Indian Constitution | राज्यघटनेला बळकट करण्याची वचनबद्धता! 
संपादकीय

Indian Constitution | राज्यघटनेला बळकट करण्याची वचनबद्धता!

पुढारी वृत्तसेवा

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतीय राज्यघटना सामाजिक न्याय, समानता आणि प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाची हमी देणारा दस्तावेज आहे. आज संविधान दिन. यानिमित्त...

घटनासभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला. आज आपण डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासभेतील प्रत्येकाचे स्मरण करत आहोत. भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रासाठी राज्यघटनेचा प्रभाव केवळ संसद आणि न्यायालयांपुरता मर्यादित न राहता त्यापलीकडेही पोहोचणे महत्त्वाचे आहे. राज्यघटनेशी नाते अधिक घट्ट करणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली एकतेची भावना अधिक खोलवर नेणे हा आमचा प्रयत्न राहिला आहे. म्हणूनच, एक दशकापूर्वी आमच्या सरकारने २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

माझ्यासह कोट्यवधी भारतीयांच्या जीवनप्रवासात राज्यघटना ही अविभाज्य घटक आहे. जेव्हा बालपणात डोकावतो, तेव्हा मी राज्यघटनेप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेने भारावून जातो. एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलावर, कोणत्याही सुविधा आणि जन्मजात मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागणाऱ्या बालकावर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सेवा करण्याची जबाबदारी येते, ही बाब राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करते. राज्यघटनेमुळेच व्यक्तीचा जन्म कोणत्या परिस्थितीत झाला, यावर त्याच्या भविष्याच्या मर्यादा निश्चित होत नाहीत. आम्ही आमच्या परीने, आमची राज्यघटना अधिक बळकट करून या कृतज्ञतेच्या ऋणाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे.

घटनाकारांनी पाहिलेल्या मौल्यवान स्वप्नाच्या पूर्ततेसाठी कार्य करण्यापेक्षा अधिक समाधानकारक गोष्ट कोणती असू शकते? जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, ५० कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या वर आलेत. कोट्यवधी पालक आता मुलांच्या उत्तम भविष्याचे स्वप्न बघू शकतील. प्रधानमंत्री आवास योजना एखाद्या कुटुंबाला झोपडीतून पक्क्या घरात राहण्याची संधी उपलब्ध करून देते, तेव्हा राज्यघटनेने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या हक्काला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होते. उज्ज्वला योजनेमुळे एखाद्या आईला धुराने भरलेल्या स्वयंपाकघरातील त्रासातून मुक्ती मिळते, तेव्हा आपण समानता आणि कल्याणाच्या मूल्यांना पुढे नेतो. आयुष्मान भारत योजनेमुळे एखादे गरीब कुटुंब दर्जेदार आरोग्यसेवा मिळवू शकते, तेव्हा सामाजिक न्याय प्रत्यक्षात साकार होतो. मुद्रा आणि पीएम-स्वनिधीतून लघुउद्योजकांना आणि पथविक्रेत्यांना तारणमुक्त कर्ज मिळते तेव्हा आर्थिक न्यायाचे मूर्त स्वरूप साकार होते. डिजिटल तंत्रज्ञान आणि यूपीआय प्लॅटफॉर्म्स, सर्व भेद ओलांडून, एकेकाळी ठराविक लोकांसाठीच उपलब्ध असलेल्या संधी प्रत्येक नागरिकाच्या आवाक्यात आणतात तेव्हा संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशकता आपण पुढे नेत असतो.

या संविधानात्मक दृष्टिकोनाची अनेक रूपे साकार झालेली दिसतात. आम्ही आणलेल्या घटनात्मक सुधारणांच्या सूचीकडे याच पैलूतून पाहता येईल. दीर्घकाळ प्रलंबित वस्तू आणि सेवा कर सुधारणेचा मार्ग १०१ व्या घटना दुरुस्तीमुळे मोकळा झाला. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे मिळाला आणि समाजातील उपेक्षित घटकांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले. १०३ व्या घटना दुरुस्तीतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करून, आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांच्या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या आकांक्षांना या सुधारणेने न्याय दिला. १९५० नंतर प्रथमच, राज्यघटनेची अद्ययावत आवृत्ती आता आठव्या अनुसूचीतील सर्व २२ भाषांमध्ये उपलब्ध झाली आहे. यामुळे आपली राज्यघटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

१९५० मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही, १८६० च्या दशकातील वसाहतवादी काळातील दंड संहितेनुसारच आपण चालत होतो. भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आपण केला आहे. वसाहतवादी व्यवस्थेतील दंड अर्थात शिक्षेवर भर देणाऱ्या दृष्टिकोनाऐवजी नागरिककेंद्रित न्याय ही संकल्पना आपण केंद्रस्थानी आणली आहे.

इतिहासात असे काही प्रसंग आले की, ज्यांच्यावर राज्यघटनेचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती, त्यांनीच राज्यघटना कमकुवत करण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे, याच लोकांना तब्बल पाच दशके सत्तेत राहण्याची संधी मिळाली होती. यावर्षी, १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या घटनादुरुस्तीला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनादुरुस्तीच्या वेळी जनतेने निवडून न दिलेल्या सरकारने हंगामी संसदेत बहुमताचा वापर मूलभूत स्वातंत्र्यांवर मर्यादा आणण्यासाठी केला. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी ही घटनादुरुस्ती करण्यात आली. यावरून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणे आणि जनतेचा विरोध दडपून टाकणे, हा त्यामागील उद्देश होता, हे स्पष्ट होते. आणीबाणीच्या काळात केलेल्या ४२ व्या घटनादुरुस्तीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकन सीमित केले आणि संस्थात्मक अधिकारांच्या संतुलनात मूलभूत बदल घडवून आणले. सत्तालोलूप आणि घटनाविरोधी नेतृत्व काय करू शकते, हे जाणून घेण्यासाठी युवा पिढीने ३८ आणि ३९ व्या घटनादुरुस्तींचाही अभ्यास करावा. जनतेने निवडून दिलेली राज्य सरकारे बरखास्त करण्यासाठी कलम ३५६ चा वारंवार केला गेलेला गैरवापर हे एक अत्यंत खेदजनक प्रकरण आहे. एका राजकीय पक्षाच्या नावे जवळपास शंभरवेळा कलम ३५६ लादण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेलेला असून एका माजी पंतप्रधानांनी तर या बाबतीत ‘अर्धशतक’ पूर्ण केले आहे.

राज्यघटनेतील कलमाची मूळ भावनेनुसार भारतात शब्दशः अंमलबजावणी केली जाईल, अशी राज्यघटनेच्या निर्मात्यांना अपेक्षा होती; परंतु, ७० वर्षांहून अधिक काळ कलम ३७० आणि ३५-ए मुळे जम्मू-काश्मीरमध्ये राज्यघटना पूर्णपणे लागू करता येऊ शकली नाही; परिणामी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि महिलांच्या अधिकारांवर गदा आली. इतिहासात झालेली ही चूक २०१९ मध्ये दुरुस्त करण्यात आली. यावर्षी नक्षलवादाचे यशस्वीरीत्या उच्चाटन झाले; यामुळे आता अगदी गरिबातील गरीब व्यक्तीलाही कोणत्याही भीतीविना घटनादत्त अधिकारांचा वापर करता येऊ शकेल. आता आपल्यापुढे केवळ वास्तवापासून पूर्णपणे दूर असूनही, विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असलेल्या ‘दिमागी नक्षलीं’चे आव्हान शिल्लक आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष ओबीसींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांसाठी आरक्षण आणू इच्छित आहे, ही अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपले घटनाकार, विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात होते.

राज्यघटना साकार होण्यात ज्या महिलांची मदत झाली, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आवर्जून नोंद घेतल्याविना राज्यघटनेचा प्रवासाचा मागोवा अधुरा ठरेल. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला जे काही घडले, ते अत्यंत लज्जास्पद आहे. विधिमंडळांमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, या उद्देशाने आणलेले विधेयक एका विरोधी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही; यावरून पुन्हा एकदा घटनात्मक मूल्यांबद्दल त्यांना आदर नसल्याचे दिसून आले. तरीही भारतातील ‘नारी शक्ती’ला न्याय मिळवून देण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही, याची मी त्यांना खात्री देतो. आपल्या घटनात्मक लोकशाहीमध्ये विरोधी पक्षासाठी एक स्पष्ट भूमिका निश्चित केलेली आहे. दुर्दैवाने, मुख्य विरोधी पक्ष आता ‘विरोधी पक्ष’ न राहता ‘अवरोध पक्ष’ बनल्याचे दिसते. लोकशाही प्रक्रियांमध्ये अडथळे आणणे हा घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा पर्याय असू शकत नाही, या गोष्टीची त्यांना जाणीव होण्याची गरज आहे.

भारत निर्णायक टप्प्यावर उभा आहे. आपण २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करत असताना, आपल्या विचारात ‘भारत प्रथम’ आणि कृती करताना ‘कर्तव्य’ ही दोन साधी, पण प्रभावी तत्त्वे आचरणात आणल्यास सामूहिक प्रयत्नांना दिशा मिळेल. हीच मार्गदर्शक तत्त्वे समजून आणि राज्यघटनेला आपल्या शक्तीचा स्रोत बनवून, आपण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT