हवाई दलाच्या सक्षमतेसाठी... (Pudhari File Photo)
संपादकीय

Indian Air Force Strength | हवाई दलाच्या सक्षमतेसाठी...

भारतीय हवाई दलाकडे सध्या 29 स्क्वॉड्रन लढाऊ विमान आहेत.

पुढारी वृत्तसेवा

भारतीय हवाई दलाकडे सध्या 29 स्क्वॉड्रन लढाऊ विमान आहेत. मिग निवृत्त झाले. तातडीने 250 विमानांची गरज आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणारे सामरिक आव्हान पाहता भारताकडे सुमारे 45 स्क्वॉड्रन असणे अपेक्षित आहे.

नरेंद्र क्षीरसागर

भारतीय हवाई दलाची कमरता दूर करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने स्वदेशी लढाऊ विमानांवर भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी 180 तेजस मार्क-1 ए विमानांच्या खरेदीची ऑर्डर दिली. 2021 मध्ये 46 हजार कोटी रुपये खर्चाच्या 83 तेजस मार्क 1 ए विमानाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. त्याचा पुरवठा अद्याप झालेला नाही, तरीही सरकारने हवाई दलाची शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2025 मध्ये 62 हजार कोटी रुपये खर्चाच्या 97 विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली. या विमानांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) मते, या महिन्यापासून या विमानांचा पुरवठा सुरू होईल. प्रत्यक्षात या विमानाला विलंब होण्यामागचे कारण म्हणजे, अमेरिकेकडून उशिरा मिळणारे इंजिन होय.

‌‘एचएएल‌’ने अमेरिकेच्या जीई कंपनीशी 404 इंजिन खरेदी करण्याचा करार केला आहे. यानुसार या इंजिनचा पुरवठा मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती. जीई कंपनीचे यावर्षी पहिले इंजिन एप्रिल महिन्यात, दुसरे जुलै महिन्यात आणि तिसरे सप्टेंबरमध्ये दिले. आतापर्यंत केवळ तीनच इंजिन उपलब्ध झाली. करारानुसार जीई कंपनीने महिन्याला दोन इंजिन देणे अपेक्षित होते. या विलंबावरून हवाई दल चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी हवाई दलप्रमुख ए. पी. सिंह यांनी चार दशकांपासून एचएएल तेजसची निर्मिती करत आहे; मात्र अद्याप 40 विमानेदेखील पुरवली नाहीत, अशा शब्दांत खंत व्यक्त केली. भारतीय हवाई दलाकडे तेजसचे दोन स्क्वॉड्रन सक्रिय आहेत; परंतु इंजिनचा पुरवठा वेगाने झाला, तर दरवर्षी एचएएल 12 ते 15 विमानांचा पुरवठा करू शकतो.

अमेरिकी इंजिनला विलंब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे फ्रान्सच्या सहकार्याने होणारी इंजिननिर्मिती. यासाठी डीआरडीओ आणि फ्रान्स कंपनी सफ्रान यांच्या संयुक्त प्रकल्पाला सरकारकडून लवकरच मंजुरी मिळू शकते. सफ्रान कंपनी पाचव्या श्रेणीतील स्वदेशी लढाऊ विमान तयार करण्यासाठी उच्च प्रतीचे जेट इंजिनचा विकास आणि त्याच्या निर्मितीत मदत करेल. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दुहेरी इंजिन असणारे उच्च प्रतीच्या मध्यम लढाऊ विमानांसाठी 120 किलो न्यूटन इंजिनचा विकास आणि उत्पादन करण्याचा आहे. या कामासाठी सफ्रान कंपनीकडून तंत्रज्ञान मिळणार आहे. ‌‘डीआरडीओ‌’चे गॅस टर्बाईन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट कार्यान्वित करताना या योजनेचा खर्च सुमारे सात अब्ज डॉलर आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर भारत इंजिननिर्मिती करणाऱ्या अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्सच्या यादीत जाऊन बसेल.

राफेल लढाऊ विमानांचा ताफा वाढविण्याबरोबरच रशियाच्या पाचव्या श्रेणीतील लढाऊ विमान एसयू-57 ची भारतातच निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशियाने भारताला ‌‘एसयू 57 स्टेल्थ‌’ विमानांसाठी शंभर टक्के तंत्रज्ञान देण्याबरोबरच सोर्स कोर्ड देण्याचीदेखील तयारी केली आहे. रशियाने म्हटल्यानुसार, भारताने प्रस्ताव मान्य केला, तर ‌‘एचएएल‌’च्या सुखोई-30 एमकेआय उत्पादन प्रकल्पातच एसयू-57 स्टेल्थ लढाऊ विमानांची निर्मिती सुरू होऊ शकते. या कामासाठी रशियाचे एक पथक लवकरच ‌‘एचएएल‌’च्या नाशिक प्रकल्पाला भेट देणार आहे. एसयू-57 हे लढाऊ विमान आर-37 एम क्षेपणास्त्रांसह भरारी घेते आणि त्याची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे. उच्च प्रतीचे एवियोनिक्स हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपरकंडक्टिव्हिटी याचे मिश्रण आहे. एकुणातच भारत पाचव्या श्रेणीतील लढाऊ विमान तयार करण्याकडे वाटचाल करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT