भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले आहे.
देशाची माहिती-तंत्रज्ञान उद्योगव्यवस्था अनेक दशकांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ राहिली आहे; मात्र आता ती एका नव्या आणि धोकादायक टप्प्यातून जात आहे. हा धोका दुसरा कोणी नसून, आयटी कंपन्यांनी स्वतः विकसित केलेली कृत्रिम बुद्धिमत्ता हीच आहे. ज्या कंपन्या सॉफ्टवेअर विकास, चाचणी प्रक्रिया आणि विविध सेवा पुरविण्यावर अवलंबून होत्या आणि झपाट्याने प्रगती करत होत्या, त्यांच्यासाठी कठीण दिवस सुरू झाले आहेत. कारण, ही सर्व कामे आता एआय स्वयंचलित पद्धतीने पूर्ण करू लागली असून ती थेट त्यांच्या व्यवसाय मॉडेललाच आव्हान देत आहे. भारतासाठी ही स्थिती अधिक चिंताजनक आहे. कारण, देशाला जगातील आऊटसोर्सिंग केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्र, बीपीओ, कॉल सेंटर्स आणि बॅक ऑफिस सेवांमध्ये लाखो लोकांना रोजगार मिळतो.
माहिती-तंत्रज्ञानापुरते मर्यादित न राहता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत एआयने प्रभावी प्रवेश केला आहे. कोणतीही प्रक्रिया अधिक सुलभ आणि अधिक कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करणे शक्य झाले आहे. शिक्षण क्षेत्राचा विचार केला, तर विद्यार्थी कोणताही विषय आधुनिक पद्धतीने सहज शिकू शकतो. शिक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठी चिंता म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता आणि स्वयंपूर्ण विचारशक्ती कमी होण्याची शक्यता. प्रश्नांची उत्तरे सहज उपलब्ध झाल्याने स्वतः शोध घेण्याची सवय कमी होऊ शकते. उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि निष्पक्षता यांसारख्या मूल्यांबाबतही अनेक आव्हाने निर्माण होतात. कमी वेळेत विस्तृत माहिती देणाऱ्या चॅटबॉट प्रणालींची गती मानवी क्षमतेपेक्षा अधिक आहे. हीच बाब खोटी बातमी आणि चुकीची माहिती वेगाने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. सायबर गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेऊन दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू शकतात. समाजमाध्यमांवर त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. काही एआय प्लॅटफॉर्म छायाचित्रे आणि व्हिडीओ तयार करण्यासही सक्षम आहेत आणि त्यांचा वापर खोट्या प्रचारासाठी केला जाऊ शकतो.
अनेक कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी एआयचा वापर सुरू केला आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची शक्यता वर्तवली जाते. एका अहवालानुसार सुमारे 30 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. भविष्यात सुरक्षा व्यवस्थेबाबतही एआय स्वतः निर्णय घेण्याची क्षमता विकसित करू शकते आणि नियंत्रणाच्या पद्धती शोधू शकते; मात्र या तंत्रज्ञानावर अतिअवलंबित्व नवीन अडचणी निर्माण करू शकते.
काही दिवसांपूर्वी तांत्रिक त्रुटीमुळे चॅटजीपीटी या प्रणालीची शोध नोंद गळती झाल्याची घटना घडली होती. भविष्यातही अशा प्रकारचे धोके संभवतात. कंपन्यांकडे वापरकर्त्यांचा डेटा असतो. कृत्रिम बुद्धिमत्ता त्या डेटाच्या आधारे वापरकर्त्यांच्या सवयी आणि नमुने ओळखू शकते. त्यांची नक्कल करू शकते आणि जाहिरातींसाठी माहितीचा गैरवापर करून बनावट प्रोफाईल तयार करू शकते. आज क्षेपणास्त्रे आणि ड्रोन एआयच्या साहाय्याने नियंत्रित केली जातात. सध्या त्यांना दिले जाणारे आदेश निश्चित चौकटीत असतात; परंतु भविष्यात या तंत्रज्ञानाच्या क्षमता वाढल्यास मानवी आदेशांशिवाय निर्णय घेण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे गुंतागुंत वाढू शकते.
या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय आयटी उद्योग एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. स्वयंचलनामुळे पारंपरिक सेवा पद्धतींना आव्हान निर्माण झाले असले, तरी याच एआयच्या साहाय्याने भारताच्या आर्थिक विकासाला नवी चालना मिळू शकते. योग्य धोरणे, कौशल्य विकास आणि नियोजन यांच्या आधारे या बदलत्या तंत्रज्ञानाला स्वीकारणे हेच पुढील काळात भारतासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.