Annapurni Subramaniam | प्रा. अन्नपूर्णी सुब्रमण्यम 
संपादकीय

Annapurni Subramaniam | प्रा. अन्नपूर्णी सुब्रमण्यम

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

भारताच्या प्रतिष्ठित खगोल-भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या प्रा. डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथे कॉस्पार-२०२६ विक्रम साराभाई पदकाने नुकतेच गौरविण्यात आले. हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आणि चौथ्या भारतीय ठरल्या.

आकाशगंगेच्या रहस्यमय प्रकाशाने बालपणी आकर्षित झालेल्या एका मुलीपासून भारतातील प्रतिष्ठित खगोल-भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक होण्यापर्यंतचा प्रा. सुब्रमण्यम यांचा प्रवास हा वैज्ञानिक उत्कृष्टता, चिकाटी आणि नेतृत्वाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्या सध्या बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला खगोलशास्त्रज्ञही आहेत. त्या तारकागुच्छ, आकाशगंगा आणि मॅगेलॅनिक ढगांमधील ताऱ्यांची उत्क्रांती आणि लोकसंख्या यासारख्या क्षेत्रांवर काम करतात. प्रा. सुब्रमण्यम यांनी त्यांचे शालेय शिक्षण केरळमच्या पालक्काड येथील व्हिक्टोरिया कॉलेजमधून विज्ञान शाखेत पूर्ण केले. त्यांनी १९९६ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समधून 'तारकागुच्छ आणि तारकीय उत्क्रांतीचा अभ्यास' या विषयावर पीएच.डी. केली. त्यांना खगोलशास्त्राची आवड वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वीपासूनच होती. शालेय जीवनात त्या उन्हाळ्यात सूर्योदयापूर्वी उठून अभ्यास करत आणि रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करत असत. बालपणी निर्माण झालेले हे कुतूहल पुढे त्यांच्या आयुष्यभराच्या वैज्ञानिक कारकिर्दीला दिशा देणारे ठरले.

भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा. सुब्रमण्यम यांनी खगोलशास्त्राशी संबंधित क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, 'इस्त्रो' आणि रामन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या खगोलशास्त्र कार्यक्रमात प्रवेश घेतला. त्यानंतर १९९० मध्ये त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्समध्ये संशोधन फेलो म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर सुमारे तीन दशकांनंतर म्हणजे २०१९ या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या, हे विशेष! त्यांच्या संशोधनामुळे तारकांची उत्क्रांती आणि तारकांचे जीवनचक्र समजून घेण्यात महत्त्वपूर्ण प्रगती झाली. त्यांनी सुमारे १७५ वैज्ञानिक संशोधनपत्रे प्रकाशित केली असून १५ पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सर्वात उल्लेखनीय योगदानांपैकी एक म्हणजे ॲस्ट्रोसॅट होय. भारताच्या पहिल्या समर्पित अंतराळ वेधशाळा प्रकल्पाचे त्यांच्या कारकिर्दीत २०१५ मध्ये प्रक्षेपण करण्यात आले. प्रा. सुब्रमण्यम यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत.

खगोलशास्त्राशिवाय प्रा. सुब्रमण्यम या प्रशिक्षित व्हायोलिनवादकही आहेत. कर्नाटक संगीताची समृद्ध परंपरा असलेल्या कुटुंबात त्यांचे बालपण गेले. संगीताच्या वातावरणाने त्यांच्या सर्जनशीलतेला आणि शिस्तीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे त्या सांगतात. त्यांना पारंपरिक कोलम (रांगोळी) काढण्याचीही आवड आहे. त्यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान जागतिक खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित करतो. विशेषतः महिलांसह नव्या पिढीतील तरुण वैज्ञानिकांना अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देणारा हा गौरव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT