Railway Ticket rules | तिकीट दलालांना ‘तत्काळ’ दणका pudhari File Photo
संपादकीय

Railway Ticket rules | तिकीट दलालांना ‘तत्काळ’ दणका

पुढारी वृत्तसेवा

सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत

आता रेल्वेचे तत्काळ तिकीट काऊंटरवर काढायचे असेल, तर मोबाईलवरचा ओटीपी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे तत्काळ तिकिटाचा होणारा काळाबाजार रोखला जाईल.

भारतीय रेल्वेने तत्काळ श्रेणीतील तिकिटाच्या बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. आता काऊंटरवर तत्काळ तिकीट काढायचे असेल, तर मोबाईलवरचा ओटीपी महत्त्वाचा आहे. या ओटीपीद्वारे प्रवाशाची पडताळणी केली जाणार आहे. ओटीपी नमूद केल्यानंतरच तिकीट निश्चित होईल. रेल्वेच्या मते ओटीपीचे बंधन घातल्याने तत्काळ श्रेणीतील तिकिटाचा होणारा काळाबाजार रोखला जाईल, शिवाय पारदर्शकता वाढेल आणि गरजू प्रवाशांना त्याचा लाभ मिळेल. नवीन प्रणाली प्रायोगिक पातळीवर राबविण्यात आली आणि ती यशस्वीही ठरली आहे.

रेल्वेच्या मते, गेल्या काही वर्षांत तत्काळ तिकिटाचा काळाबाजार वाढला होता. तसेच बनावट बुकिंगच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. अनेक एजंट एकाचवेळी अनेक तिकीटे काढण्यासाठी बनावट नंबर आणि ओळखपत्राचा आधार घेतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना तत्काळ श्रेणीतील तिकीट मिळणे कठीण जाते. आता ओटीपीतून पडताळणी होत असल्याने प्रत्येक तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी स्वत: हजर असणे आणि मोबाईल नंबरची पडताळणी अनिवार्य झाली आहे. अर्थात, ही व्यवस्था ऑनलाईन तिकिटाच्या आरक्षणात लागू केलेली आहे आणि त्यात आता तत्काळ श्रेणीची भर पडली आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदलाला मान्यता देताना रेल्वेची आरक्षण व्यवस्था आणि तिकीट प्रणाली संपूर्णपणे पारदर्शक, सुरक्षित आणि प्रवासीपूरक करण्याचा यामागचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. जुलै 2025 मध्ये ऑनलाईन तत्काळ तिकिटासाठी आधार आधारित ऑथेंटिकेशन लागू करण्यात आले आणि त्यामुळे बनावट आयडीचा वापर बर्‍यापैकी कमी झाला. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये जनरल रिझर्व्हेशन सिस्टीममध्ये ओटीपी व्हेरिफिकेशनला जोडले. त्यात प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या श्रेणीत आता काऊंटर बुकिंगमध्येदेखील ओटीपीचे बंधन घातले जात आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 17 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. त्यानुसार देशभरातील 52 रेल्वेगाड्यांत ओटीपी आधारित तत्काळ तिकीट प्रणाली लागू केली. या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले. रेल्वे कर्मचार्‍याच्या मते, प्रायोगिक चाचणीच्या वेळी बनावट बुकिंगच्या प्रमाणात सुमारे 40 टक्के घट झाली आणि गरजू प्रवाशांना तिकीट मिळण्याच्या प्रमाणात वाढ झाली. प्रवाशांनीदेखील यासंदर्भातील अनुभव शेअर केला. त्यांच्या मते, ओटीपी प्रक्रिया खूपच सुलभ असून या प्रक्रियेत तिकीट निश्चिती लगेचच होते. यानंतर रेल्वे मंडळाने ही व्यवस्था देशभरातील सर्व रेल्वेंना लागू करण्याची तयारी केली आहे. ही व्यवस्था टप्प्याटप्प्याने सर्व स्थानकांवर लागू करण्यात येईल.

नव्या व्यवस्थेनुसार, एखादा प्रवासी तत्काळ तिकिटासाठी काऊंटरवर दाखल होईल तेव्हा तिकीट विक्री करणारा कर्मचारी प्रवाशाचा मोबाईल क्रमांक घेईल. त्यानंतर प्रवाशाच्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओटीपी क्रमांक पाठवेल. ओटीपीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तिकीट जारी केले जाईल. प्रवाशाने चुकीचा मोबाईल क्रमांक दिल्यास किंवा ओटीपी येत नसेल, तर तिकीट दिले जाणार नाही. रेल्वेच्या मते, यामुळे केवळ बनावट आरक्षण बंद होणार नाही, तर दलाल, एजंट आणि तिकिटाचा काळाबाजार करणार्‍यांविरोधात ही व्यवस्था निर्णायक पाऊल ठरेल.

रेल्वे लवकरच आयआरसीटीसी अ‍ॅपमध्येदेखील सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात फेस रिकग्निशन, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आणि तातडीने पेमेंट प्रक्रिया यासारखे पर्यायदेखील जोडले जाण्याची शक्यता आहे. हे सर्व फिचर्स तिकीट सिस्टीमला डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या रेल्वेच्या उद्देशाला अनुसरून आहेत. रेल्वेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ओटीपी आणि आधारआधारित ऑथेंटिकेशनच्या कारणांमुळे तिकीट बुकिंगचा संपूर्ण डेटा अधिक सुरक्षित होईल आणि दलालांवर लक्ष ठेवणे सोयीचे जाईल. एखादा व्यक्ती सतत तिकीट बुक करत असेल, तर सिस्टीमकडून त्याच्या हालचालीला रोखले जाईल. त्यामुळे दलाल आणि काळाबाजार करणार्‍या एजंटवर अंकुश बसविण्यास मदत मिळेल.

रेल्वेच्या दाव्यानुसार या बदलामुळे गरजू प्रवाशांना लाभ मिळेल. कारण, या व्यवस्थेत तिकीट खरेदीत पारदर्शकता राहणार असून बुकिंगमध्ये कोणतीही फसवाफसवी नसेल. प्रवाशांनी मोबाईल क्रमांक अपडेट ठेवण्याचे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. तसेच तिकीट बुकिंगच्या काळात मोबाईल जवळ बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. मोबाईल क्रमांक चुकीचा किंवा जुना असेल, तर ओटीपी मिळणार नाही. परिणामी, तिकीट मिळणार नाही. तसेच ज्येष्ठ किंवा विशेष प्रवाशांसाठी रेल्वे कर्मचार्‍यांकडून मदत केली जाईल. कोणताही गरजू प्रवासी तिकिटापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या सुधारणांमुळे रेल्वेने या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात तिकिटिंग सिस्टीमचे डिजिटायजेशन करण्याचे ध्येय ठेवले आहे. ओटीपीआधारित तत्काळ तिकीट प्रणाली आणि आठ तास अगोदर चार्ट तयार करणे यासारख्या सुधारणा महत्त्वाच्या आहेत. या बदलामुळे तत्काळ तिकीट मिळण्यात होणारी गैरसोय दूर होईल, अशी प्रवाशांना अपेक्षा आहे. आगामी महिन्यात प्रवाशांची मते जाणून घेऊन सुविधेत आणखी सुधारणा केली जाणार आहे. यानुसार रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वेने आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कालावधीतदेखील बदल केला आहे. आतापर्यंत बहुतांश रेल्वेचा चार्ट त्यांच्या निर्धारित प्रस्थान वेळेच्या चार तास अगोदर जारी केला जात असे. या कारणामुळे प्रतीक्षा यादीत अडकलेले प्रवाशांना शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, हे कळत नसायचे. प्रवास काही तासांवर आलेला असताना तिकिटाची स्थिती कळत असे आणि अशावेळी त्यांची प्रवासाची योजना बारगळत असे. त्यामुळे रेल्वेने आता चार्ट जारी करण्याची वेळ चार तासांवरून आठ तासांवर नेली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना तिकिटाची शेवटची स्थिती समजल्यानंतर प्रवासात बदल करण्यास पुरेसा वेळ मिळेल. एखाद्याचे तिकीट कन्फर्म झाले नाही, तर तो अन्य रेल्वेचे तिकीट काढू शकेल किंवा बस किंवा विमानातून प्रवास करू शकेल. रेल्वे अधिकार्‍याच्या मते, हा बदल प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता करण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या मते, चार्टच्या वेळेत केलेला बदल हा प्रवाशांना अधिक वेळ मिळण्यासाठी आणि प्रवासाची पुढील योजना आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याच्या द़ृष्टीने फायद्याचा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT