणूनच सेमीकंडक्टरवरील पकड म्हणजे जागतिक पुरवठा साखळीवर निर्णायक प्रभाव. हे वास्तव चीन आणि अमेरिकेने आधीच ओळखले आहे आणि आता भारतही या शर्यतीत ठामपणे उतरला आहे.

भारताची ताकद केवळ धोरणे किंवा गुंतवणूक एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्याचे सर्वात मोठे भांडार म्हणजे मानव संसाधन. आज जगातील ग्लोबल डिझाईन वर्कफोर्सपैकी 20 टक्के हिस्सा भारताचा आहे. याचा अर्थ असा की, भारतीय अभियंते, संशोधक आणि तांत्रिक तज्ज्ञ आधीच जगातील चिप डिझाईन व निर्मिती प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत. पुढील दशकाच्या सुरुवातीपर्यंत जगाला 10 लाखांहून अधिक सेमीकंडक्टर व्यावसायिकांची कमतरता भासेल. भारत ही आव्हानात्मक गरज संधीमध्ये बदलू शकतो, कारण आपल्याकडेे तांत्रिक संस्थांचे आणि स्टार्टअप्सचे जाळे झपाट्याने उभे राहात आहे. सरकारने 350 संस्थांना आणि स्टार्टअप्सना जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन ऑटोमेशन टूल्स विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे नवोपक्रमाची संस्कृती विकसित होत आहे आणि देशांतर्गत स्तरावर नवे चिप डिझाईन तयार होत आहेत. याच कारणामुळे स्टार्टअप्स आता भारताच्या चिप इकोसिस्टीमचा कणा बनत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत जागतिक कंपन्यांचा सहभागही महत्त्वाचा ठरत आहे. अनेक बहुराष्ट्रीय दिग्गज कंपन्या भारतात गुंतवणूक करून पुरवठा साखळीला बळकट करत आहेत. त्यामुळे हे क्षेत्र अधिक स्थिरपणे सक्षम होत आहे. आज धोरण, गुंतवणूक आणि जागतिक सहकार्य यांचे असे संतुलित मिशन दिसत आहे की, ज्यामुळे देश पुढील दशकात सेमीकंडक्टर महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे.

तथापि, आव्हानेही कमी नाहीत. सेमीकंडक्टर उद्योग हा भांडवल व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा आहे. उच्च दर्जाची वीज, पाणी, लॉजिस्टिक्स आणि प्रशिक्षित कामगार यांची सातत्याने गरज भासते. जागतिक पातळीवरील स्पर्धाही अत्यंत कठीण आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि तैवान यांसारख्या देशांनी गुंतवणूक करून या क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारताला या आव्हानांशी सातत्याने सामना करत पुढे जायचे आहे. तरीदेखील आज भारताची स्थिती यापूर्वीपेक्षा खूपच आशादायक आहे. सरकार, उद्योग व शैक्षणिक संस्था यांनी एकत्रितपणे या दिशेने ताळमेळ राखला तर पुढील काही वर्षांत भारत केवळ आपली देशांतर्गत गरज भागवणार नाही, तर जागतिक बाजारपेठेतही प्रभावी उपस्थिती दर्शवेल.

‘मेड इन इंडिया चिप’ ही केवळ औद्योगिक उपलब्धी ठरणार नाही, तर ती आत्मनिर्भरतेचे प्रतीक असेल. ही देशाच्या तांत्रिक क्षमतेची आणि जागतिक नेतृत्वाच्या आकांक्षेची अभिव्यक्ती असेल. एकूणच सेमीकंडक्टर क्रांती भारताच्या अर्थव्यवस्थेला व समाजाला नवीन ऊर्जा देईल. हाच तो पाया ठरेल, ज्यावर ‘डिजिटल भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’चे स्वप्न साकार होईल. येणार्‍या काळात भारताने जर आपला संकल्प व गती कायम ठेवली, तर तो निःसंशयपणे जागतिक सेमीकंडक्टर नकाशावर अग्रगण्य स्थान मिळवेल.

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय अभियंते जगातील अग्रगण्य चिप कंपन्यांच्या डिझाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. इंटेलपासून क्वालकॉमपर्यंत प्रत्येक मोठ्या कंपनीचे संशोधन व डिझाईन केंद्र बंगळूर, हैदराबाद आणि नोएडा येथे कार्यरत आहेत. हजारो अभियंते आयआयटी व इतर संस्थांतून घडून या केंद्रांत पुढील पिढीच्या चिप्स डिझाईन करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष उत्पादन तैवान, दक्षिण कोरिया वा अमेरिका या देशांत होत होते. ‘विक्रम-32’च्या निर्मितीने ही कथा बदलली आहे. भारताकडे या क्षेत्रात तीन मोठी बलस्थाने आहेत. एक म्हणजे मानवी भांडवल. जगातील सर्वाधिक पदवीधर भारतातून बाहेर पडतात. दुसरी म्हणजे विशाल बाजारपेठ. भारतात मोबाईल फोनपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत वाढणारी मागणी यादृष्टीने अनुकूल आहे. आणि तिसरी म्हणजे धोरणात्मक मदत. इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारे संशोधन, उत्पादन आणि पॅकेजिंग यासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रोत्साहन देत आहेत. भारतापुढे दोन आव्हाने होती. पहिले म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता उभी करणे आणि दुसरे म्हणजे उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्य वाढवणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT