Stock Market  
संपादकीय

आला तेजीचा महिना...

पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्धाचे मळभ, आखाती युद्धाचा भडका उडाल्यानंतर विक्रमी स्तरावर गेलेले कच्च्या तेलाचे भाव, ऊर्जा सुरक्षेची वाढती चिंता आणि विदेशी गुंतवणूकदारांनी फिरवलेली पाठ यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारावर निराशेचे सावट पसरले होते. निफ्टी ५० या निर्देशांकाने ५ जानेवारी २०२६ रोजी २६,३७३.२० अंकांची पातळी गाठली होती. हा निफ्टीचा आजवरचा सर्वोच्च स्तर आहे; मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस इराणयुद्ध सुरू झाले आणि बाजाराचा नूरच पालटला. जानेवारीच्या शिखरावरून घसरण होत ऑक्टोबरमध्ये निफ्टीने २२,१७९.९० अंकांचा नीचांक गाठला. तब्बल ४,१९३.३० अंकांची म्हणजेच १५.९० टक्क्यांची ही घसरण गुंतवणूकदारांना चिंतेच्या गर्तेत ढकलणारी ठरली. या काळात सेन्सेक्सही तब्बल १४,५६५.७८ अंकांनी म्हणजेच १६.९० टक्क्यांनी घसरला. बँक निफ्टीमध्ये सुमारे १०,१४५.१५ अंकांची घसरण झाली; मात्र नोव्हेंबर महिन्यातील अवघ्या १२ सत्रांमध्ये भारतीय बाजाराने अभूतपूर्व उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य सळसळले.

शेअर बाजारामध्ये तेजी आणि घसरणीचा सिलसिला सतत सुरूच असतो; पण सातत्याने होणारी घसरण अर्थव्यवस्थेतील मंदीशी जोडून पाहिली जाते. तशा चर्चा सुरू झाल्या की, गुंतवणूकदार अधिक सावध होऊन आपली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावतात. पर्यायाने घसरणीला चालना मिळते. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांचे निकाल लागले आणि परिस्थिती पूर्णतः पालटली. आखातातील संघर्ष निवळू लागला. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली. इराणने भारतासह चार देशांना हाेर्मुझमधून तेल वाहतुकीस परवानगी दिली. जागतिक अस्थिरतेतही भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड कायम असल्याचे स्पष्ट झाले. कंपन्यांचे तिमाही निकाल सकारात्मक धक्का देणारे आले. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आठ-नऊ महिन्यांपासून विक्रीचा तुफानी मारा करणाऱ्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात अब्जावधी डॉलर्स अक्षरशः ओतले. जानेवारी ते ऑक्टोबर या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे २.९५ लाख कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. नोव्हेंबरच्या केवळ तीन आठवड्यांत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात तब्बल १ लाख ११ हजार ९५० कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीने भारतीय बाजाराचे सर्व निर्देशांक रॉकेट वेगाने उर्ध्वदिशेने जाताना दिसले. विशेषतः खासगी आणि सरकारी बँकांच्या समभागांमध्ये तुफानी खरेदी झाल्याने बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक नव्या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित समभागांची चमक फिकी पडत असताना आणि अमेरिकन बाजार कोसळत असताना भारतीय भांडवली बाजाराने घेतलेली ऐतिहासिक झेप अधिक महत्त्वाची आहे. गेल्या दहा वर्षांच्या इतिहासाचा आढावा घेतल्यास ज्या-ज्या वेळी भारतीय बाजाराने सलग दोन वर्षे सुमार कामगिरी केली, त्यानंतरच्या वर्षात आशियाई बाजारांच्या तुलनेत तब्बल ३८ टक्के अंकांची सरशी साधली आहे. यावेळीही विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारातील हिस्सेदारी दशकातील नीचांकी पातळीवर आली होती; परंतु केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या निर्णयांमुळे विदेशी गुंतवणूकदारांना आपली धोरणे बदलून भारतात गुंतवणूक वाढवणे भाग पडले आहे. जागतिक स्तरावर एआय तंत्रज्ञानातील भांडवली खर्चाचा वेग मंदावण्याची चिन्हे दिसू लागल्याने गुंतवणूकदार या समभागांमधून पैसा काढून सुरक्षित आणि शाश्वत वाढीच्या बाजारपेठा शोधत आहेत. अशा वेळी भारत हा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. मोठे गुंतवणूकदार आणि संस्था कोणत्याही देशाच्या भांडवली बाजारात आर्थिक गुंतवणूक करताना तेथील सरकारी धोरणे, अर्थव्यवस्थेचे वर्तमान आणि भविष्य, सामाजिक स्थिती या सर्वांचा विचार प्राधान्याने करतात. जागतिक स्तरावर मंदीचे सावट असताना भारताचा जीडीपी दर २०२६ मध्ये ७.९ टक्के, तर २०२७ मध्ये ७.२ टक्के राहण्याचा अंदाज जवळपास सर्वच वित्तीय संस्थांनी वर्तवला आहे. भारतीय कंपन्यांनी सलग पाच तिमाहींत बाजारपेठेच्या अंदाजापेक्षा सरस कामगिरी करत १४ ते १५ टक्के नफावाढीची दिशा स्पष्ट केली आहे. सरकारने देशांतर्गत उत्पादनाला दिलेली चालना, पायाभूत सुविधांवरील विक्रमी खर्च आणि निर्यातवृद्धीसाठी उचललेली पावले यामुळे देशाची व्यापार तूट नियंत्रणात राहण्यास मदत झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि भांडवली बाजार नियामक ‌’सेबी‌’ने अतिशय महत्त्वाची पावले उचलली आहेत. आगामी अर्थसंकल्पात दीर्घकालीन भांडवली नफा कर अर्थात ‌'एलटीसीजी‌’ आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच ‌'एसटीटी‌’ कमी करण्याच्या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार सुरू आहे. कर प्रणाली सुटसुटीत होण्याच्या या संकेतांमुळे विदेशी गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

देशातील समभाग बाजाराचे एकूण बाजार भांडवल आता ५ ट्रिलियन डॉलरच्या ऐतिहासिक टप्प्यापार पोहोचले आहे. भारतीय कंपन्या आता पारंपरिक बँक कर्जावर अवलंबून न राहता दरवर्षी समभाग आणि रोखे बाजारातून सुमारे १० लाख कोटी रुपयांचे भांडवल उभारत आहेत. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २३५ कंपन्यांनी आयपीओमधून १.५ लाख कोटी रुपये जमा केले. डिसेंबर महिन्यात आणखी २५ हजार कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. याशिवाय, कॉर्पोरेट रोखे बाजाराचा आकार ६२ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये १८ लाख कोटी रुपयांची भांडवली बांधिलकी दिसून येत आहे. सध्याच्या तेजीचे सारथ्य भारतीय बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राने केले आहे. भारतीय बँकांची कर्जवाढ १८ ते १९ टक्क्यांच्या भक्कम दराने सुरू असून, बुडीत कर्जांचे प्रमाण कमी झाल्याने बँकांच्या नफ्यात मोठी वाढ झाली आहे. आकर्षक मूल्यांकन आणि भक्कम आर्थिक स्थितीमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय खासगी बँकांच्या समभागांवर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला आहे. जागतिक बाजारात तेल, सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे भारताचे आयात बिल मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. बिगर ओपेक देशांचे वाढते उत्पादन आणि चीनमधील मंदावलेली मागणी यामुळे पुढील वर्षाखेरीस कच्चे तेल प्रतिबॅरेल ७० ते ७८ डॉलरपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. यामुळे महागाई नियंत्रणात राहण्यास आणि कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षाखेरीपर्यंत निफ्टी २९ हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बाजाराच्या गणितानुसार चढउतार पुढेही होत राहतील. आताच्या तेजीमध्ये अनेक समभागांचे मूल्य आजही वधारलेले नाही, हेही वास्तव आहे. येणाऱ्या काळात फेडरल रिझर्व्हची धोरणे, डॉलरचे मूल्य यांसारख्या अनेक घटना बाजारावर परिणाम करत राहतीलच; पण अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चिंतेचे कारण नाही. येणाऱ्या प्रत्येक आव्हानावर मात करणारे खंबीर नेतृत्व आणि प्रचंड सकारात्मकता असणारी राजकीय इच्छाशक्ती हे भारताचे वर्तमानातील सर्वांत मोठे बलस्थान आहे. प्रतिकूल काळात बाजाराने घेतलेली झेप या बलस्थानाला दिलेली सलामी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT